मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली व त्यांच्याशी राज्यातील बंद पडलेल्या खाणीसह गोव्यासंबंधीच्या अन्य विविध प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी अमित शहा यांनी गोव्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त केल्याचे सावंत यांनी सांगितले. येत्या ८ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात खाणीसंबंधीची सुनावणी होणार असून गोव्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी केंद्र सरकार आपल्या परीने शक्य ते सारे काही करीत असल्याचे शहा म्हणाले.
गोव्यात खाण उद्योग लवकर सुरू होईल असा विश्वास शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर आमच्या मनात निर्माण झाल्याचे सावंत यांनी दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. काल नवी दिल्लीत आपण अर्थमंत्र्यांच्या बैठकीतही भाग घेतल्याचे ते म्हणाले.