अमृत फळ ः आवळा

0
629
  • डॉ. मनाली म. पवार
    सांतइनेज, पणजी

आवळे वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचे लाभ पुढे वर्षभर घेता यावेत, या हेतूने च्यवन ऋषींनी योजना केली ‘च्यवनप्राश’ या रसायनाची. छातीच्या विकारांवर या रसायनाचा फायदा होताना दिसतो. म्हणूनच या कोरोनाच्या महामारीमध्ये याचे नित्य सेवन करावे.

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी विशिष्ट अशा औषधोपचाराची योजना झाली नाही. पण या काळात व्याधिप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचे उपाय प्रत्येक ‘पॅथी’ने सांगितला. त्यासाठी आधुनिक शास्त्रानुसार ‘विटामिन-सी’च्या गोळ्या घेण्यास सांगितल्या. आयुर्वेदशास्त्रानुसार प्रचुर मात्रेमध्ये ‘विटामिन-सी’ असलेल्या च्यवनप्राशवर भर दिल्या गेला. आयुर्वेद शास्त्रानुसार आवळ्याला ‘अमृतफळ’ म्हटले आहे. आवळ्याचे गुणधर्म हे अमृताप्रमाणे आहे. आवळ्यामध्ये नवचैतन्य, वयःस्थापन करण्याचे गुण आहेत हे लक्षात घेता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आवळी-भोजन सांगितले आहे.

आवळे सेवन केल्यावर किंवा आवळ्यांपासून योग्य विधीने बनवलेली रसायने सेवन केल्यावर होणारा फायदा द्विगुणित होण्यासाठी आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसावे, खेळावे, अन्न सेवावे अशी योजना भारतीय संस्कृतीत सांगितलेली आहे. यातूनच आवळी-भोजनाची योजना केलेली आहे. ज्या झाडावर आवळे लागलेले आहेत, आवळे परिपक्व झालेले आहेत, त्या झाडाची शक्ती वेगळी असणारच. या दृष्टीने कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाचे पूजन, आवळी-भोजन केले जाते. आवळ्याच्या झाडातून निघणारे तरंग आपल्या चेतनासंस्थेला प्रभावित करते. या झाडाच्या ठिकाणी श्रीविष्णूंचा वास असतो, असे मानले जाते. श्रीविष्णू ही चलनवलनाची, चेतनेची, वर्तमानकाळाची व तरंगांची, स्पंदनांची देवता आहे. श्रीविष्णूचे पूजन करण्याच्या निमित्ताने सकारात्मक होऊन आवळ्याच्या झाडाखाली बसावे, आवळे खावेत. इतर काही पदार्थ झाडाखाली शिजवून खावेत. यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहण्याचे फायदे तर मिळतातच, बरोबरीने एखादे सहभोजनही होते.

आयुर्वेदशास्त्रानुसार शारीरिक अवनतीला थांबवणारे अवस्था स्थापक द्रव्यांमध्ये आवळा सगळ्यात प्रधान आहे. याला शिवा (कल्याणकारी), वयस्था (अवस्थाला बनवून ठेवणारे), धात्री (आईसमान रक्षा करणारी) म्हटले आहे.
आवळा एक फळ देणारा वृक्ष आहे. हा सुमारे २० ते २५ फूटापर्यंत लांबीचा झाडीय वृक्ष आहे. हा आशियाव्यतिरिक्त युरोप व आफ्रिकेतही मिळतो. याची फळे सामान्यपणे छोटी असतात. परंतु प्रसस्कृत झाडावर थोडी मोठी फळे लागतात. याचे फळ हिरवे व गरयुक्त असते. हे तुरट स्वादाचे फळ आहे. भारतातील हवामान आवळ्याच्या शेतीसाठी सर्वांत उपयुक्त मानले जाते.
आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कँडी, आवळा मुरब्बा, आवळ्याचे लोणचे असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात. आवळा जुना झाला, पिकला, भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत. यात पाच रस असतात- मधुर, अम्ल, कटु, तिक्त व कषाय. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात. आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. आवळ्याच्या १०० ग्रॅम रसात ९२१ मिग्रॅ. आणि गरात ७२० मिग्रॅ. विटामीन-‘सी’ असते.

