(अग्रलेख) डफली मूक झाली!

0
298

 

जिंदगी जिंदादिली का नाम है |

मुर्दा दिल खाक जिया करते है ॥

ऋषी कपूर यांच्या निधनामुळे गेली किती तरी वर्षे वाजत, गाजत आणि रसिकांना रिझवत राहिलेली डफली एकाएकी थांबली. अभिनेता इरफान खानच्या मृत्यू पाठोपाठ भारतीय मनोरंजन क्षेत्राला बसलेला हा दुसरा मोठा धक्का. हिंदी चित्रपटसृष्टीतले एक पर्व ऋषी कपूर यांच्या मृत्यूमुळे संपले आहे. मागे उरला आहे एक भयाण सन्नाटा.

चित्रपट अभिनेत्यांच्या बाबतीत ‘चॉकलेट हिरो’ ही संकल्पना अनेकदा हेटाळणीच्या सुरात वापरली जाते, परंतु ऋषी कपूर हे खरेखुरे चॉकलेट हिरो होते. त्यांच्यात जणू चॉकलेटचा तो गोडवा जन्मजात उतरला होता. सदैव सस्मित चेहर्‍याने ते चित्रपटसृष्टीत वावरले. पिता राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ सारख्या चित्रपटातून बालकलाकार म्हणून केलेल्या पदार्पणापासून अगदी कालपरवापर्यंत ‘१०२ नॉट आऊट’ मध्ये एकशे दोन वर्षांच्या अमिताभच्या मुलाच्या भूमिकेपर्यंत सतत चंदेरी पडदा व्यापून राहिलेला हा एक दीर्घोद्योगी कलावंत होता.

त्यांनी सुरवात बालकलाकार म्हणून केली. ‘मेरा नाम जोकर’ मधील बाल भूमिकेसाठी पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. ‘श्री ४२०’मध्ये ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ हे गाणे सुरू असताना तीन मुले एका छत्रीतून जातात, त्यातला एक मुलगा म्हणजे तीन वर्षांचा ऋषी राज कपूर होता! नर्गीसने म्हणे चॉकलेटच्या बदल्यात ती छोटीशी भूमिका करायला त्याला राजी केले होते!

तरुण वयात असंख्य चित्रपटांमध्ये या उमद्या गोड नायकाने रोमँटिक नायकाची भूमिका केली. ‘बॉबी’ मधला डिंपल कपाडियासमवेतचा त्यांचा कोवळा नायक कोण विसरू शकेल? ‘सरगम’ मध्ये त्याची डफली अशी काही कडाडली की त्यानंतरच्या काही काळावर जणू त्याच्या नावाची मुद्रा होती. ‘सरगम’ मधील ‘डफलीवाले, डफली बजा’ गाण्यातील त्यांचे नृत्याचे पदन्यास अविस्मरणीय आहेत. लांब बाह्यांच्या सुंदर सुंदर टीशर्टस्‌मध्ये नाचणार्‍या या कोवळ्या तरुणाचे ते टीशर्टस्‌ही स्टाइल स्टेटमेंट बनून गेला होता! ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’ सारखे चित्रपट, अवीट गोडीच्या गाण्यांमुळे गाजलेला ‘सागर’, श्रीदेवीसोबतचा ‘चॉंदनी’ अशा एकेका चित्रपटातून ऋषी कपूर आपली वाट शोधत गेले.

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर चरित्रात्मक दुय्यम भूमिकाही ऋषी कपूरनी तितक्याच समरसून केल्या. आयुष्याच्या एकेका पर्वाला त्यांनी असे जणू चित्रपटसृष्टीलाच वाहिले होते. भूमिका छोटी असो, अथवा मोठी, ऋषी कपूर आपल्या जिंदादिल वृत्तीने त्यात जान आणायचे.

नायकाकडून चरित्र अभिनेत्याच्या भूमिकांकडेही सहजतेने वळलेल्या ऋषी कपूर यांच्या रूपाने जिंदादिल बुजूर्ग इन्सान हिंदी चित्रपटांना लाभला. आलिया भटचे पदार्पण असलेला ‘स्टुडंट ऑफ द इअर’ असो, कुटुंबाला एकत्र ठेवू पाहणार्‍या आजोबांचा ‘कपूर अँड सन्स’ असो, किंवा १०२ वर्षीय अमिताभच्या मुलाच्या भूमिकेतला ‘१०२ नॉट आऊट’ असो, जी भूमिका वाट्याला आली, त्यात ऋषी कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पडल्यावाचून राहिले नाही.

