(अग्रलेख) संकट कायम

0
285

कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील निर्वाणीच्या टप्प्याला आता प्रारंभ झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण आता अर्ध्याने खाली आले असल्याचे काल सरकारने जाहीर केले. म्हणजे दर साडे तीन दिवसांत ही रुग्णसंख्या जी गेले काही दिवस दुप्पट होत चालली होती, ते प्रमाण आता साडे सात दिवसांपर्यंत खाली आले असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, परंतु कोरोना रुग्णांचा चढता आलेख अजूनही आपल्याला रोखता आलेला नाही – अगदी लॉकडाऊन असूनही रोखता आलेला नाही हे मात्र विदारक सत्य आहे. देशातील सिक्कीम, नागालँड, लक्षद्वीपसारखे मोजकेच प्रदेश असतील की जिथे एकही कोरोना रुग्ण आजवर आढळलेला नाही. बाकी अंदमान निकोबारपासून काश्मीरपर्यंत सर्वत्र कोरोनाचा फैलाव आतापर्यंत झाला आहे.

राज्य सरकारच्या दाव्यानुसार गोव्यातील कोरोनाच्या सातपैकी सर्वच्या सर्व सातही रुग्ण बरे झालेले असल्याने गोवा हे तूर्त कोरोनामुक्त राज्य आहे, परंतु हा दिलासा कितपत राहील याबाबत अर्थातच साशंकता आहे. गोव्यातील अनेक संशयित कोरोना रुग्णांच्या तपासण्यांचे अहवाल नकारात्मक आलेले असल्यानेच सरकार गोवा कोरोनामुक्त झाल्याचा दावा करीत असले, तरी देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे ज्याला ‘एसिंप्टोमॅटिक’ म्हणजे लक्षणरहित असेच आहेत आणि जोवर त्यांच्यात कोरोनाची प्रत्यक्ष लक्षणे दिसत नाहीत, तोवर त्यांची चाचणी नकारात्मकच येते हे वास्तव आयसीएमआर या देशातील सर्वोच्च वैद्यक संशोधन संस्थेने देशासमोर ठेवलेले आहे हेही विसरता येणार नाही. कोरोनाच्या ऐंशी टक्के रुग्णांमध्ये शेवटपर्यंत फारशी लक्षणे दिसत नाहीत, पंधरा टक्के रुग्णांना प्राणवायू वगैरेंची गरज भासू शकते आणि केवळ पाच टक्के रुग्ण अत्यवस्थ स्थितीत पोहोचू शकतात आणि त्यातल्या काहींचा जीव जाऊ शकतो असे निष्कर्ष केंद्र सरकारने काढलेले आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे अशा प्रकारचे जे लक्षणरहित कोरोना रुग्ण असतील आणि ज्यांना अद्याप आपण कोरोनाबाधित आहोत याची जाणीवही झालेली नसेल, असे लोक या संसर्गाचे वाहक बनून त्याचा किती फैलाव करीत असतील याचा अंदाज काही बांधता येत नाही. मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरांमध्ये आज जो संसर्ग वाढत चालला आहे, त्याचे प्रमुख कारण हे अशा प्रकारचे वाहक आहेत असे दिसते आहे. त्यामुळे कोरोनाची टांगती तलवार देशावर कायम आहे आणि जोवर प्रतिबंधात्मक लस येत नाही आणि ती जगातील अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोवर ही टांगती तलवार भारतच नव्हे, तर जगावर कायम राहणार आहे हे उघड आहे.

