Home Featured अमेरिकेकडून इराणची 3 अणुऊर्जा केंद्रे उद्ध्वस्त

अमेरिकेकडून इराणची 3 अणुऊर्जा केंद्रे उद्ध्वस्त

0

इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी; 125 लढाऊ विमानांद्वारे‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ यशस्वी; इराणकडून बदल्याचा इशारा

इराण आणि इस्रायलच्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली असून, काल पहाटे अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर 125 लढाऊ विमानांद्वारे हल्ला केला. त्यात सात बी-2 बॉम्बर विमाने होती. या बॉम्बर विमानांनी दोन अणुऊर्जा केंद्रांवर 14 बंकर बस्टर बॉम्ब डागले, तर एका केंद्रावर टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणची फोर्डो, इस्फहान आणि नतांज ही तीन अणुऊर्जा केंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. इराणविरोधातील कारवाईची माहिती खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना दिली. तसेच इराणनेही या हल्ल्यांना दुजोरा दिला. या मोहिमेला अमेरिकेकडून ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ असे नाव देण्यात आले होते. इराणच्या अणूकेंद्रांवर हल्ले केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे आभार मानले, तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशारा अमेरिकेला दिला. तसेच प्रत्युत्तरात इराणने इस्रायलवर हल्ल्यांची तीव्रता काल वाढवली.

इराणविरुद्ध लष्करी मोहिमेचा निर्णय घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे घेतले होते. दोन आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ट्रम्प यांच्या इराणविरुद्ध लष्करी कारवाई करू, या विधानाच्या आदल्या दिवशी अमेरिकेने त्यांचे अत्याधुनिक लढाऊ विमान बी-2 बॉम्बर्स प्रशांत महासागरात असलेल्या त्यांच्या ग्वाम हवाई तळाकडे पाठवले होते. त्याचवेळी अमेरिकेकडून इराणवर मोठी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथील तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ले केले. फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण पेलोड टाकण्यात आला. हल्ले करुन आमची सर्व लढाऊ विमाने आता इराणी हवाई हद्दीतून सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. जगातील इतर कोणत्याही सैन्याकडे ही क्षमता नव्हती. अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे हे यश आहे. आता शांततेची वेळ आली आहे.

इराण मागच्या चाळीस वर्षांपासून अमेरिकेच्या विरोधात कारवाया करतो आहे आणि कुरापती काढतो आहे. त्यामुळे आम्हाला इराणकडे असलेले अणु प्रकल्प उद्ध्वस्त करायचे होतेच. आता या असल्या कुरापती अमेरिकेला नको आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांचे अणु प्रकल्प उद्ध्वस्त केले. आता इराणने शांत बसावे, तसे झाले नाही तर इराणला भीषण विनाशाला सामोरे जावे लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला.

25 मिनिटांत मोहीम फत्ते
अमेरिकन चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ल्याचे ऑपरेशन 25 मिनिटांत पूर्ण केले. तसेच या संपूर्ण 25 मिनिटांच्या ऑपरेशन दरम्यान इराणी हवाई संरक्षण प्रणालींनी कोणत्याही अमेरिकन लष्करी मालमत्तेवर हल्ला केला नाही. बॉम्बर्सनी फोर्डो, नतांज आणि इस्फहान या ठिकाणी हल्ला केला आणि त्यानंतर 7.05 वाजता इराणी हवाई हद्दीबाहेर गेले. इराणवर हवाई हल्ला करण्याआधी अमेरिकेच्या या विमानांनी अमेरिकेतील मिसूरी येथील हवाई तळावरून उड्डाण केले होते.

125 लष्करी विमानांचा समावेश
डॅन केन यांच्या मते इराणवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये 14 बंकर-बस्टर बॉम्ब, दोन डझनापेक्षा जास्त टॉमहॉक क्षेपणास्त्रे आणि 125 हून अधिक लष्करी विमानांचा समावेश होता. अलिकडच्या मध्य पूर्व संघर्षात अमेरिकेने इराणविरुद्ध या दारूगोळ्याचा वापर करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते.

37 तास नॉनस्टॉप उड्डाण
अन्‌‍ इंधनही हवेतच भरले

अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या बी-2 बॉम्बरचा वापर केला. इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर्सनी तब्बल 37 तास नॉनस्टॉप उड्डाण केले, एवढेच नाही तर इंधन देखील हवेतच भरले आणि त्यानंतर अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर्सनी इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला.

