अभ्यंगस्नानाचे महत्त्व

0
596
  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

नवीन तयार झालेले धान्य हे ऋतूत पचण्यास जड म्हणून निषिद्ध असले तरी आता प्रदीप्त झालेल्या जठराग्नीमुळे हे नवीन धान्य सहज पचू शकते. म्हणून नवीन भातांपासून तयार केलेले पोहे दिवाळीसाठी खास मेजवानी असते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास दिवाळीत सुरू केलेले अभ्यंग, उद्वर्तन व स्नानादि कर्मे अशीच वर्षभर चालू ठेवावी व आरोग्याची काळजी घ्यावी.

नेहमी अभ्यंगासाठी जे तेल वापरतो ते कुठलेही कंपनीचे महागडे तेल वापरण्याची गरज नाही. सर्व तेलांमध्ये तीळ तेल उत्तम. पण आपल्याकडे नारळाचे तेल मुलबक प्रमाणात उत्पन्न होत असल्याने घाण्यावर काढलेले नारळाचे तेल अभ्यंगासाठी वापरावे.

आयुर्वेदशास्त्र आणि भारतीय संस्कृती यांची सांगड प्रत्येक बाबतीत अनुभवास येते. प्राचीन काळापासून आपण उत्साहाने साजरी करीत असलेली दिवाळी हिवाळ्याच्या सुरुवातीला येते. दिवाळी हा सण आश्‍विन महिन्याचा शेवट व कार्तिक महिन्याची सुरुवात अशावेळी येतो. ‘ऑक्टोबर हीट’मधले तळपते ऊन हळुहळू कमी होऊन पहाटे चांगलाच गारवा जाणवू लागतो. मग पुढे पुढे थंडी वाढतच जाते व बोचरी थंडी जाणवते. गार वारा वाहू लागतो. बाह्य वातावरणातील या शैथ्याने शरीरावरील त्वचेचा संकोच होतो. घाम येईनासा होतो. त्वचेवरील रोमरंध्रेही संकुचित होतात. त्वचेवरील स्निग्धांश कमी होतो. त्वचा रुक्ष वाटू लागते. फुटल्यासारखी वाटते. म्हणूनच तर कोल्ड क्रीम्सच्या जाहिरातींचे प्रमाण वाढले आहे.

बाह्य मार्गाचा संकोच झाल्याने शरीरदोष अवरुद्ध होतो, तो वाढीस लागतो. शरीरात संचित होऊ लागते त्यामुळे जाठराग्नी अधिकाधिक प्रदीप्त होऊ लागतो. भूक वाढते व अधिक आहाराची इच्छा उत्पन्न होते. परंपरेनुसार व संस्कृतीनुसार घरोघरी तयार केले जाणारे दीवाळीचे पदार्थ आणि हिवाळ्यात आयुर्वेदानुसार खायला सांगितलेले पदार्थ एकमेकांशी तंतोतंत जुळतात. तसेच दिवाळीमध्ये सांगितलेले अभ्यंग स्नान हे विशेषतः त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

खरं तर अभ्यंग, उद्वर्तन आणि स्नान हे दिनचर्येमधील आपले नेहमीचेच उपक्रम आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले आहेत. या उपक्रमांचे आचरण नेहमीच करावे. पण आपण खास दिवाळी दिवशी शरीरास तेल लावून, थोडेसे उटणे लावून लगेच आंघोळ करतो. काही तर उटण्यातच थोडेसे तेल टाकतात व शास्त्र म्हणून किंचित आंगाला लावल्यासारखे करतात. आणि नंतर मग मोती साबण आहेच आंघोळीला! कोल्ड क्रीम, बॉडी लोशन, मोती साबण, डव्ह साबण इत्यादी पेक्षाही आयुर्वेद शास्रामध्ये कमी किंमतीचे म्हणजेच खीशाला परवडणारे, उत्तम प्रतीचे, आरोग्यपूर्ण असे अभ्यंग व उद्वर्तन सांगितले आहे व याचा उपयोग फक्त दिवाळीपुरती मर्यादित नसून संपूर्ण वर्षभर किंवा किमान चार-पाच महिने तरी करायचा आहे.

