Home बातम्या अपार महिमा भतग्रामच्या ‘नवा सोमवार’ उत्सवाचा!

अपार महिमा भतग्रामच्या ‘नवा सोमवार’ उत्सवाचा!

0

– रमेश सावईकर

सनातन वैदिक हिंदू धर्मात देव-देवतांच्या विधिवत पूजा-अर्चेला अनन्य साधारण महत्त्व आहे. परमेश्‍वरांप्रति आपली भक्ती-भावना व्यक्त करण्याकरिता देव-देवतांची प्रार्थना करणे योगायोगाने आलेच. देवदेवतांना मूर्तस्वरूपात पाहता यावे म्हणून मूर्ती बनवून त्यांची प्रतिष्ठापना करून, त्यांत देव-देवतांना चैतन्य स्वरूप प्राप्त करून देण्याकरिता देवालये किंवा मंदिराची उभारणी केली जाते. देवापुढे विनम्र भावनेने नतमस्तक होऊन त्याची भक्ती करणे, त्याच्याकडे आपले जीवन सुखकर, आनंदी बनविण्यासाठी प्रार्थनेच्या रूपात आळवणी करणे हा श्रद्धा – भक्तीचा एक अविभाज्य घटक म्हणावा लागेल.

गोवा ही परशुराम भूमी. देव-देवतांचे वास्तव्य लाभलेली. हिंदू धर्म, भक्ती – भाव, संस्कृती यांचे मनोज्ञ दर्शन घडविणारी पवित्र भूमी. फार प्राचीन काळापासून देव-देवतांच्या वास्तव्याने पुनीत झालेली! हिंदू धर्माचे रक्षण करण्याकरिता इतिहास घडविणारी भूमी. गोमंतभूमीत हिंदू देवतांची मंदिरे प्रत्येक गावात आढळतात. काही मंदिरांना प्राचीन काळापासूनच्या ऐतिहासिक परंपरेची पार्श्‍वभूमी लाभलेली आहे. गावातला देव किंवा आराध्य दैवत म्हणून देवतेला ग्रामदेव – ग्रामदेवीचे स्थान हिंदू धर्मीय लोकांच्या मनात – हृदयात आहे. ग्रामदेवाच्या कृपेने आपलेच नव्हे तर संपूर्ण ग्रामाचे भले व्हावे, ग्रामवासियांचे जीवन सुखी – समृद्ध व्हावे या भक्ती – भावनेपोटी ग्रामदेवतांचे विविध उत्सव मोठ्या थाटात साजरे करण्याला प्राधान्य दिले जाते.

‘भतग्राम’ या नावाने पूर्वी ओळखल्या जाणार्‍या भातांच्या डिचोली नगरीला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. श्रीशांतादुर्गा हे भतग्रामाचे ग्रामदैवत. उपलब्ध माहितीनुसार १३ व्या शतकात श्री शांतादुर्गा भतग्रामी अवतरली असावी. १७ व्या शतकात १६६६-६७ दरम्यान नार्वे – डिचोली येथील ऐतिहासिक श्री सप्तकोटेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्याच दरम्यानच्या काळात भतग्रामी छत्रपती शिवाजीचे अल्प वास्तव्य होते. त्याकाळी श्रीशांतादुर्गा ही भतग्रामची ग्रामदेवी म्हणून ओळखली जात असे. मंदिराला ४०० वर्षे होत आली असावी. तथापि श्री शांतादुर्गा दैवताला बर्‍याच पूर्वकाळाची पार्श्‍वभूमी असावी. उत्सवाच्यावेळी भक्तगणांच्या भक्तीला उधाण येते. नवचैतन्याने त्यांची भक्ती – भावना असीम होते. आपल्या आराध्य दैवताला सजवून, मनोभावे पूजा – अर्चा करून सुशोभित आसनावर बसवून त्या मूर्तीची सजविलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्याची परंपरा हिंदू धर्मात हजारो वर्षांपासून चालत आली आहे. ‘पालखी’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘पा-लंका’ (पलंग) या शब्दावरून मराठीत आला आहे. ‘पालखी’चा उल्लेख ‘रामायण’ काळातही वाङ्‌मयामध्ये आढळतो. पालखी मिरवणुकीची परंपरा महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन १ हजार वर्षे लोटली. वारकरी संप्रदायाने पालखी मिरवणुकीच्या परंपरेला नवी झळाळी दिली. ‘ज्ञानोबा – तुकाराम’ असा गजर करीत ज्ञानोबा – तुकारामाची पालखी पंढरपूरला नेण्याची प्रथा संत तुकारामाचे कनिष्ठ पुत्र नारायणबाबा यांनी १६८५ मध्ये सुरू केली. ‘पालखी’च्या निमित्ताने भक्तगण मनोभावे एकत्र येतात. समाजाच्या सहभागाने पालखीला सामाजिक स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय नारायणबाबांकडे जाते. पुढे १८३० मध्ये देहूहून संत तुकारामाची आणि आळंदीहून संत ज्ञानेश्‍वराची अशा दोन वेगळ्या पालख्या दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जातात. पंढरपूरला ४३ ठिकाणांहून वेगवेगळ्या देव-देवतांच्या पालख्या येतात.

