- प्रा. रमेश सप्रे
जीवन संस्कार- 15
भाग-4
‘व्रत’ ही स्वतः निवडलेली अनुशासनप्रणाली आहे. आत्मशिस्त नि त्यावर आधारित व्यवहार म्हणजे विचार, उच्चार, आचार, आहार आणि विकार यांच्यात विधायक परिवर्तन घडवण्यासाठी, जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी किंवा चांगला माणूस बनण्यासाठी व्रतांचा, उपवासांचा खूप उपयोग होतो.
प्रतिपदेपासून वाटचाल करत आपण द्वादशीपर्यंत पोचलो होतो. या चिंतनप्रवासात उरलेल्या तिथी म्हणजे त्रयोदशी- चतुर्दशी- अमावस्या- पौर्णिमा.
एकादशीचे व्रत हे दहा इंद्रिये (पाच ज्ञानेंद्रिये नि पाच कर्मेंद्रिये) आणि अकरावे मन यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी, त्यांना जास्त कार्यक्षम बनवण्यासाठी या व्रताचा खूप उपयोग होतो. ‘व्रत’ ही स्वतः निवडलेली अनुशासनप्रणाली किंवा जीवनशैली आहे. आत्मशिस्त नि त्यावर आधारित व्यवहार म्हणजे विचार (चिंतन), उच्चार (पारायण), आचार (वर्तन), आहार (आहारविहारातील विधिनिषेध) आणि विकार यांच्यात विधायक परिवर्तन घडवण्यासाठी, जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी किंवा चांगला माणूस (सुसंस्कृत व्यक्ती) बनण्यासाठी व्रतांचा, उपवासांचा खूप उपयोग होतो हे आता विज्ञानमान्य नि विज्ञानसिद्ध सत्य बनले आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. असो.
दशमीला दशेंद्रिये, एकादशीला मन, याच पद्धतीने द्वादशीला बुद्धी नि त्रयोदशीला चित्त (चिंतनक्षमता) जोडून एकादशी व्रतानं निर्माण झालेली शिस्त- शक्ती- शिक्षा (शिक्षण) जीवनात पुढेही चालू ठेवायची. हे एवढं सोपं आहे का? निश्चित नाही. म्हणून तर या तिथींचा (व्रतांचा) संस्कार निष्ठा, शिस्त, जिद्द, चिकाटी हा आहे.
दहा इंद्रियांतून बाहेरचे भोग आत (तनामनात) आणून भोगायचे असतात. इंद्रियं ही बहिर्गामी (बाहेर धावणारी), बहिर्मुखी (बाहेर वळलेली) असतात, त्यामुळेच बाहेरच्या जगातले- जीवनातले भोगविलास हेच त्यांचे केंद्र बनते. यातून शरीराला सुखदायी भोगांची, आरामाची सवय (चटक) लागते.
विज्ञान-तंत्रज्ञानाने निरनिराळी यंत्रे, साधने, माध्यमे इ. दिल्यामुळे जणू जीवनात ‘भोग नि भोगासाठी जीवन’ हे एकच उद्दिष्ट, ध्येय बनून राहिलंय. यातून सामान्य माणसाच्या जीवनात एक ‘सुखी क्षेत्र’ (आरामदायी वातावरण-) म्हणजे ‘कंफर्ट झोन’ तयार होतं. त्या कोशात किंवा शिंपल्यात राहण्याची एवढी चटक माणसाला लागते की तेच ‘सुखी क्षेत्र’ त्याला सदासर्वदा सर्वत्र हवं असतं.
पण या आरामदायी क्षेत्रातून बाहेर आल्याशिवाय मुक्तीचा आनंद उपभोगता येणार नाही. त्रयोदशीला दैनंदिन जीवनात चिंतनाचे प्रमाण वाढवायचे. हे चिंतन स्वतःबद्दल, जीवनाबद्दल, घरातल्या-बाहेरच्या संबंधित व्यक्तींबद्दल- आलेल्या अनुभवांबद्दल, भूत- वर्तमान- भविष्यकाळाबद्दल इ. इ. अनेकविध जीवनपैलूंबद्दल चिंतन करता येते. तसे ते केव्हाही करता येते, पण दोन्ही (शुद्ध नि वद्य) त्रयोदशींना हे खास करून करायचे असते. एक जीवनसंस्कार म्हणून.
