अभ्यासानंतर कूळ – मुंडकार  दुरुस्ती विधेयक मांडणार

0
78

मगो पक्षाच्या आमसभेत निर्णय
राज्यातील कूळ – मुंडकार कायद्याबाबत मगो पक्ष लवकरच अभ्यास समिती नेमणार असून या समितीचा अहवाल सरकारला सादर केला जाईल. या समितीचा अहवाल सरकारने केलेल्या कायद्यातील विरोधात असल्यास पुढील अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडले जाईल असे मगो पक्षाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.ढवळी, फोंडा येथील भास्कर हॉलमध्ये आयोजित पक्षाच्या आमसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समितीचे सरचिटणीस फोंड्याचे आमदार लवू मामलेदार, खजिनदार आपा तेली, रोहिदास नाईक, ऍड. नारायण सावंत, गजानन तिळू नाईक, मोहन वेरेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आज गोव्यात प्रादेशिक पक्षाची गरज निर्माण झाली असून ही गरज केवळ मगो पक्षच पूर्ण करू शकतो, तिसर्‍या पक्षाचा पर्याय केवळ मगोच देऊ शकतो असे सांगून मगो भाजपसोबत युतीचा धर्म पाळील, असेही श्री. ढवळीकर यांनी स्पष्ट केले. मगो फक्त पक्षाची ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात असून एखादे अशक्त बाळ सशक्त बनवण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्यात चुकीचे ते काय असा प्रतिप्रश्‍नही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला.
मगोने आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत भाजपकडे युतीचा प्रस्ताव ठेवला असून पुढील निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम जोरात सुरू आहे. सुमारे ३६ हजार नवीन सदस्य पक्षात दाखल झाले आहेत. ही मोहीम पुढील वर्षभर सुरूच राहणार असेही श्री. ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात मगो पक्षाचे अस्तित्व आहे व ते कायम राहणार आहे. आजपर्यंत मगो पक्षाने खूप अन्याय सहन केले. मात्र, आता अन्याय झुगारून नवीन आव्हाने निर्माण करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मगो पक्ष बळकट करण्याची गरज असल्याचे केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्री. ढवळीकर म्हणाले. येत्या काही दिवसांत मगो पक्ष महिला अध्यक्ष तसेच युवा अध्यक्षांची निवड केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय समिती अध्यक्षपदी दीपक ढवळीकरांची फेरनिवड
या आमसभेत मगो पक्षाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष म्हणून दीपक ढवळीकर यांची तसेच मागील समितीचीही फेरनिवड करण्यात आली. यावेळी आमदार लवू मामलेदार, आपा तेली, रोहिदास नाईक यांनी आपले विचार मांडले.