अनहर्ड मेलडी

0
293

अन्नपूर्णा एक न सुटलेलं कोडं. एक न उकलणारं गूढ. आता तर त्या हे जग सोडून गेल्यामुळे हे कोडं न सुटताच राहिलं.
संगीताच्या बाबतीत अन्नपूर्णा भाग्यवान. तिला उस्ताद अल्लाउद्दिनसारखे वडील व गुरू लाभले. बाबांचे अनेक वाद्यांवर अनन्यसाधारण प्रभुत्व होते. व्हायोलिन या वाद्याचा त्यांचा गुरू एक गोमंतकीय होता. पण सतार, सरोद व सूरबहार या वाद्यांची त्यांनी अनेकांना तालीम दिली. रविशंकर सतार, अलीअकबर सरोद, अन्नपूर्णा सतार व सूरबहार या वाद्यात अद्वितीय प्रावीण्य मिळवणारे त्यांचे शिष्य. जन्मानं मुसलमान असूनही हिंदू संस्कृती व धर्म यांची ओढ असलेले. असा हा संपन्न वारसा अन्नपूर्णेला लाभला. तिच्या जीवनात ‘पण’ या शब्दाला विशेष स्थान असलेलं दिसतं. जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी असूनही अनेक गोष्टींना तिला मुकावे लागले.
अन्नपूर्णा होण्याच्या आधीची ती रोशन आरा. तिच्या भावविश्‍वाला तडा बसला तो तिची बहिणी जहॉं आराच्या मृत्यूने. जिथं संगीताला जागा नव्हती अशा एका कर्मठ कुटुंबात तिचे लग्न झाले आणि मृत्यू तिच्या जीवनावर छाया धरू लागला. आपलं पण तेच प्राक्तन असेल का अशी भीती रोशन आराला वाटू लागली. पुढं रबू म्हणजे रविशंकर बाबांचा शिष्य म्हणून येतो व रोशन आराचं जीवन बदलून जातं. गुरू म्हणून बाबा कडक शिस्तीचे. रियाजाच्या बाबतीत टाळाटाळ केलेली त्यांना अजिबात खपत नाही. यासाठी अलीअकबरने त्यांच्या हातून बराच मार खाल्ला आहे. परंतु रबीवर त्याचा फार जीव. पुढे उदयशंकर रबी व अन्नपूर्णेच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले तेव्हा विशेष खळखळ न करता त्यांचे श्रद्धास्थान शारदा मॉंच्या साक्षीने या विवाहाला आपली मान्यता देतात. खरं म्हणजे पंधरा हे काही लग्नाचे वय नव्हे. रविशंकर तिच्यापेक्षा सात वर्षांनी मोठे. एका वर्षातच शुभेंद्र शंकरचा जन्म होतो. या नव्या पर्वातही अन्नपूर्णा आपली साधना चालूच ठेवते.
असा हा सुंदर आलाप जोड झाला, वाजवताना विसंवादी सूर कधी व कसा लागला? दोघांमधल्या स्वभावात असलेला फरक त्याला कारण असू शकतो. रविशंकर थोडे भ्रमरवृत्तीचे तर अन्नपूर्णा अंतर्मुखी. छानछोकीची फारशी आवड नसणारी. पुन्हा कलावंत म्हणून दोघांमधल्या वृत्तीचा फरक. दिल्लीत त्यांच्या जुगलबंदीचा जलसा होतो तेव्हा दोघांच्या वादनशैलीत दिसलेली भिन्नता. जुगलबंदी होऊन घरी आल्यावर वादनशैलीवरून वाद होतो. रविशंकराना वाटतं अन्नपूर्णेनं पारंपरिक वादनशैलीला थोडी मुरड घातली पाहिजे. ती जास्त लोकाभिमुख व्हायला पाहिजे. सूरबहार हे वाद्य फारसं लोकप्रिय नाही हे तिच्या मनावर बिंबवण्याचा ते प्रयत्न करतात. पण तिचा परंपरेवर दृढ विश्‍वास. कदाचित ही आपल्यापेक्षा दोन पावलं पुढं जाईल ही सुप्त भीती रविशंकरांच्या मनात असू शकते. या भीतीपोटीच पुढचं रामायण घडलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चाकोरीबद्ध जीवन जगणं किंवा सामाजिक मूल्यांची तमा न बाळगणं याकडे त्यांचा कल, यामुळे अन्नपूर्णेची घुस्मट झाली व तिनं कोषात जाणं पसंत केलं.
तिच्या जीवनाचा तिसरा अध्याय होतो तो मुंबईतल्या बांद्रा येथील ‘आकाशगंगे’च्या सहाव्या मजल्यावरील सदनिकेत. हा तिच्या अज्ञातवासाचा काळ म्हणता येईल. एकीकडे रविशंकर यशाची शिखरे पादाक्रांत करत जातात त्याचवेळी अन्नपूर्णा मात्र सांगीतिक सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेते. वाजवणं हे स्वानंदासाठी हे तिनं मनोमन ठरविलं. इतकंच नव्हे तर माणसांचाही तिला तिटकारा यायला लागला. आकाशगंगा अपार्टमेंटच्या तिच्या सदनिकेच्या दारावर तिने लिहून ठेवले- ‘श्रीमती अन्नपूर्णा, सोमवार आणि गुरुवार बेल वाजवू नये. इतर दिवशी वाजवल्यास तीनदा वाजवल्यावर प्रतिसाद न मिळाल्यास हे मान्यवर अतिथी, इथून निघून जावे.’ हे वाचताना थोडे विचित्र वाटते. सदनिकेच्या गॅलरीत येणार्‍या कबुतरांना धान्य घालणे हा दुसरा छंद तिने लावून घेतला.
तिच्या जीवनाच्या या अध्यायात ऋषिकुमार पंड्या येतो. हरिप्रसादासारखाच पंड्याचाही ती शिष्य म्हणून स्वीकार करते. सहवासातून ऋषी तिच्या प्रेमात पडतो. ती १९२७ तली तर तो तिच्यापेक्षा तेरा वर्षांनी लहान. त्याच्या गाढ प्रेमानं ती मृदू होते व १९८२ साली त्यांचा विवाह होतो. पण तिच्या प्राक्तनात संसारसुख लिहिलेलं नसावं. शुभेंद्रशंकर तिला दुरावला होता. पण त्याला अवघ्या ५१ व्या वर्षी अकाली मृत्यू आला. पुढे तिला जीवापाड प्रेम करणार्‍या ऋषिकुमारच्या मृत्यूचा दारुण अनुभव घ्यावा लागला.
अन्नपूर्णेचं वर्णन ‘अ अनहर्ड मेलडी’ अशा शब्दांत केलं जातं. तिच्या सांगीतिक संचिताचा अंदाज हरिप्रसाद चौरासिया, नित्यानंद हळदीपूर, प्रदीप बारोट किंवा सास्वती घोष यांच्या वादनातून आपल्याला येतो.
तिच्या सदनिकेतून समुद्र दिसतो. त्या अथांग समुद्रासारखं तिचं संगीत होतं. तिच्या आवडत्या ‘श्री’ रागाप्रमाणं करुण, रसप्रधान…