Home बातम्या अक्षरलेखनातला

अक्षरलेखनातला

0

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

११ जून – बालब्रह्माची निरंतर उपासना करणार्‍या आणि अक्षर वाङ्‌मयाच्या साधनेत आयुष्यभर मग्न असणार्‍या ध्येयनिष्ठ साने गुरूजींची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला साजेशा उपक्रमाला प्रारंभ नुकताच या दिवशी रमणीय निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पिळगाव येथील आयडियल हायस्कूलमध्ये झाला. ‘सुंदर अक्षर…. आनंद निरंतर’ हे अंतःसूत्र मनाशी बाळगून ‘अक्षरमित्र’ ही संघटना त्या दिवशी स्थापन करण्यात आली. ‘हृदया उच्च ध्येय मनी धरी’ अशी आकांक्षा मनी बाळगून अक्षरलेखन ही बालपणीची सुरुवातीची प्रक्रिया….. त्यानंतरची पायरी अक्षरसाधनेची. दोहोत मूलभूत फरक असला तरी त्यांच्यामध्ये आंतरिक नातेही आहे. ‘न क्षरं इति अक्षरमं्‌|’ जे नाश पावत नाही ते अक्षर. पण रँगलर विष्णुपंत नारळीकर यांची पत्नी, डॉ. जयंत नारळीकर तसेच डॉ. अनंत नारळीकर या शास्त्रज्ञांची आई आणि संस्कृत भाषेची तज्ज्ञ असलेली सुमतीबाई नारळीकर यांनी अक्षराची अभिनव व्याख्या केलेली आहे. ‘अक्षाः यत्र रमन्ते इति अक्षरम्‌|‘ ‘डोळे जिथे रमतात ते अक्षर’ अप्रतिम कल्पना. अक्षर डोळ्यांना आल्हाद देते. अक्षर वाङ्‌मय, अक्षय आनंदाचा वर्षाव करते. वाणी आणि लेखणी याद्वारे व्यक्त होणार्‍या शब्दस्फोटाला आपण ‘अक्षर’ असे संबोधतो. उच्चारासाठी उपयोजिलेले ते चिन्ह असते. आपल्या देवनागरी अथवा नागरी लिपीत बावन्न अक्षरे आहेत. त्यांना आपण ‘वर्ण’ म्हणतो. त्यांच्या सुसंगत रचनेला आपण ‘वर्णमाला’ म्हणतो. त्या अक्षरांना परंपरेने ‘मुळाक्षरे’ असे म्हटलेले आहे. त्यांच्या संयोजनेमुळे ‘वैखरी’ निर्माण होते.

‘छान्दोग्य उपनिषदां’त म्हटलेले आहेः

‘वाग्वैतत्सर्वं विज्ञापयति वाचमुपास्स्वेति|

स यो वाचं ब्रह्मोत्युपास्ते|

यावद्वाचो गतं तत्रास्य यथा

कामचारो भवति यो वाचं

ब्रह्मेत्युपास्ते॥

वाणीच सर्व ज्ञान प्राप्त करून देते. तेव्हा वाणीची उपासना करा. जो वाणीला ब्रह्म समजून तिची उपासना करतो, तो वाणीच्या साम्राज्यात स्वतंत्र होतो. वाणीला ब्रह्म समजून उपासना करतो तोच असा होतो.

सुंदर हस्ताक्षर हे बीज आहे. ते शुद्ध असणे आवश्यक आहे. हा मंदिराचा पाया आहे. तो सुदृढ असणे पुढच्या विस्तारासाठी अत्यंत गरजेचे. सुंदर अक्षर तन्मयतेतून जन्म घेते. दुसर्‍यांना ते तन्मय व्हायला भाग पाडते. सामरस्ययोगाचा असा हा प्रारंभबिंदू, हृदयसंवादाची ही सुरुवात. सुंदर अक्षरलेखन हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा. त्याची प्रांजळता, ऋजुता, पारदर्शकता आणि उन्नयनशीलता अक्षरांच्या आतून प्रकट होते.

