गेल्या 15 दिवसांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लागू केलेला आयात कर अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ तब्बल 8 पट वाढवला आहे. व्हाईट हाऊसने मंगळवारी उशिरा जारी केलेल्या परिपत्रकामध्ये यासंदर्भातला उल्लेख करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार आता चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर तब्बल 245 टक्के व्यापार कर लागू असेल. चीनकडून उचलण्यात येणाऱ्या उर्मट पावलांचा परिणाम म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पाऊल ‘व्यापारात अमेरिकेला सर्वोच्च प्राधान्य’ धोरणाचाच एक भाग आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
चीनने डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेवर 145 टक्के आयात कर लागू केल्यानंतर त्यावर अमेरिकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे अमेरिका व चीन यांच्यातील या टॅरिफ वॉरमुळे दोन्ही देशांमध्ये मिळणाऱ्या वस्तू दिवसेंदिवस महाग होऊ लागल्याचे दिसत आहे.
या परिस्थितीचे खापर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चीनवर फोडले आहे. चीनकडून हेतुपुरस्सर तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या अनेक महत्त्वाच्या सामग्रींच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. त्यात गॅलियम, जर्मेनियम आणि अँटिमनी अशा गोष्टींचा समावेश आहे. लष्करी साहित्य, अवकाशविषयक साहित्य व सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी हे साहित्य अत्यावश्यक ठरते, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. नुकतेच चीनने सहा प्रकारच्या दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवरदेखील अशाच प्रकारचे निर्बंध घातल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे.
या सगळ्या प्रकारातून अमेरिकेतली ऑटो उद्योजकांसाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबींचा पुरवठा खंडित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.