गोव्यानेही पंढरपूरची वारी करण्याची परंपरा जतन केली आहे. गेल्या चार वर्षांपासून मुळगाव – डिचोली आणि माशेल – फोंड्याहून देवतांच्या पालख्या – दिंडी पंढरपूरला नेण्याची परंपरा नव्या – जुन्या पिढीतील भक्तगणांनी पुनश्‍च सुरू केली आहे. पालखी मिरवणुकीची परंपरा देव- देवतांच्या पालखी उत्सवानिमित्त जतन करण्याचे कार्य आजही चालू आहे. डिचोलीच्या श्री शांतादुर्गा देवीचा पालखी उत्सव तर वार्षिक प्रमुख उत्सव मानला जातो. त्यामागे हाच भक्तिभाव अधिक असावा. डिचोलीच्या श्रीशांतादुर्गा देवीची पालखी मिरवणूक दर सोमवारी शहरांतून काढण्यात येते. चतुर्मासात पालखी मिरवणूक बंद ठेवली जाते. कार्तिकी पौर्णिमेने ‘चतुर्मास’ संपतो. त्यानंतर येणारा पहिला सोमवार हा ‘नवा सोमवार’ (नवो सोमार) या नावाने संबोधला जातो. भक्तिभावाची उधळण करीत, नवा जोम, नवा उत्साह, नवा साज, नव-चैतन्य घेऊन येणारा ‘नवा सोमवार’ उत्सव भतग्रामवासियांना आनंदाची उभारी आणतो. पूर्वी नवा सोमवार साध्या पद्धतीने भजनाच्या दिंडीसहित पालखी मिरवणूक काढून साजरा व्हायचा. कालांतराने त्याचे स्वरूप पालटत गेले तरी परंपरा जतन केली जात आहे हे विशेष!

भगवत भक्ती म्हणजे धार्मिक विधी, अभिषेक, पूजा-अर्चा, आरत्या, भजन, सामूहिक प्रार्थना, संगीत कार्यक्रमाची मेजवानी ह्या सार्‍या गोष्टी पारंपरिक रीती-रिवाजानुसार आल्या. देव-देवतानांसुद्धा संगीत – नृत्य आदीची ओढ होतीच. तद्वत त्या हेतूने म्हणा किंवा भक्तगणांच्या इच्छा – लालसेपोटी म्हणा संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर डिचोलीवासियांनी विशेष प्राधान्य दिले आहे.

डिचोलीतील सर्व हिंदू भाविक ‘नवा सोमवार’ उत्सवदिनी मांगल्यस्नान करून श्रीशांतादुर्गा देवीचे दर्शन घेऊन तिच्या चरणापाशी विनम्रभावे लीन होतात. सुवासिनी देवीची खणा – नारळाने ओट्या भरून देवीला प्रार्थना करतात. हजारो भक्त भाविकांची रीघ श्री शांतादुर्गा मंदिराकडे लागते. सजविलेली श्री शांतादुर्गेची शांतस्वरुप मूर्ती, रंगरंगोटीने नवी झळाळी घेतलेले सुंदर मंदिर, मंगलमय वातावरणाने प्रसन्नतेला बहर आलेले चैतन्यपूर्ण आनंदवर्धक दृश्य भक्तगणांचे मन तृप्त करते.

आसमंतात दुमदुमणारा घंटानाद, सुगंधी उदबत्त्यांचा सुवास, विविध फुलांच्या दर्पाचा दरवळ, भक्तगणांची देवतेप्रती लीनभावना, त्याच्या चेहर्‍यावर उमटणार्‍या आनंदरेषा, एकमेकांवरती पडणारे स्मितहास्याचे हलके – फुलके कटाक्ष, मंदिराबाहेर फुलेफळे विक्रीसाठी रांगेत, भक्तगणांच्या मागे ‘फुलां घे’ म्हणून छोटेखानी ललकारी देणार्‍या बायका – मुले…, मंदिराबाहेर चेंडू – खेळणीसाठी वडीलधार्‍यांचा हात धरून खेळणी दुकानांकडे त्यांना नेणारी छोटी मोठी बागडणारी मुले…, तोंडात आईसकँडी चघळत तृष्णा भागविणारी मुले…., हे सारे मनाला आनंद देणारे, क्षणार्धात आपणाला बालपणीच्या स्मृती झोक्यावर घेऊन जाणारे दृश्य पाहिले, अनुभवले की वाटते, ‘‘नवा सोमवार’चे रूप न्यारे, त्यांत हसते नवचैतन्याचे वारे!’’

