अकिलावर निलंबनाची टांगती तलवार

0
99

श्रीलंकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज अकिला धनंजया याच्या गोलंदाजी शैलीविषयी मागील दहा महिन्यांत दुसर्‍यांदा शंंका उपस्थित करण्यात आली आहे. पुढील १२ दिवसांत त्याला बायोमॅकेनिक्स चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या चाचणीत अपयशी ठरल्यास धनंजयावर वर्षभरासाठी निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार दोन वर्षांच्या कालावधीत दोववेळा चाचणीत नापास होणार्‍या खेळाडूंवर या तर्‍हेची कारवाई केली जाते. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्या शैलीविषयी देखील पंचांनी आपली शंका उपस्थित केली आहे.

विल्यमसन यापूर्वी २०१४ साली झालेल्या चाचणीत अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर १२ महिन्याच्या निलंबनाची कारवाई शक्य नाही. मागील वर्षी डिसेंबरमध्ये धनंजयाला निलंबित करण्यात आले होते. यानंतर त्याने आपल्या शैलीत थोडेफार बदल करत बायोमॅकेनिक्स चाचणी यशस्वीपणे पार केली होती.

पुनरागमनानंतर त्याच्या गोलंदाजीतील धार बोथट झाली होती. त्यामुळे श्रीलंकेच्या विश्‍वचषक संघात त्याला स्थान मिळाले नव्हते. न्यूझीलंडविरुद्ध गॉल कसोटीच्या पहिल्या डावात ८० धावांत ५ बळी घेत त्याने प्रभावी मारा केला होता. धनंजयावर निलंबनाची कारवाई झाल्यास त्याची कारकीर्द धोक्यात येणार आहे. तसेच श्रीलंकेचे पुढील सहा कसोटी सामने आशिया खंडात असल्याने प्रमुख फिरकीपटूविना त्यांना उतरावे लागू शकते. गुरुवारपासून श्रीलंका व न्यूझीलंड यांच्यात दुसर्‍या कसोटी सामन्याला सुुरुवात होणार असून या कसोटीत धनंजया व विल्यमसन हे दोघेही गोलंदाजी करू शकणार आहेत.