अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन

0
213

‘मोरूची मावशी’ या नाटकातील ‘मावशी’ अजरामर करणारे, अस्सल विनोदांमधून रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे काल पहाटे निधन झाले. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील तारा निखळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

४० वर्षे चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटविणार्‍या विजय मामांनी आजवर अनेक नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विशेष म्हणजे त्यांची मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही नाटके प्रचंड गाजली. आतापर्यंत त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वहिनीची माया’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. रानफूल, लाइफ मेंबर या मालिकाही गाजल्या.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित
चव्हाण यांना काही महिन्यांपूर्वीच चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. २०१७ चा ‘संस्कृती कलादर्पण’च्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. याशिवाय, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
दरम्यान, विजय चव्हाण यांच्यावर मुलुंड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसोबत मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार उपस्थित होते. त्यांचा मुलगा वरद चव्हाणने पार्थिवाला मुखाग्नी दिला. महेश कोठारे, अंकुश चौधरी, अलका कुबल, सुशांत शेलार, भरत जाधव यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. अंत्ययात्रेला त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.