आवळे वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचे लाभ पुढे वर्षभर घेता यावेत, या हेतूने च्यवन ऋषींनी योजना केली ‘च्यवनप्राश’ या रसायनाची. छातीच्या विकारांवर या रसायनाचा फायदा होताना दिसतो. म्हणूनच या कोरोनाच्या महामारीमध्ये याचे नित्य सेवन करावे. जेवढे श्‍वसन चांगले असेल तेवढे अधिक प्राणशक्तीचे आकर्षण होते व तेवढाच अधिक प्राणिमात्रांचा प्राण असलेला प्राण शरीरात आकर्षित होतो. या प्राणामुळे पेशींना आवश्यक असणारे रसायन त्यांना मिळाल्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते. मनुष्याला शंभर वर्षे जगणे शक्य होते.
च्यवनप्राश जगप्रसिद्ध रसायन आहे. ज्या आवळ्यापासून च्यवनप्राश तयार होतो तो आवळा मुळात सर्वोत्तम रसायन असतो. आवळ्यापासून च्यवनप्राश हे एकच नाही तर इतर अनेक रसायने तयार केली जातात.

कार्तिक महिन्याच्या अंतापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत जेव्हा आवळा आपल्या रस, वीर्याने परिपूर्ण असतो तेव्हा झाडावरून हाताने तोडून गोळा करावा. झाडावर उत्तम पोसला गेलेला, रसवीर्याने परिपूर्ण झालेला आवळाच औषधात वापरणे अपेक्षित असते. याशिवाय उत्तम कसदार जमिनीमध्ये तयार झालेला; गंध-रूप व चव उत्तम असलेला; पुरेसा रस असलेला आवळाच रसायन म्हणून वापरण्यास योग्य असतो.
आवळ्याचे गुणधर्म –

  • आवळा शुक्र धातूला पोषक, रसायन गुणांनी परिपूर्ण असतो.
  • रुची वाढवणारा असतो
  • त्रिदोषांचे संतुलन करण्यास समर्थ असतो.
  • विशेषतः त्रिदोषांचे शमन करतो.
    लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्व धातूंना बलदायक आहे.

