अखेर मॉन्सून दाखल

0
121

राज्यात अखेर १४ दिवसांच्या उशिराने मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने काल जाहीर केले. गोव्याच्या मागील २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच खूपच उशिराने मान्सूनचे आगमन झाले आहे, अशी माहिती पणजी हवामान विभागाचे संचालक डॉ. के. व्ही. पडगलवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्यातील सर्वच भागात पावसाची नोंद झाली असून आठवड्याच्या अखेरपर्यंत मान्सून सर्वच भागात सक्रिय होणार आहे. आगामी पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. राज्यात पावसाचे उशिराने आगमन झाले तरी पाऊस समाधानकारक पडणार आहे, असेही पडगलवार यांनी सांगितले.

मागील चोवीस तासात केपे येथे सर्वाधिक ३.३४ इंच पावसाची नोंद झाली. पेडणे येथे ३.१० इंच, सांगे येथे २.८७ इंच, दाबोळी येथे २.५९ इंच, मुरगाव येथे २.२४ इंच, मडगाव येथे १.३७ इंच, साखळी येथे १.२७ इंच, काणकोण येथे १.२६ इंच पावसाची नोंद झाली आहे. तसेच म्हापसा येथे ०.९० इंच, फोंडा येथे ०.७६ इंच, पणजी येथे ०.७५ इंच, ओल्ड गोवा येथे ०.७८ इंच, वाळपई येथे ०.५५ इंच पावसाची नोंद झाली आहे.

केरळमध्ये मान्सूनचे चार दिवस उशिराने आगमन झाले होते. त्यामुळे गोव्यात मान्सूनचे १५ जूनपर्यंत आगमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तथापि, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू वादळामुळे मान्सूनचे आगमन आणखी लांबणीवर पडले होते. मान्सूनच्या आगमनामुळे वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील शेतीच्या कामांना चालना मिळणार आहे.