अशा चिंतनासाठी संतांचे ग्रंथ, चांगले सकस वाङ्मय, उपासनेचे मंत्र इ. अतिशय प्रेरक असतात. तर त्रयोदशीचा संस्कार आहे चित्तातील चिंतनाचा. हल्ली मध्यमवर्गीयांकडे पर्याप्त वित्त (पैसा) असल्यामुळे काहींना उपभोगाचं पित्त होतं. त्यासाठी हवं शुद्ध, प्रसन्न चित्त!
पू. गोंदवलेकर महाराजांनी गीतेतील आवडता श्लोक सांगताना आठव्या अध्यायातील आठवा श्लोक सांगितला. या श्लोकातील जीवन-संस्काराच्या दृष्टीने तीन महत्त्वाचे शब्द म्हणजे- ‘अभ्यास’, ‘एकाग्र चेतस’ (चित्त) आणि मुख्य म्हणजे ‘अनुचिंतयन’- पुन्हा पुन्हा चिंतन करणे.
या जीवनाला उपकारक त्रिसूत्रीचा गंभीरपणे प्रयोग त्रयोदशीला करायचा. खरेच, संतांचे वाङ्मय आणि इतरही प्रतिभावंत लेखक-कवींच्या साहित्य-शास्त्र-कला-विनोद-अध्यात्म याविषयीच्या साहित्याचे वाचन-चिंतन करायचे. जमल्यास ‘स्वांतःसुखाय’ या सूत्रानुसार लेखनही करायचे.
चतुर्दशी ः उपासनेच्या दृष्टीने एक महत्त्वाची तिथी. देहाच्या पातळीवर कोणत्याही उपासनेची, साधनेची चतुर्दशीपर्यंतच प्रगती करता येते. पुढे अमावस्या किंवा पौर्णिमा गाठण्यासाठी गुरूकृपाच आवश्यक असते. शुद्ध पक्ष आपल्याला पौर्णिमेकडे (पूर्ण विकासाच्या अवस्थेकडे) नेतो, तर वद्य पक्ष आपल्याला क्रमशः अमावस्येकडे जाण्याची प्रेरणा देतो. दोन्हीकडे देहाच्या पातळीवरची प्रगती ‘चतुर्दशी’पर्यंतच असते. इथूनही साधकाचे पतन होऊ शकते. ‘आत्म्याची काळोखी रात्र’ (डार्क नाईट ऑफ दी सोल) इथेच अनुभवाला येते. कशातच अर्थ नाही असा अनुभव येऊन प्रगती खुंटते. सापशिडीच्या खेळातला सर्वात लांब साप शंभराच्या (मुक्तीच्या) जवळ असतो. त्यानं जर का गिळलं तर अगदी खाली पोचवलं जातं. यादृष्टीने चतुर्दशीचा संस्कार आहे सावधतेचा, सजगतेचा, दक्षतेचा. हे असेल तर मोक्ष किंवा निर्वाण यांची प्राप्ती (अनुभूती) होते, नाहीतर थबकलेपणाचा (स्टॅग्नेशन) अनुभव येतो किंवा चक्क अधःपातही होतो. सारं साधकाचा निग्रह नि सद्गुरूंचा अनुग्रह यावर अवलंबून असतं.
अमावस्या ः ही तिथी शून्यावस्थेची नाही तर साम्यावस्थेची निदर्शक आहे. सूर्य-चंद्र एकाच वेळी आकाशात असतात, कारण त्यांचे उदयास्त एकाच वेळी असतात. सूर्य ही बुद्धीची (विचार, ज्ञानाची) देवता आहे, तर चंद्र ही भावनांची (भक्तीची, प्रेमाची) देवता आहे. चंद्र हा मनाचा नि रसांचा (भावभावनांचा) स्वामी आहे, म्हणून तो दिसला नाही तरी त्याचा प्रभाव जाणवतो. कमी कमी होत होत निर्वाणाकडे जाण्याचा संस्कार अमावस्या घडवते. ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल’ या न्यायाने अमावस्येच्या पोटातच प्रकाशाकडच्या प्रवासाची प्रेरणा मिळते. हा सगळा भावार्थाचा विषय आहे. भाव म्हणजे हृदय किंवा मन (चंद्र) नि अर्थ म्हणजे मस्तक- या दोन्हींच्या संतुलनाचा संस्कार म्हणजे अमावस्या तिथी. इंग्रजीत या तिथीला ‘नो मून डे’ न म्हणता ‘न्यू मून डे’ म्हणतात. नाथ पंथ, इतर साधुसंन्यासी जे निर्गुणाची, निराकाराची, गूढ ब्रह्माची उपासना करतात ते निर्वाणाच्या निवांत गुहेत प्रवेश करतात.