आवळ्याचे औषधी उपयोग –

  • तहान किंवा तोंडाला कोरड पडल्यास आवळ्याच्या रसाबरोबर चंदन व मध घ्यावा.
  • उलटी – मनुका, साखर व आवळा प्रत्येकी ४० ग्रॅम घेऊन त्याची चटणी करावी. त्यात ४० ग्रॅम मध व अडीच लीटर पाणी घालून ढवळावे व गाळून प्यावे. यामुळे उलटी थांबते.
  • उचकी – आवळ्याचा रस मध व पिंपळी घालून घ्यावा.
  • मूत्रावरोध (लघवी तुंबणे) – आवळा वाटून चटणीसारखी पेस्ट बनवावी. या आवळ्याच्या चटणीचा ओटीपोटावर लेप करावा. याने मूत्रावरोध दूर होतो.
  • लघवी करताना त्रास होणे – आवळ्याचा रस मधाबरोबर घ्यावा. आवळ्याचा रस गुळाबरोबर घ्यावा किंवा आवळ्याच्या रसातून वेलदोड्याचे चूर्ण घ्यावे.
  • लघवीतून रक्त येणे – आवळ्याचा रस मधाबरोबर घ्यावा.
  • योनी दाह – आवळ्याच्या रसात साखर घालून प्यावे.
  • केस काळेभोर करण्यासाठी ३ आवळे, ३ हिरडे, १ बेहडा, ५ आंब्यांचा गर व २० ग्रॅम लोहभस्म वाटून मिश्रण करून रात्रभर लोखंडाच्या कढईत ठेवावे. त्याचा लेप लावल्याने केस काळेभोर होतात.
  • स्थूलता – विडंग, सुंठ, यवक्षार, मण्डूर भस्म, जव व आवळा चूर्ण मधाबरोबर चाटावे. या उपायाने वजन कमी होते.
  • प्रमेह – हळद, आवळ्याचा रस व मध हे मिश्रण सर्व प्रकारच्या प्रमेहात उपयोगी आहे.
  • चतुर्थक ज्वरामध्ये आवळा, नागरमोथा व गुळवेल यांचा काढा घ्यावा.
  • सर्व तापांवर आवळा, हिरडा, पिंपळी, चित्रक व सैंधव याचे चूर्ण सर्व तापांवर उपयोगी आहे. तापात घसा सुकणे व अरुची – आवळा, द्राक्षे व साखर यांची चटणी करून तोंडात धरावी.
  • हृद्रोग – डाळिंबाचे दाणे- १ भाग, आवळा १ भाग व मूग ६ भाग एकत्र करून त्याचे कढण प्यावयास द्यावे.
  • ऍनिमिया – आवळा, लोहभस्म, सुंठ, मिरी, पिंपळी, हळद, मध व साखर यांचा अवलेह बनवावा. हा पांडूरोग व काविळीवर उपयोगी आहे. या उपायाने रक्त वाढते.
  • कावीळ – आवळ्याचा रस मनुकांबरोबर घ्यावा.
  • दाह – आवळा, द्राक्षे, नारळ व साखर यांचे सरबत प्यावे.
  • तारुण्यपिटिका – आवळकाठी, लोध्र किंवा वड, पिंपळ यांच्या सालींच्या काढ्याने चेहरा वारंवार धुवावा.
  • मूर्च्छा – उकडलेले आवळे, मनुका व सुंठ एकत्र वाटून मधाबरोबर चाटण केल्याने त्वरित शुद्धी येते.
  • दारू जास्त प्यायल्यामुळे होणार्‍या उपद्रवामध्ये आवळा, फालसा व खजूर यांचे हिम करून त्यामध्ये खडीसाखर घालून प्यावे.
  • डोळ्यांची आग होणे, डोळे दुखणे – शतावरी, नागरमोथा, आवळा, कमळ बकरीच्या दुधात घालून तूप सिद्ध करावे व १-१ चमचा दोन वेळा प्यावे.
  • झोप येत नसल्यास आवळकठी, सुंठ व खडीसाखर यांनी सिद्ध केलेली कण्हेरी घ्यावी.
    आवळ्याची रसायने –
  • आवळ्याचे चूर्ण व तिळाचे चूर्ण समभाग तूप व मधाबरोबर घ्यावे.
  • आवळकठीचे चूर्ण + अश्‍वगंधा चूर्ण तूप व मधाबरोबर घ्यावे.
  • आवळा चूर्ण २० ग्रॅम + गोखरू २० ग्रॅम + गुळवेल सत्त्व १० ग्रॅम तूप-साखरेबरोबर घ्यावे.
  • आवळ्याचा रस, मध, खडीसाखर व तूप ही द्रव्ये एकत्र करून खावी म्हणजे म्हातारपण लवकर येत नाही.
  • आवळा काळ्या तिळाबरोबर वाटून खाल्ल्यास चिरकाल तरुण राहता येते.
  • १ हिरडा, २ बेहडे व ४ आवळे मध व तुपाबरोबर खावे म्हणजे म्हातारपण लवकर येत नाही.
  • आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्या रसाची भावना द्यावी व ते चूर्ण तूप, मध व साखर यांजबरोबर चाटावे.
  • आवळ्याचे चूर्ण व सुवर्णाचा वर्ख एकत्र खलून मधाबरोबर चाटवावा. रोग्याची गंभीर परिस्थिती असून अरिष्ट चिन्हे असली तरी रोगी जगतो.
    अशा या आवळ्यापासून लाभ मिळविण्यासाठी राहत्या घराशेजारी लावायच्या झाडांमध्ये आवळ्याच्या दोन-चार झाडांचाही अवश्य समावेश असावा.