‘अमर अकबर अँथनी’ मध्ये ‘अमर’ विनोद खन्ना आणि ‘अँथनी’ अमिताभसमवेत ‘अकबर इलाहाबादी’ ऋषी कपूर होते! तीन वर्षांपूर्वी अभिनेता विनोद खन्नाचे निधन झाले, तेव्हा अंत्यसंस्काराला त्या काळातील एकही चित्रपट अभिनेता उपस्थित नसल्याचे पाहून ऋषी कपूर खवळले होते. ट्वीटरवरून त्याबद्दलची तीव्र नापसंती आणि संताप त्यांनी व्यक्त केला होता. ‘उद्या माझ्या बाबतीतही हेच होईल..’ असेही ते उद्वेगाने लिहून गेले होते. कोरोनाच्या वेगळ्या कारणाने का होईना, काल ते खरे ठरले. लॉकडाऊनमुळे मोजक्याच व्यक्ती या एवढ्या मोठ्या अभिनेत्याच्या अंत्यसमयी उपस्थित राहू शकल्या, त्यांना आदरांजली वाहू शकल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक कपूर पर्व संपुष्टात येत असताना अशी अठरा – वीस लोकांचीच उपस्थिती असावी ही एक दुर्दैवी स्थिती म्हणावी लागेल.

ऋषी कपूर यांचे एक वैशिष्ट्य आवर्जून सांगायलाच हवे. अनेक चित्रपट कलाकार हे केवळ चित्रपटांची दुनिया एवढेच आपले विश्व असे समजून त्यातच गुंग झालेले असतात. बाहेरच्या जगाशी आपले काही देणेघेणेच नाही असे त्यांचे वागणे असते. पण ऋषी कपूर हे केवळ चित्रपटांच्या दुनियेतच रमले नाहीत. बाहेरच्या दुनियेतील बर्‍यावाईट गोष्टींवर अत्यंत परखडपणे, रोखठोकपणे ते आपली प्रतिक्रिया समाजमाध्यमांद्वारे देत असत. मॉब लिंचिंगपासून कोविड योद्ध्यांवरील हल्ल्यापर्यंत जे काही खटकले, त्यावर भाष्य करण्यास ते कधी बिचकले नाहीत. अनेकदा त्यांच्या या सवयीमुळे त्यांनी भलते वादही ओढवून घेतले, परंतु आपली मते स्पष्टपणे मांडण्याचा धर्म त्यांनी सोडला नाही. तीन वर्षांपूर्वीच त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. त्याचे नावच मुळी आहे ‘खुल्लम खुल्ला’! आडपडदा न ठेवता त्यामध्ये अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे.

पुत्र रणबीर कपूर याने पिता ऋषी कपूर व आई नीतू सिंग कपूर यांच्यापासून वेगळे राहायचा निर्णय घेतला, तेव्हा पिता म्हणून त्यांना दुःख जरूर झाले, परंतु आपल्या वडिलांनी राज कपूर यांनी आपल्यालाही तरुण वयात स्वतंत्र मार्ग चोखाळण्याची मुभा दिली होती, तशीच आपणही आपल्या मुलाला ती देणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेने त्यांनी त्याला वाट मोकळी करून दिली. रणबीरने आपली चित्रपट कारकीर्द उभारली ती स्वतःच्या मेहनतीने उभारली आहे. कपूर घराण्याचा वारसा तो समर्थपणे पुढे चालवतो आहे. ऋषी कपूर यांच्यापेक्षा त्याचा बाज वेगळा आहे. पित्यापेक्षा त्याच्यात आईची – नीतू सिंग यांची छाया अधिक डोकावते. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून चालत आलेला भारतीय चित्रपटसृष्टीतील कपूर घराण्याचा वारसा रणबीरच्या रूपाने पुढे चालू राहील, परंतु मधला ऋषी कपूर नावाचा मैलाचा दगड मात्र यापुढे दिसणार नाही!