मुले म्हणजे उमलत्या मनाची उन्मेषशाली फुले. ती समुचित व सर्व दलांनी फुलण्यासाठी दक्ष आणि कुशल माळी पाहिजे. मायाममतेने त्यांचा हात फुलवेलींवर, फुलझाडांवर फिरायला हवा. त्यांची निगुतीने निगराणी व्हायला हवी. तरच त्यांच्या गोजिरवाणेपणाला आकार व सौष्ठव प्राप्त होईल. मुलांचे अक्षरलेखन घडवून घेणे ही प्रक्रिया म्हणजे व्यक्तिमात्राच्या कोवळ्या वयात केलेला मनःसंस्कार होय. कोणतीही सृजनशील कृती सौष्ठवयुक्त आणि परिपूर्ण असलीच पाहिजे. अशी अपेक्षा त्यामागे असते. ते त्यामागचे मूलतत्त्व.

आपली देवनागरी अथवा नागरी लिपी दहाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात रूढ झाली असे मानण्यात येते. ती संपन्न लिपी. तिला ‘बाळबोध लिपी’ असेही म्हणतात. हा मथितार्थ आपण ध्यानात घ्यायला हवा. ती चित्रलिपी आहे याचे भान आपल्या पूर्वजांनी ठेवलेले आहे. अनेक विद्या आणि कला यांचा सर्वांगीण विकास येथे अभिप्रेत आहे. राजकीय, माजिक आणि सांस्कृतिक आक्रमणांच्या दावानलांतून वाचलेला हा समृद्ध वारसा. अनेक अग्निदिव्यातून जावे लागल्यामुळे तिला झळाळी प्राप्त झालेली आहे.

ही लिपी मातेच्या दुधासारखी. या दुग्धपानामुळे पालकाचे स्वाभाविक पोषण होते. कुपथ्य होत नाही. सर्वांगीण उन्नती तिच्यामुळे साधते. तिचे अंगभूत सौष्ठव न्याहाळल्यावर पूर्वसूरींची कल्पकता आणि बुद्धिमत्ता दिसून येते. भौतिक अभ्युदयाच्या क्षणिक प्रलोभनामुळे परकी भाषांच्या मागे धावणार्‍यांना तिचे महत्त्व वाटणार नाही कदाचित. पण या देवनागरी लिपी साधनेमुळे जीवनाच्या कितीतरी मितींचा विकास होतो. याचा विचार राष्ट्रीय नवनिर्माणाच्या प्रेरणेने वाटचाल करणार्‍या समाजाने शांत डोक्याने अन् दूरदृष्टीने करायला हवा. नाहीतर पुढील काळ भयावहच नव्हे; तर प्रलयावह होईल. ते टाळण्याचा प्रयत्न पश्‍चात बुद्धीने आपण जेव्हा करू तेव्हा वेळ टळून गेलेली असेल.

पिळगावच्या आयडियल हायस्कूलने अनुभवसंपन्न मुख्याध्यापक रामचंद्र गर्दे आणि निष्ठावंत अरविंद सायनेकर यांच्या प्रेरणेने सुंदर अक्षरलेखनासाठी शिबिर आयोजित केले. हस्ताक्षरतज्ञ रावजी जाधव यांचे कुशल मार्गदर्शन या ठिकाणी लाभले. देवनागरीकडे लक्ष केंद्रित करताना इंग्रजी लेखनाकडे दुर्लक्ष होता कामा नये याचीही खबरदारी घेण्यात आली. त्यासाठीची योजना झाली. सकाळी ११ वाजल्यापासून मधली भोजनाची वेळ सोडली तर संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी या लेखनप्रक्रियेत मग्न राहिल्या. हे चित्र मला आल्हाददायी वाटले. हा प्रयोग अनेक शिक्षण संस्थांनी आवर्जून करावा असे मनोमन वाटले. मला १९५९-१९६० साली आमच्या शाळेचे मुख्याध्यापक ह. रा. प्रभू आणि शिक्षक यशवंत अनंत नाईक यांच्या प्रेरणेने देवनागरी आणि इंग्रजी अक्षरलेखनासाठी आयोजित केलेल्या ‘शुद्धलेखन सप्ताहा’ची आठवण झाली. या आठवड्यात अन्य पाठ्यक्रम बाजूला ठेवून फक्त अक्षरलेखनाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले होते. ते प्रयत्न वाया गेले नाहीत. ते क्षण सुफलित झाले असे मला वाटते.

