अनुराग ठाकूरांच्या ‘गोली मारो’ घोषणे विरोधात कारवाईची शक्यता

0
143

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्य तथा घोषणाबाजीचा अहवाल देण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी तेथील निवडणूक अधिकार्‍यांना दिले आहेत.
दिल्लीतील रिथाला मतदारसंघात झालेल्या एका निवडणूक जाहीर प्रचार सभेवेळी भाषण करताना केंद्रीय वित्त व कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारोंको, गोली मारो, गोली मारो’ अशी घोषणा केली व उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनाही तशी घोषणा करायला लावले. त्याआधी त्या भाषणात ठाकूर यांनी सीएए विरोधकांविरूद्ध चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप आहे.

ठाकूर यांनी राष्ट्रवादाचे आवाहन करतानाच विरोधी पक्षांवर टीकेचा भडिमार केला. यावेळी त्यांचा रोख शाहीन बाग येथील सीएए विरोधकांवर होता. ते लोक भारतविरोधी घोषणा देत असल्याचाही त्यांचा दावा होता. मात्र त्यांनी वरील प्रक्षोभक घोषणाबाजी करण्याची जाहीर कृती ठाकूर यांनी केल्याने त्याबाबत दोषी आढळल्यास त्यांना दिल्लीतील निवडणूक प्रचारात भाग घेण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

अनुराग ठाकूर यांना
निवडणूक आयोगाची नोटीस
दिल्ली निवडणूक आयोगाने काल केंद्रीय वित्त व कंपनी व्यवहारमंत्री अनुराग ठाकूर यांना त्यांच्या कथित प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभेत हे प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा ठाकूर यांच्यावर आरोप आहे.