बदलत्या जीवनशैलीचा, आहार- आचरणाचा परीणाम म्हणून अनेकविध आजार सध्या जन्माला आले, म्हणूनच या आजारांना आळा घालण्यासाठी आपल्या प्राचीन ग्रंथकारांनी वर्णिलेले काही दिनचर्येचे व ऋतुचर्येचे पालन करायला सुरुवात करणे क्रमप्राप्त आहे. आपल्या स्वास्थ्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनामध्ये आचारावयाचे काही नियम ग्रंंथकारांनी ‘दिनचर्या’ या स्वरुपात वर्णिलेले आहेत व ऋतुमानाप्रमाणे त्यात करण्याचे बदल ‘ऋतुचर्या’ म्हणून वर्णन केलेले आहेत. दिनचर्येमध्ये एका दिवशी प्रातःकाळी उठल्यापासून पुन्हा दुसर्‍या दिवशी उठेपर्यंतच्या काळात आचारावयाची चर्या प्राचीन काळात अर्थार्जन, उद्योग-व्यवसाय या कामासाठी दिवसाचा बराचसा वेळ जसा आजच्या काळात द्यावा लागतो तशी परिस्थिती त्या काळी नव्हती व त्यामुळे दिनचर्येमध्ये अभ्यंग, नस्य, धूमपान, स्नान इत्यादी वैयक्तिक स्वास्थ्यरक्षणासाठी आचरावयाच्या कार्याचेच वर्णन प्रामुख्याने केलेले आहे. आजच्या गतिमान व अर्थप्रधान संस्कृतीच्या कालखंडात एवढा वेळ दिनचर्यापालनाला देऊन त्यांचे तंतोतन पालन करणे, व्यवहारात प्रत्येक व्यक्तीस शक्य होईल असे नाही, पण पूर्णतः वर्ज्य करणेही चुकीचे आहे. त्याने आरोग्याची हानी होते म्हणून साप्ताहिक सुट्टी, अन्य सुट्या, रिकामा वेळ तसेच दिवाळीपासून किमान आठ दिवसांतून एकदा तरी अभ्यंगादि कर्मे आचरण व्हावे.

अभ्यंग म्हणजे काय?…
अभ्यंग याचा अर्थ संपूर्ण अंगाला तेल लावणं, व्यावहारीक भाषेत यालाच मालीश करणे म्हणतात. यामध्ये रगडून- दाबून तेल लावणे अपेक्षित नाही. पण तरीही बरेच लोक भरपूर पैसेे मोजून मालिश करुन घेतात, तेही काही वर्षातून एकदा. खरं तर आयुर्वेद शास्रामध्ये जे अभ्यंग अपेक्षित आहे ते दररोज दिनचर्येमधील एक काम आहे त्यासाठी दुसर्‍या व्यक्तीची गरज नाही.

अभ्यंग कसे करावे?
शरीराला तेलाचे मर्दन करणे या क्रियेला अभ्यंग म्हणतात.
– नेहमी अभ्यंगासाठी जे तेल वापरतो ते कुठलेही कंपनीचे महागडे तेल वापरण्याची गरज नाही. सर्व तेलांमध्ये तीळ तेल उत्तम. पण आपल्याकडे नारळाचे तेल मुलबक प्रमाणात उत्पन्न होत असल्याने घाण्यावर काढलेले नारळाचे तेल अभ्यंगासाठी वापरावे.
– विशिष्ट रोगांसाठी अभ्यंग करताना उदा. कृश व्यक्तीचे बल वाढवण्यासाठी जर अभ्यंग करायचे असल्यास ‘बला तेला’ने मालिश करावे.
– आपल्या शरीराला रोज लागणारे तेल एका वाटीत घेऊन, तेल गरम करुन लावावे. तेल अग्नीवर ठेवून गरम करु नये. तेलाची वाटी एका गरम असलेल्या भांड्यावर ठेवावी. गरम भांड्यावरच्या उष्णतेने जेवढे तेलगरम होईल तेवढेच गरम तेल अंगाला लावावे. तसेच तेल एकदाच गरम करुन ठेवू नये. अभ्यंगासाठी वापरलेले तेल कोमट असावे.

– अभ्यंग सर्वांगालाच करावे. परंतु विशेषतः डोके व तळपायांना अवश्य करावे. तसेच कर्णपूरणही करावे. हातापायांना तेल लावताना ‘अनुलोम गतीने’ म्हणजेच आपल्या हाता-पायांना ज्या दिशेने लोम (लव) असतात त्या दिशेने तेल लावावे. छाती व पोट, गुडघे यांनी वर्तुळाकार तेल लावावे. अभ्यंगाचा स्नेह तीनशे मात्रां (सेकंद) पर्यंत केसांच्या मूळाशी, चारशे मात्रांनंतर त्वचेत, पाचशे मात्रानंतर रक्तात या क्रमाने प्रत्येक शंभर मात्रानंतर पुढील धातूत पोहोचतो. याचा अर्थ आयुर्वेद शास्रामध्ये कुठेच तेल रगडून चार-पाच तेलाने मालिश करावे असे सांगितले नाही. दररोज साधारण पंधरा ते वीस मिनिटे स्वतःसाठी काढून सकाळी सर्वांगाला कोमट तिळाचे /खोबरेल तेल लावावे. याची सुरुवात दिवाळीपासून करावी व ती तशीच पुढे चालू ठेवावी.
– आमदोष, अजीर्ण, नवज्वर असता अभ्यंग करू नये.