पौर्णिमा ः केवळ चंद्राचीच नव्हे तर निसर्गातील, मानवी जीवनातील सर्व अनुभवांच्या पूर्ण विकासाची पौर्णिमा असते. पौर्णिमा म्हणजे पूर्णावस्था. ही सोळावी तिथी आहे म्हणून पूर्वी बंदा, पूर्ण रुपया सोळा आण्यांचा असे. भक्तीचा विकास प्रत्येक तिथीला होत असतो. ज्ञानोबा माऊली म्हणते ‘अवसेहून दिसे दिसे’ (प्रत्येक दिवसाला) चंद्रबिंब पौर्णिमेपर्यंत विकसत जाते.
पूर्ण चंद्राचा निसर्गातील तसाच मानवी देहातील सर्व रसांवर परिणाम होतो. सारे रस उसळून, उफाळून वर येतात. भरती भक्त सागराच्या पाण्याचीच नसते, तर मानस व्यवहारावरही होते. रक्ताचा प्रवाह उशिरा थिजतो. म्हणून पौर्णिमेला शक्य असेल तर शस्त्रक्रिया (सर्जरी) टाळतात. वेड्यांच्या इस्पितळातील काही वेडे हे नियंत्रणाबाहेर जातात. त्यांची खास काळजी घ्यावी लागते.
पौर्णिमेच्या प्रकाशात मन शांत करणारे (उत्तेजित करणारे नव्हे) गुण असतात. पौर्णिमेच्या प्रभावामुळे फळं जास्त रसरशीत होतात. यासाठी जे प्रयोग पाश्चात्य देशातील कृषिक्षेत्रात केले गेले त्यातून हे सिद्ध झाले. यासाठी प्रेरणा मिळाली ती गीतेतील एका श्लोकातून-
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वारसात्मकः ॥ श्लो. 13 ॥
अर्थ ः सोम म्हणजे चंद्र बनून निसर्गातील सर्व वनस्पतीतील (सृष्टीतील) रसांचं मी (भगवान) पोषण करतो.
या सर्व विवेचनाचा हेतू इतकाच की वनस्पती, जलाशय या सर्वांच्या रसांबरोबर मानवी भावभावनांचं पौषणही पौर्णिमा तिथी करते. कारण आपल्याला भावना व्यक्त करण्यासाठी अश्रू, घाम, जिभेतून स्रवणारी लाळ (सलाइव्हा) इ. रसांची (स्रावांची) गरज असते.
‘संस्कार तिथींचे’ हा कुठल्या ग्रंथात आलेला किंवा सुचवलेला विषय नाही. पण आध्यात्मिक उपासना, आरोग्य, मनबुद्धीची साम्यावस्था (संतुलन) अशा जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटकांसाठी तिथींचा प्रभाव असतो. त्यावर चिंतन करून हा प्रभाव स्वतःच्या जीवनात आणण्यासाठी काही मार्गदर्शन मिळू शकेल.
चिंतन हे ज्याचं-त्याचं स्वतंत्र असतं. पण अशा चिंतनातून आपल्या चिंतनाला दिशा नि प्रेरणा जरूर मिळू शकते. मानव हा एकमेव विचार करणारा म्हणजे चिंतनशील प्राणी आहे. यातूनच त्यानं एक विकसित संस्कृती नि सुधारणा उभी केलीय. असं चिंतन हे मानवी जीवनाचं ‘मानसशास्त्र’ ठरू शकेल. कारण यातून मनाचे व्यवहार (म्हणजे वर्तन) अधिक पद्धतशीर रीतीने पार पाडता येतील.
आजचा काळ हा सर्व दृष्टीने उलथापालथीचा आहे. व्यक्ती, कुटुंब, इतर सामाजिक संस्था यांना तडे (क्रॅक्स) जाऊ लागलेयत. मानवी संबंधांना जणू सुरुंग लागलाय. सारं जग एका तुफान प्रसंगातून (क्रायसिस) जातेय. अशावेळी सर्व जीवनाचा विचार करता संतांची सूचना महत्त्वाची आहे. ‘प्रसंग हा तुफान रे। प्रयोग प्रयत्न मान रे। अखंड सावधान रे, अखंड सावधान रे।’
‘प्रयोग-प्रयत्न-सावधानता’ या त्रिसूत्रीद्वारे सध्याच्या अभूतपूर्व तुफान प्रसंगाला सामोरं जाऊया.