मनाची माती मऊ असतानाच असे अक्षरसंस्कार व्हावे लागतात. आयडियल हायस्कूलच्या या शिबिराला शाळेतील तसेच पंचक्रोशीतील भाषाशिक्षक उपस्थित तर होतेच, शिवाय त्रिविक्रम कामत, प्रतिमा सावईकर व सीमा गोवेकर हे शिक्षक शिक्षिका (त्यापैकी दोघे गणिताचे शिक्षक) आणि डॉ. सुबोध कासार यांच्यासारखे शल्यविशारद उपस्थित होते. ते पाहून अपूर्वाई वाटली. केवळ उपयुक्तता हे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले नाही. शेवटी उपयोग या शब्दाचा तरी उपयोग काय असे पु. ल. देशपांडे इचलकरंजीच्या अ. भा. मराठी साहित्यसंमेलनात म्हणाले होते. त्यांची आठवण होते.

तुये, पेडणे येथील रावजी जाधव यांनी गेली पंचवीस वर्षे अक्षरलेखनाचे अनेक प्रयोग केले आहेत. त्यांचे स्वतःचे हस्ताक्षर टपोरे, वळणदार तर आहेच; पण त्याचबरोबर मुलांना ते कौशल्य शिकवण्याची त्यांची पद्धत प्रभावी आहे. तिचे अधोरेखन येथे करावेसे वाटते.

१) अक्षराचा देठ.

२) पूर्वगामी वर्तुळखंड

३) पश्‍चिमगामी वर्तुळखंड

४) अक्षराची गाठ

५) आडवा दंड/सेतुदंड

६) उभा दंड

७) ‘ए’कारचिन्ह/मात्रा

८) शिरोरेघ/शिरोरेषा

खरे पाहता हा विचार आजकालचा नव्हे. समर्थ रामदासांनी दासबोधात (गुरूशिष्यसंवादे लेखनक्रियानिरुपण नाम समास प्रथम) मर्मदृष्टीने अधोरेखित केला आहे. तो माननीय आहे. जिज्ञासूंनी ते मुळातून पाहावे. त्यातील बारकावे पाहिले तर हा दूरदृष्टीने जीवनाच्या सर्व शाखांविषयी नेमकेपणाने मार्गदर्शन करणारा थोर प्रबोधनकार होता हे लक्षात येते. त्यांच्या

पहिले अक्षर जे काढिलें| ग्रंथ संपेतो पाहता गेले|

येका टांकेचि लिहिलें| ऐसें वाटें|

या उद्गारांचे मर्म आपण समजून घेतले पाहिजे.

आपल्या गोमंतकात आणि गोमंतकाबाहेर सुलेखनाचे महत्त्व ध्यानात घेऊन जे कार्य केले त्यांना मानाचा मुजरा करावासा वाटतो. र. कृ. जोशी, अच्युत पालव, कमल शेडगे हे या क्षेत्रातील दिग्गज होत. त्यांचे कार्य सर्वश्रुत आहे. अच्युत पालव यांनी मोडी आणि देवनागरी लिपीत अनेक प्रयोग केले. कलापूर्ण निर्मिती केली. मोडी लिपीचे त्यांनी केलेले पुनरुज्जीवन हा लक्षणीय पैलू होय. त्यांची अक्षरनिष्ठा वाखाणण्याजोगी. ते म्हणतात-

अक्षर हा माझा ध्यास

अक्षर हा माझा श्‍वास

अक्षर हेच माझे ध्येय

सबकुछ अक्षर!

आपल्या ध्यासापायी जीवन वाहून घेण्याची त्यांच्या मनाची तयारी!

सुंदरवाडी ऊर्फ सावंतवाडी येथील तपोवृद्ध अक्षरतज्ज्ञ ल. ना. गोवेकर यांचे सुंदर, मोत्यासारखे, वळणदार अक्षर हा अक्षरलेखनातील परमोच्च बिंदू होय. सूक्ष्माक्षरलेखन ही त्यांची खासियत होती. त्यांचा समृद्ध वारसा त्यांचे सुपुत्र विकास गोवेकर चालवीत आहेत. त्यांचे ‘अक्षरप्रपंच’ हे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. ल. ना. ऊर्फ अप्पा गोवेकर यांना ‘अक्षरमहर्षी’ गे नामाविधान प्राप्त झाले. ते सार्थ होते. त्यांचा निकटतम सहवास मला लाभला हा आयुष्यातील भाग्ययोगच. सावंतवाडीचे निष्ठावंत शिक्षक शि. अ. लुकतुके यांनी ‘मनस्वी’ हे जीवनचरित्र लिहिले आहे. अप्पा गोवेकरांच्या अक्षरविषयक चिंतनातील ही काही अधोरेखितेः

हस्ताक्षरात सौंदर्य आणि गती या दोन गोष्टी मिळवायच्या असतात. या दोन्ही गोष्टी प्रयत्नाने साध्य करता येतात.