बी-2 बॉम्बर म्हणजे काय?
बी-2 हे अमेरिकेचे बॉम्बर जेट आहे. जे एका वेळी दोन जीबीयू-57 मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (एमओपी) बॉम्ब वाहून नेऊ शकते. या प्रत्येक बॉम्बचे वजन 30000 पौंड (13.05न) आहे, जे जमिनीत खोलवर गाडलेल्या लक्ष्यांना लक्ष्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जसे की इराणची फोर्डो अणू सुविधा. त्याला ‘बंकर बस्टर बॉम्ब’ म्हणतात कारण ते जमिनीत खोलवर लक्ष्य भेदते. इराणची फोर्डो अणू सुविधा डोंगराखाली 90 मीटर खोलवर स्थित आहे.

‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ कसे पार पडले?
अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रावर केलेल्या हल्ल्यांना ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. या ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’च्या माध्यमातून इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 125 हून अधिक विमाने, 7 बी-2 बॉम्बर्स, 125 जेट विमाने, 13 हजार किलो वजनाच्या डझनभर बॉम्बचा समावेश होता. तसेच इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ला करण्यासाठी एकूण 25 मिनिट लागल्याची माहिती चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी दिली.

शांतता प्रस्थापित करा किंवा… : डोनाल्ड ट्रम्प
आम्ही इराणचे तीन अणू प्रकल्प अचूक लक्ष्यभेद करुन उद्ध्वस्त केले. आता इराणने शांत बसावे. शांतता प्रस्थापित न झाल्यास पुढचे हल्ले आणखी भीषण असतील. शांतता प्रस्थापित करा किंवा विनाशाला सामोरे जा असे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांनी मानले आभार
अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे आभार मानले. इराणवर हवाई हल्ला करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल, असे त्यांनी म्हटले आहे.

इराणकडून बदल्याचा इशारा
अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर काही तासांतच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी कोणताही विलंब न करता बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांचे प्रतिनिधी हुसेन शरीयतमदारी यांनी इराणी माध्यमांना सांगितले की, पहिले पाऊल म्हणून ते बहरिनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला करतील आणि होर्मुझचा सागरी मार्ग बंद करतील. आता विलंब न करता कारवाईची आमची वेळ आहे.

कोणत्या अणूऊर्जा केंद्रांवर हल्ला?
नतांज : इराणमधील नतांज हे अणूऊर्जा केंद्र तेहरानपासून सुमारे 135 मैल दूर आग्नेयेस असल्याचे सांगितले जाते. नतांज हे इराणच्या अणू कार्यक्रमाचा एक मध्यवर्ती घटक आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनुसार, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यापूर्वी इराण अणू शस्त्रास्त्रापासून फक्त एक पाऊल दूर होते.
फोर्डो : इराणमधील फोर्डो हे अणूऊर्जा प्रकल्प केंद्र तेहरानच्या नैऋत्येस असून, तेहरानपासून 135 मैल दूर अंतरावर एका डोंगराखाली असल्याचे सांगितले जाते. फोर्डो हे इराणमधील सर्वात मजबूत अणूऊर्जा केंद्रांपैकी एक आहे.
इस्फहान : इराणच्या राजधानीपासून सुमारे 215 मैल आग्नेयेला इस्फहान हे अणूऊर्जा केंद्र आहे. इस्फहान हे प्रयोगशाळा आणि चिनी-निर्मित संशोधन अणुभट्ट्यांचे घर आहे. शेकडो इराणी शास्त्रज्ञ या ठिकाणी काम करतात.

अणूऊर्जा केंद्रांचे कोणतेही नुकसान नाही : इराण
या हल्ल्यावर इराणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या अणूऊर्जा केंद्रांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नसून, सर्व अणू संशोधन केंद्र सुरक्षित आहेत. दरम्यान, या हल्ल्यामुळे अणू प्रकल्पांमधून रेडिएशन लीक होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता देखील इराणने फेटाळली आहे.

इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले
अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने काल इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. हैफा, तेल अवीवसह 10 शहरांत लष्करी आणि निवासी ठिकाणी इराणी क्षेपणास्त्रे पडली. त्यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. बचाव पथकांनी घटनास्थळावरून मुले, महिला आणि अनेक पाळीव प्राण्यांना वाचवले आहे. या हल्ल्यात 23 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.