अभ्यंगाचे फायदे….

अभ्यङमाचरेन्नित्यं स जरागमवातहा|
दृष्टिप्रसादपुष्टमायु स्वप्नसुत्वक्त्वदार्घ्यकृत् |
– रोज अंगास तेलाचा अभ्यंग करावा. कारण अभ्यंग वार्धक्य, क्षय व वात यांचा नाश करतो. म्हणजे शरीराची झीज कमी होते. स्निग्धपणा वाढतो. बल वाढते. वाताचे रुक्षादि गुणांचे शमन होते. त्यामुळे सहज हालचाली करणे शक्य होते.
– दृष्टी प्रसादन होते. म्हणूनच पूर्वीचे लोक डोळ्यांतसुद्धा तेल घालायचे. आता जो ‘ड्राय आइज’चा त्रास आहे तो पूर्वी कधीच होत नव्हता. कित्येक डोळ्यांच्या त्रासांमध्ये ‘त्रिफला घृताचे तर्पण सांगितलेले आहे. तेसुद्धा तूपाने डोळ्यांचे केलेले अभ्यंगच आहे.
– अभ्यंगाने शरीराची पृष्टी होते. रोज अभ्यंग केल्याने तेल किंवा स्नेह सप्तधातूंचे पोषण करतो. त्यामुळे सर्व धातू सारवान होतात व शरीराला बल देतात.
– सर्व धातूंची योग्य तर्‍हेने पुष्टी झाल्याने, इंद्रियांचे तर्पण झाल्याने, ओजाचे वर्धन होते व आयुष वाढते.
– पादाभ्यंगाने पायांना स्थैर्य होते, डोळ्यांना गारवा येतो व झोप शांत लागते.
– अभ्यंगाने वाताचे शमन होते. त्वचा मृदू व कांतिमान होते. त्वचेला सुरकुत्या पडणे, केस पिकणे, दृष्टी मंद होणे ही वार्धवयाची लक्षणे लवकर येत नाही.
आपल्या संपूर्ण शरीराला व्यापून असणारी त्वचा हे सर्वांत मोठे स्पर्शेन्द्रिय आहे. हे त्वचा फक्त आपल्या अवयवांचे संरक्षण करत नाही तर ‘स्पर्शाचे’ ज्ञान ह्याच ज्ञानेंद्रियाने होते म्हणूनच त्याची काळजी घेणं आवश्यक आहे.

उद्वर्तन (उटणे) का लावावे?…
दिवाळीत तेल लावल्यानंतर आंघोळी अगोदर उटणे लावतात. तेल लावल्यानंतर त्यावर उटणं चोळल्यास तेलाचा अतिरिक्त अंश निघून जातो. त्वचा स्वच्छ होते.
औषधी वनस्पतीयुक्त शास्रीय पद्धतीने बनवलेलं उटणं उत्तम परिणाम देत.ं तेल लावल्यानंतर कोरडं उटणं चोळून लावल्यास इच्छित परिणाम दिसतात.
उटण्यासाठी तिक्त- कषाय रसात्मक वनस्पती द्रव्यांचा वापर करून उटणे बनवावे. वर्णप्रसादक गणातील द्रव्यांचा वापर करुन उटणे बनवावे. आमलकी, निंम्ब, मंजिष्ठा, जेष्ठगध, चंदन, तगर, लोध्र इत्यादी द्रव्यांचा वापर करावा. उटणे हे नेहमी आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेलेच असावे. नाहीतर बर्‍याच वेळा बाजारात मिळणारे उटणे हे मातीसारखेच असते.

उटणं ओलं करुन वापरु नये. ते कोरडच चोळावे. तेलकट त्वचा असणार्‍या व्यक्ती कायम उटणं वापरु शकतात. ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी हिवाळा संपला की उटणं वापरणं बंद करावं.
उद्वर्तनं कफकरं मेदसः प्रविलापनम्‌|
स्थिरीकरणमजांना त्वक्प्रसादकरं परम्‌॥
अभ्यंगानंतर व्यायाम करुन घामामुळे अंगाला आलेला चिकटपणा घालविण्यासाठी स्नानापूर्वी कषाय रसात्मक व सुगंधी द्रव्यांच्या चूर्णाचे उटणे अंगाला चोळावे. त्यामुळे कफ व मेदाचेही विलयन होते.
शरीरामध्ये ज्यांच्या अतिरिक्त मेद साचलेला आहे व लठ्ठपणा आलेला आहे, चरबी साचून थुलथुलितपणा आलेला आहे त्यांनी मेदपाचक द्रव्यांनी युक्त उटणे घासावे. ज्याने चरबी हळुहळू वितळू लागते व परिणाम मेद व वजन कमी होण्यास मदत होते. लठ्ठ माणसांनी उटण्याचा नेहमी वापर करावा.