आपली देवनागरी लिपी आडव्या उभ्या सरळ ओळी, छोटी मोठी वर्तुळे, छोटे मोठे वर्तुळाखंड व टिंबे यांनी बनवलेली आहेत. अक्षर सुंदर बनवताना सुरुवातीला या गोष्टी हाताने चांगल्या काढता येणे आवश्यक.

वरील गोष्टींच्या अक्षरांचे अवयव कसे बनवले आहेत हे नीट ध्यानात घेऊन अवयव सुंदर काढावेत व मध्ये जागा न ठेवता ते परस्परांना बरोबर जोडून प्रत्येक अक्षर पुरे करावे.

उभी सरळ, आडवी तिरकी व उजवी तिरकी अशा तीन तर्‍हांनी अक्षरे काढण्यात येतात. त्यापैकी आपली पद्धत कोणती ते निश्‍चित करून प्रत्येक अक्षर आपल्या पद्धतीने काढण्याचा कटाक्षपूर्वक प्रयत्न करावा.

अक्षरांत सर्वत्र समानता पाळावी. काने, मात्रा, वेलांटी आणि उकार इत्यादी अक्षराचे सर्व अवयव समान काढावेत. दोन अक्षरे, दोन शब्द व दोन ओळी या सर्वांत मध्ये सोडायची जागा समान सोडावी.

समानतेने समांतरतेने अक्षराचे सौंदर्य वाढते. म्हणूनच अक्षरात ज्या ज्या ठिकाणी समांतरता ठेवता येईल, त्या त्या ठिकाणी समांतरता ठेवावी. सर्व उभ्या आडव्या ओळी कटाक्षपूर्वक एकमेकांस समांतर काढाव्यात.

देवनागरी लिपी शीर्षरेषेमुळे अधिक सुंदर दिसते. परंतु हे सौंदर्य प्राप्त करण्यासाठी शीर्षरेषा काढताना पुढील नियम पाळणे आवश्यक ः

१. अक्षरांचे देठ व काने यांना शीर्षरेषा जोडून काढावी. मध्ये अंतर मुळीच ठेवू नये.

२. शब्दाच्या पहिल्या अक्षराच्या डावीकडील अवयवांच्या लंब रेषेत ती सुरू करून शेवटच्या अक्षराच्या उजवीकडील अवयवाच्या लंबरेषेपर्यंत ती पुरी करावी. मात्र हे डावी उजवीकडील अवयव ओळीला टेकणारे असल्यास शीर्षरेषा त्या टेकणार्‍या अवयवाच्या काहीशी पुढे काढली पाहिजे.

३. प्रत्येक अक्षराला शीर्षरेषा वेगवेगळी न काढता शब्द-शब्दाला ती एकदम काढावी.

४. शीर्षरेषा नागमोडी कधीही काढू नये. ओळ नागमोडी काढल्याने अक्षर काढण्याची गती मंदावते आणि सौंदर्यही वाढत नाही.

अक्षरातील अनुस्वार टिंबात्मक द्यावेत. ते पूज्यात्मक अथवा शून्यात्मक काढू नयेत. अनुस्वार पूज्यात्मक काढल्याने अक्षर काढण्याची गती मंदावते. सौंदर्यही वाढत नाही.

देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहावयाची लिपी असल्यामुळे अक्षराचा प्रत्येक अवयव डावीकडून उजवीकडे व वरून खाली काढावा. याउलट उजवीकडून डावीकडे आणि खालून वर अवयव काढीत गेल्यास अक्षराची गती मंदावते. सौंदर्यही कमी होते.

अक्षरात कोन अगर कोपरे व आवश्यक तेथे जाड-बारीकपणा आला की अक्षर फार सुंदर दिसते. अक्षराचे सौंदर्य अशा रीतीने वाढविण्यासाठी पेन अथवा फाउंटन पेन काहीसे तिरके धरून लिहावे.

आत्मविश्‍वास आणि दृढ निश्‍चय यांच्या जोरावर जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास अल्पावधीतच अक्षर सुंदर बनते.