कोरोनावर लस शोधण्याचे काम संशोधकांचे जवळजवळ सत्तर गट जगभरामध्ये करीत आहेत. त्यापैकी काहींनी प्राण्यांवर चाचण्यांचा टप्पा पार केला आहे आणि अमेरिका व ब्रिटनमधील एका गटाने तर मानवी चाचण्यांपर्यंत मजल मारली आहे अशी माहिती समोर येते आहे. जागतिक पातळीवरील संशोधनाचा हा वेग पाहिला तर कोरोनावरील लस प्राप्त होण्यासाठी नेहमीप्रमाणे दीड दोन वर्षे नव्हे, तर त्याहून खूप कमी काळ लागू शकतो अशी आशा वाटते. हे जागतिक प्रयत्न असेच सुरू राहिले, सर्व संबंधित प्रक्रियांना युद्धपातळीवर वेग दिला गेला, आणि संशोधकांना यश आले तर पाच – सहा महिन्यांच्या आत लस येईल, परंतु तोवर कोरोनाने जगाचे केलेले नुकसान अपरिमित असेल यात शंकाच नाही.

भारतामध्ये काल कोरोनाचा विशेष फैलाव नसलेल्या हरित विभागांमध्ये औद्योगिक आणि कार्यालयीन कामकाजाला प्रारंभ झाला. गोव्यामध्येही सरकारी कार्यालये, उद्योगधंदे कालपासून सुरू झाले. त्याचा परिणामही रस्त्यांवर दिसून आला. महामार्गांवर सकाळी निर्माण झालेली गर्दी बोलकी होती. आर्थिक उलाढाल सुरू झाली पाहिजे याबद्दल वादच नाही, परंतु त्याचा परिणाम म्हणून कोरोनाविरुद्धची आपली लढाई कमकुवत होता कामा नये. सरकारच्या वतीने याची खबरदारी घेणे जरूरी आहे.

जगाच्या कानाकोपर्‍यांत अडकून पडलेल्या गोमंतकीय खलाशांना माघारी आणण्यासाठी राज्य सरकारवरील दबाव कायम आहे. त्याच बरोबर देशविदेशांतील गोमंतकीय जे मायभूमीत परतू इच्छितात, त्यांची माघारी येण्याची प्रक्रियाही जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे सुरू होतील, तेव्हा सुरू होईल. हजारोंच्या संख्येने ही जी मूळ गोमंतकीय मंडळी गोव्यात परतू लागतील, तेव्हा राज्य सरकार त्यांच्यापासून स्थानिक जनतेचा बचाव कसा करणार आहे हा मोठा गंभीर प्रश्न आहे. सरकारपाशी महामारी कायद्याखाली राज्यातील सर्वच्या सर्व हॉटेले गरजेनुरूप ताब्यात घेण्याचा अधिकार जरी असला आणि त्या दृष्टीने एकाच आदेशान्वये मोठ्या संख्येने हॉटेलच्या खोल्यांवर ताबा मिळवून या पाहुण्यांचे सक्तीचे विलगीकरण तेथे करण्याचे सरकारने जरी ठरवले, तरी त्यातून हा प्रश्न सुटत नाही. या विदेशस्थ संशयितांकडून त्या हॉटेलांच्या कर्मचार्‍यांत आणि त्या कर्मचार्‍यांकडून समाजामध्ये कोरोना संसर्ग पसरत जाणार नाही याची आत्यंतिक दक्षता घ्यावी लागणार आहे. देशातील महानगरांतील अतिशय नावाजलेल्या इस्पितळांतील उच्चशिक्षित डॉक्टर आणि परिचारिकांना देखील कोरोनाच्या सूक्ष्म विषाणूचा संसर्ग टाळता आला नाही, तेथे आम जनतेला यापासून बचाव करणे मुळीच सोपे नाही. त्यामुळे खलाशी असोत किंवा आणखी कोणी असो, कोणताही निर्णय घेताना तो राजकीय कारणांखातर आणि लोकानुनयाखातर नव्हे, तर गोमंतकीय आम जनतेचे हित विचारात घेऊनच घेतला गेला पाहिजे. आज जे दिलासादायक चित्र गोव्यात दिसते आहे, ते भविष्यातही तसेच राहायला हवे असेल तर थोडे खमकेपणाचे निर्णय सरकारला घ्यावे लागणार आहेत. सवंग राजकीय दबावांपुढे लोटांगण घालून राज्याला सरकार संकटाच्या खाईत लोटणार नाही अशी आशा करूया!