अफगाणिस्तानात सत्तास्थापनेची तालिबानची तयारी

0
40

>> उपनेता मुल्ला अब्दुल बरादार काबूलमध्ये परतला

अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारा तालिबानचा उपनेता मुल्ला अब्दुल गनी बरादार काबूलला परतला असून तोच आता अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो. तसेच बरादार अफगाणिस्तानात आल्यामुळे आता तालिबान सत्तास्थापनेची तयारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुल्ला बरादार याला तालिबानचा नायक मानले जाते. बरादार सध्या दोहा येथे तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे. तालिबानचा सहसंस्थापक आणि मुल्ला उमरचा सर्वात विश्वासू कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादारला २०१० मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे अटक केली होती. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर आणि तालिबानशी झालेल्या करारानंतर, पाकिस्तानने २०१८ मध्ये त्याला सोडले. मुल्ला उमर आणि मुल्ला बरादार यांनी तालिबानची स्थापना केली.

तालिबानने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे वचन दिले. काबूलमध्ये पत्रकार परिषदेत प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद याने, महिलांच्या हक्कांचे संरक्षण इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत केले जातील असे सांगितले. तसेच देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले होते. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अजून लढाई संपली नाही ः सालेह
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेल्याचे आख्ख्या जगाने मान्य केले असतानाच अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी मी देशाचा काळजीवाहू अध्यक्ष असून अजून लढाई संपलेली नाही असे ट्विट केले आहे. मी सध्या माझ्या देशातच आहे. आणि मी देशाचा कायदेशीररीत्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहे. मी सर्व नेत्यांशी चर्चा करून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतो असल्याचे सालेह यांनी म्हटले आहे. यावेळी अमरुल्लाह सालेह यांनी आपण तालिबान्यांपुढे कदापि शरणागती पत्करणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

हेरात शहरात शाळा सुरू
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तिथल्या मुली आणि स्त्रियांच्या मुलभूत हक्कांविषयी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र पश्चिम अफगाणिस्तानच्या हेरात शहरात शाळा सुरू झाल्या असून काल मुली शाळेत पोहोचल्या. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर काही ठिकाणी पुन्हा शाळा उघडण्यात आल्या. पांढरे हिजाब आणि काळे कपडे घातलेल्या या मुली शाळेत आल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली
सलग दुसर्‍या दिवशी बैठक

अफगाणिस्तानधमील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची काल बुधवारी पुन्हा बैठक घेतली. अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख समाजाला सुरक्षा निश्चित करण्याच्या सरकारच्या रणनीतीचा आढावा पंतप्रधान मोदींनी या बैठकीत घेतला. अफगाणिस्तामधील वेगाने बदलत असलेल्या घाडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची ही दुसरी उच्चस्तरीय बैठक आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी संध्याकाळी सीसीएसची बैठक घेतली होती.

या बैठकीला बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. मिश्रा, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि कॅबिनेट सचिव राजीव गौबा उपस्थित होते.