अप्पा गोवेकर यांचा हा अक्षरयज्ञ ‘आधी केले मग सांगितले’ या स्वरुपाचा असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानाला अनुभवाचे पाणी चढलेले आहे. अलीकडे असे जाणवते. समाजात जशी विचारसरणी तशीच झरणीही दिसायला लागली आहे. ‘वापरा आणि फेकून द्या’ अशा बॉलपेनांचा सर्वत्र सुळसुळाट झालेला आहे. या पेनांना केंद्रबिंदू स्थिर नसल्यामुळे अक्षरे लयबद्ध पदन्यास न करता नावाप्रमाणे ‘बॉलडान्स’ करतात. लिहायच्या वेळेला आणि विशेषतः परीक्षेच्यावेळी रुसून बसतात. अशा पेनांमुळे अक्षरांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हरवत चाललेले आहे.

कोणतीही संहिता मुद्रणासाठी पाठविण्यापूर्वी ती सुवाच्च आणि शुद्ध स्वरूपाची असणे आवश्यक आहे. मराठीच्या साहित्यसंसारात ज्यांची हस्ताक्षरे उठून दिसतात त्यात आचार्य अत्रे, साने गुरूजी, बा. भ. बोरकर, वि. स. खांडेकर, प्रा. वा. ल. कुलकर्णी, प्रा. वसंत बापट, मंगेश पाडगावकर, प्रा. शांता शेळके, प्रा. शंकर वैद्य, व. पु. काळे, ग. दि. माडगुळकर, प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर, कुडाळ तालुक्यातील नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय, वालावलचे माध्यमिक शिक्षक भा. भा. वारंग, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव माध्यमिक विद्यालयाचे चित्रकला शिक्षक रामचंद्र मेस्त्री, प्रा. एस. एस. नाडकर्णी, डॉ. विलास खोले, डॉ. वसंत पाटणकर, श्रीकृष्ण बेडेकर, लक्ष्मण पित्रे (जे स्वतः सुलेखनाची मोहीम धडाडीने चालवितात.) आणि भिकू पै आंगले यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. जुन्या नव्या पिढीतील ही अवघीच नावे आहेत. ही यादी सर्वसमावेशक नाही. प्रा. श्री. पु. भागवत आणि प्राचार्य गोपाळराव मयेकर तसेच सावंतवाडीचे कवी कै. डॉ. वसंत सावंत यांच्या वैशिष्ट्यपूर्ण, लपेटदार अक्षरलेखनाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. सरतेशेवटी प्रा. वसंत बापट यांच्या विवेचनाने या लेखाचा समारोप करावासा वाटतो.

‘कोशातले शब्द हे सुरवंटासारखे असतात. तर कवितेत त्यांना पंख फुटतात. ज्ञानेश्‍वरीतील भाषा कशी वेगाने दौडते तर कधी संथ वाहते, तुकाराम भाषाही क्षणात फटिंग, क्षणात राजस बनते.

‘ज्ञानेश्‍वरी’ हे मराठी भाषेचे सौंदर्य आणि तुकारामांची अभंगवाणी हे मराठी भाषेचे सामर्थ्य. या सौंदर्य-सामर्थ्याच्या संगम तीर्थावरून रुढार्थाने साक्षर नसलेल्याही माणसांच्या मुखांतून उत्स्फूर्त बोल निघतात ः ‘ग्यानबा तुकाराम’. ते शब्द, टाळ, मृदंग, पखवाज, कासाळे यांच्या नादब्रह्मात विलीन होतात. काळ्या मातीतील शब्द निळ्या नभाशी भिडतात. पार्थिवतेचा हृदयसंवाद अपार्थिवतेशी होतो. संतांची भेट अनंताशी होते. त्या ज्ञानदेवीचे बोल आहेत.

अकार चरणयुगुल| उकार उदर विशाल|

मकार महामंडळ| मस्तकाकारें॥

हे तिन्ही एकवटले| तेथ शब्दब्रह्म कवळलें|

ते मियां श्री गुरुकृपा| नमिलें| आदिबीज॥

तुकारामांच्या समर्थ आणि अमोघ वाणीवर अबीर गुलाल उधळीत आधुनिक कालखंडातील प्रथितयश कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे ‘तुकोबांच्या घरी’ या कवितेत म्हणतातः

जाऊ तुकोबाच्या घरी

करू पुण्याईची वारी

कपाळाला लागो शिळा

तुका झाला तळमळा

डोह हंबरे गाभारा

परिसरात पुकारा

लाखो पापण्यांच्या वह्या

जळी ठेवल्या कोरड्या

वर आला जो हुंकार

तो हा मराठी ॐकार

अक्षरांकडून अक्षरलेखनाकडे झालेला हा प्रगल्भ आणि परिणत प्रवास.