अनुसूचित जाती-जमातींची पुनर्गणना व्हावी…

0
186
  • शंभू भाऊ बांदेकर

राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष एम. मुरुगन यांनी नुकतीच गोव्याला भेट दिली. या भेटीत गोव्यातील अनुसूचित जाती – जमातींच्या नागरिकांची योग्य आकडेवारी मिळवण्यासाठी त्यांची पुनर्गणना करण्याची मागणी त्यांनी केली आहे…

गोवा राज्याला नुकतीच भेट दिलेल्या राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमातीच्या आयोगाचे उपाध्यक्ष एल. मुरुगन यांनी गोव्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांची योग्य आकडेवारी प्राप्त करण्यासाठी २०११ च्या जनगणनेनुसार पुनर्गणना करावी, अशी सूचना गोव्यातील सरकारी अधिकार्‍यांना केली आहे. यावेळी समाजकल्याण खात्याचे सचिव व समाजकल्याण खात्याचे अधिकारीही उपस्थित होते, असे कळले; पण या बैठकीस सरकारचे मुख्य सचिव व दलित संस्थांचे प्रतिनिधी हजर असते, तर दलितांची ही जुनी रास्त मागणी जास्त नेटाने पुढे नेता आली असती व राज्यातील दलितांच्या इतर मागण्यांवरही प्रकाशझोत टाकता आला असता. पण कदाचित सरकारलाच दलितांच्या मागण्यांचे वावडे असावे, असे वाटते.

वस्तुतः सात-आठ वर्षांपूर्वी तत्कालीन समाजकल्याणमंत्री सुदिन ढवळीकर यांनी संबोधित केलेल्या दलित संघटनाच्या बैठकीत ही मागणी मी केली होती व अनुसूचित जाती-जमातींची जनगणना करताना त्या त्या भागातील स्थानिक जाती-जमातीचा प्रतिनिधीही बरोबर घ्यावा, म्हणजे सरकारी कर्मचारी वर्गालाही त्याची मदत होईल व गणनाही बिनचूक होईल असेही सांगितले होते.

उपस्थित दलित संस्थांच्या प्रतिनिधींनी व विशेष म्हणजे मा. समाजकल्याणमंत्र्यांनीही या सूचनेचे स्वागत केले होते; पण दुर्दैवाने अजूनही ही मागणी धसास लागू न शकल्यामुळे श्री मुरूगन यांना या मागणीची री ओढावी लागली आहे. आता या कामाची अंमलबजावणी व्हायला आणखी किती काळ लागतो ते बघावे लागेल.
श्री मुरूगन यांनी या बैठकीत गोव्यातील अनुसूचित जाती व जमातींसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी करून घेतली. तेव्हा सरकारी अधिकार्‍यांनी विविध योजनांची माहिती देत येथे सगळे काही आलबेल आहे, असे चित्र त्यांच्यासमोर उभे केले; पण श्री मुरूगन त्यांना पुरून उरले. अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ८% असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधितांची कानउघडणी करून याबाबत गंभीरपणे पावले उचलण्याची सूचना केली आहे. सरकारी अधिकारी यासाठी केव्हा गंभीर पावले उचलतात ते पाहावे लागेल.

आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी जवळ येत आहे. (३० जानेवारी) सध्या महात्मा गांधीजींना ‘चतुर बनिया’ म्हणणार्‍यांची केंद्रात व गोव्यासह अनेक राज्यांमध्ये सत्ता आहे. ते यावेळी गांधीजींचा उदोउदो करतीलच, पण जातीयता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे, तो जितक्या लवकर पुसला जाईल तितक्या लवकर या देशात एकोपा व समानता नांदेल असे म्हणणार्‍या व आपले आयुष्य अस्पृश्येता निर्मूलनासाठी खर्च करणार्‍या गांधीजींची प्रसिद्ध विचारवंत व इतिहास संशोधक रामचंग्र गुहा यांनी उद्धृत केलेली गोष्ट येथे सांगावीशी वाटते, ती अशी-
भारताला स्वातंत्र्य देण्याआधी इंग्लंडच्या राणीसाहेबांनी भारतात कॅबिनेट मिशन पाठविले होते. कॉंग्रेसचे प्रमुख नेते त्यावेळी मुद्दाम दिल्लीमध्ये स्वागतास हजर होते. महात्मा गांधींनी कॅबिनेट मिशनशी बोलावे, असे या नेत्यांचे मत पडले. मग त्यांनी ही कामगिरी गांधीजींचे अनुयायी जी. डी. बिर्ला या उद्योगपतींकडे सोपवली. गांधीजींनी ते मान्य केले, पण एका अटीवर. त्यांनी बिर्ला यांना सांगितले की, ‘मी सध्या जात-निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे. ते सोडून यावे लागेल. पण तुमचे म्हणणेही मला मान्य आहे. मी दिल्लीत यावे असे आपणास वाटत असेल, तर मी दिल्लीमध्ये दलित हरिजन वस्तीत मुक्काम करीन. त्यांच्या बरोबर तेथे राहीन. बिर्लांसह सर्व कॉंग्रेस नेत्यांना ही गोष्ट मान्य करावी लागली.

त्यासाठी मग बिर्ला यांनी सरकार व महापालिकेशी बोलून दलितवस्ती चकाचक केली व तेथे पाणी व विजेची व्यवस्था करण्यात आली. दलित वस्तीत प्रवेश केल्यावर गांधीजींच्या हे लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी संबंधितांना सांगितले, स्वच्छता, वीज, पाणी यांची सगळ्यांनाच गरज आहे व पुढे बजावले, ही स्वच्छता, वीज व पाणी येथे कायम असेल तरच मी येथे थांबतो.’ अर्थात संबंधितांना हे मान्य करावे लागले.

गांधीजींच्या या गोष्टीची तुलना करताना श्री. गुहा यांनी एक उदाहरण दिले आहे. भारतीय सीमेवर लढताना उत्तर प्रदेशातील राज्यातील एका जवानाचा बळी गेला. भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्या जवानाच्या घरी भेट देण्याचा कार्यक्रम ठरला. त्यासाठी मग नगरपालिकेने त्या विभागातील रस्त्यांची दुरुस्ती हाती घेतली. अधूनमधून खंडित होणारा वीजप्रवाह दुरुस्त केला. जवानांच्या घरामध्ये एअरकंडिशनर बसविले गेले. उंची फर्निचर आकर्षकपणे मांडले गेले. जमिनीवर गालिचे आले. मुख्यमंत्री त्या घरात पंधरा मिनिटे थांबले व लवाजम्यासह परत गेले. ते परतीच्या प्रवासात असतानाच एअरकंडिशनर, फर्निचर, गालिचे जेथून आणले होते तेथे परत गेले. म्हणजे हे चित्र पाहा आणि ते चित्र पाहा. कदाचित गुहा यांनी भाजपच्या गुहेत शिरकाव केल्यामुळे त्यांच्यावर टीकाही होईल. पण आहे, हे असे आहे.

ज्या महात्मा गांधीजींनी ‘वैष्णव जन तो तेणे कहिए| जो पर पीडाही जाने रे|’ म्हणत दीन-दलितांचे म्हणजेच अनुसूचित जाती, जमातींचे दुःख नाहीसे करण्यासाठी, प्रत्येक गरीबाच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी व या समाजाची योग्य प्रकारे जनगणना करून त्यांना इतरांसारख्याच सोयी-सुविधा मिळवण्यासाठी अहर्निश प्रयत्न केले, त्या राष्ट्रपित्या महात्मा गांधींचे त्यांच्या येणार्‍या पुण्यतिथीदिनी स्मरण करताना तरी सरकारला अनुसूचित जाती-जमातीच्या पुनर्गणनेची अंमलबजावणी करण्याचे काम हाती घेण्याची सद्बुद्धी प्राप्त होवो, हीच मनीषा!