उटण्याच्या वापराने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्वचेवरचं तेज आणि त्वचेचा पोत टिकून राहण्यासाठी उटण्याचा उपयोग होतो. तसेच उटणे लावण्याने रंगही उजळतो. सुरकुत्या लवकर पडत नाहीत. त्वचा सुंदर तजेलदार, टवटवीत आणि तरुण राहण्यास मदत होते. त्वचा स्वच्छ होते.
कफ व मेद झडल्याने शरीर सुदृढ, वांधेसुद होते. उटणं लावून झालं की छान गरम सोसवेल अशा पाण्याने आंघोळ करावी.

स्नान –
दीपनं वृष्पमायुष्यं स्नानमूर्जाबलप्रदम्‌|
कंडूमलश्रमस्वेदतंद्रातृड्‌दाहपाप्मजित्‌॥
अभ्यंग – उटणे लावल्यानंतर कोमट पाण्याने स्नान करावे. तेल घालवण्यासाठी कुठल्याही साबणाची गरज नसते. उटण्याने संपूर्ण अंगाला आलेला चिकटपणा निघून जातो. गळ्याखाली उष्ण जलाने व मातेच्या वर कोमट जलाने स्नान करावे. शिरोभागी उष्ण जल वापरल्यास केस व डोळ्यांची शक्ती क्षीण होते.

स्नानामुळे अग्नीदीप्ती, ऊर्जा व बल वाढून आयुष्याचे वर्धन होते. त्वचेवरील कंडू, स्वेद नष्ट होऊन आम, तृष्णा, दाह, त्वचाविकार यांचा नाश होतो. जलाच्या शीतोष्णतत्वाचा विचार ऋतुमानानुसार करावा लागतो. शीतकाली उष्ण जलाने स्नान केल्याने कफ व वातवृद्धी होत नाही व उष्ण काळी शीत जलाने स्नान केल्याने पित्तवृद्धी होत नाही. व्यायामानंतर अर्ध्या तासाने स्नान करावे.

शैत जसजसे वाढत जाईल तसतसेकेवळ स्नानासाठीच नव्हे तर सर्वत्रच उष्णोदकाचा प्रयोग करावा. स्नान सकाळी लवकर करणे हितावह ठरते. म्हणूनच या ऋथुतील कार्तिक महिन्यात करावयाच्या कार्तिक स्नानाला महत्त्व आहे.

दिवाळीतील आहार –
बाहेरील थंड वातावरणामुळे जाठराग्नी अधिकाधिक प्रदीप्त होतो. भूक वाढते व अधिक आहाराची इच्छा उत्पन्न होते. म्हणूनच दिवाळीमध्ये इक्षुविकृती व दुग्धविकृतीची रेलचेल असते. इक्षुविकृती म्हणजे साखर-गुळाचे गोड-धोड पदार्थ व दुग्धविकृती म्हणजे दुधापासून उत्पन्न होणार्‍या मिठाया- बासुंदी, खवा, पेढे, गुलाबजाम, बर्फी व दुधापासून बनविलेले पदार्थही भरपूर खावेत. खारीक, काजू, पिस्ता, बदाम, जर्दाळूसारख्या सुक्या मेव्यांचेही अधिक सेवन करता येते.
चकली, कडबोळी, करंज्या, शंकरपाळे, अनारसे यांसारखे तेलकट पदार्थही पचतात. नवीन तयार झालेले धान्य हे ऋतूत पचण्यास जड म्हणून निषिद्ध असले तरी आता प्रदीप्त झालेल्या जठराग्नीमुळे हे नवीन धान्य सहज पचू शकते. म्हणून नवीन भातांपासून तयार केलेले पोहे दिवाळीसाठी खास मेजवानी असते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास दिवाळीत सुरू केलेले अभ्यंग, उद्वर्तन व स्नानादि कर्मे अशीच वर्षभर चालू ठेवावी व आरोग्याची काळजी घ्यावी. या काळात भरपूर खाणे, पिणे व व्यायाम हे आरोग्यदायक आहे.