या उत्सवानिमित्त रात्रौ देवीची पालखी मिरवणूक भजनाच्या दिंडीसह शहरातून नेण्यात येते. घरोघर पालखीचे स्वागत करण्यासाठी आकर्षक सजावट, दीप प्रज्वलन करून यजमान मंडळी नि सुवासिनी सज्ज असतात. गावकरवाडा – डिचोली येथील ग्रामस्थ गावकर मंडळीतर्फे काढण्यात येणारी पालखी मध्यरात्रीनंतर मंदिरात परत पोचते. तर मठ मंदिरातून संचलनार्थ काढली जाणारी पालखी सर्व पेठांतून फिरून दुसर्‍या दिवशी सकाळी मठ-मंदिरात पोचते. ‘आम्ही पालखीचे भोई’ या भावनेने भक्तगण मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होतात.

नामवंत प्रसिद्ध गायकाचे संगीताचे कार्यक्रम हे या उत्सवाचे आणखी एक आकर्षण! श्री शांतादुर्गा मंदिराच्या प्रांगणात रात्रौ १०.३० वा. पहिली गायनाची बैठक, दुसरी बैठक मध्यरात्रीनंतर श्री महादेव मंदिराच्या प्रांगणात होते. दोन गायकांच्या कार्यक्रमाद्वारे भक्ती-भाव, नाट्यगीतांचा नजराणा संगीतप्रेमींना लाभतो. मठ – मंदिरात पहिली व भायली पेठ येथे दुसरी अशा दोन स्वतंत्र गायनाच्या बैठकांचे आयोजन बाजारकर मंडळीतर्फे केले जाते. एकाच संपूर्ण रात्री तब्बल ४ गायक-कलाकारांच्या गायनाचा आस्वाद घेण्याची पर्वणी संगीतप्रेमींना लाभते.

भतग्राम ही कलाकारांची भूमी. त्या कलाकारांमध्ये संगीत, चित्रकला, रांगोळी आदी कला आल्या. आपल्या कलेच्या फुटलेल्या अंकुराचे, कलाकृतीचे दर्शन लोकांना व्हावे या प्रांजळ हेतूने या नगरीतील ज्येष्ठ, नवोदित कलाकार प्रदर्शने आयोजित करतात. गावकरवाडा येथे रांगोळी कलाकार अर्जुन श्रीरंग परब व त्यांची कन्या सिद्धांती परब यांचे रांगोळी प्रदर्शन दरवर्षी एक लक्षवेधी आकर्षण बनून राहिले आहे. रांगोळी चित्रातून ताज्या घडामोडींचा मार्मिकपणे वेध घेणारे अर्जुन परब यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. नव्या पिढीतील कलाकारांना उत्तेजन देण्याकरिता ग्रामस्थ गावकर मंडळीतर्फे गावकरवाडा येथील कोमुनिदाद सभागृहात गोवा राज्य पातळीवर कला प्रदर्शन भरविले जाते. याशिवाय शैक्षणिक संस्था विज्ञान प्रदर्शने आयोजित करतात. संपूर्ण नगरी झगझगीत साज चढविते. विद्युत प्रकाशाच्या लखलखाटात न्हाऊन निघते. आकर्षक रोशणाईच्या रंगीबेरंगी छबी स्वरूपात भतग्राम नगरीला दर्शन घडते ते फटाकेबाजी नि दारूकामाच्या आतषबाजीचे!

उत्सवाच्या निमित्ताने नगरीत रस्त्यांच्या दुतर्फा भव्य फेरी भरते. खेळणी, फुगे, खाजे, लाडू, रेवड्या यांची दुकाने, चणे-फुटाण्यांची विक्री करणारे सायकलवाले, मुलांना रेल्वेवारी, ‘मेरी गो राउंड’चा अनुभव घेण्याची संधी देणारे सर्कसवाले… हे सारे दृश्य टपोर्‍या डोळ्यांनी टिपायचे, अनुभवायचे, आस्वाद घ्यायचा, आनंदी व्हायचे नि नव्या सोमवारचा, जीवन सुख समृद्धीसाठी देवभक्ती भावाचा भुकेलेला, हा नित्य नवा भासणारा, आठवणारा नवसंदेश मनात साठवीत तृप्त व्हायचे, पुढच्या नवा सोमवारच्या प्रतीक्षेत….!