अंग बाहेर येणे ..

0
4620

– वैदू भरत म. नाईक

अंग बाहेर येणे म्हणजे गुद किंवा योनी यांच्या स्नायू आकुंचन-प्रसरणाच्या प्रमुख कार्यात उणेपणा येणे. ताणले जाणे व पूर्ववत होणे हा स्नायूंचा स्वाभाविक गुणधर्म, परसाकडे वेग आल्यावर गुदाचे स्नायू प्रसरण पावून नंतर त्यांचे आपोआप आकुंचन होत असते. तसेच स्वाभाविक कार्य योनीच्या स्नायूंकडून अपेक्षित असते. स्नायूंचा लवचिकपणा कमी झाला किंवा नाहीसा झाला म्हणजे गुद किंवा योनीबाहेर आलेल्या अवस्थेत थोडा काळ व वरचा काळ रोग्याच्या कमी-अधिक अवस्थेप्रमाणे राहते. हा सारा वायूचा खेळ आहे. वायुवरील नियंत्रण व स्नायूंचे वाजवी पोषण असा दुहेरी विचार या विकारातून सतत डोळ्यासमोर हवा.
कारणे ः
* गुदभ्रंशाची कारणे ः १) परसाकडचा वेग फार वेळेला येईल असे वातुळ पदार्थ सतत खाणे उदा. शेवभाजी, चिवडा, शिळे अन्न, खूप थंड पदार्थ, तिखट इत्यादी. २) परसाकडे पुनःपुन्हा जाण्याची भावना निर्माण होणे पण प्रत्यक्षात न होणे, जोर करावा लागणे, ३) मलप्रवृत्ती चिकट होणे, शेंबडासारखी होणे, ४) बालकांना दात येण्याच्या काळात किंवा अन्य कारणाने खूप जुलाब होऊन गुदभ्रंश हा विकार होतो. ५) अवेळी व उशीरा किंवा भूक नसताना पुनःपुन्हा जेवण करणे, ६) कृमी किंवा जंत, मुळव्याधाच्या मोडामुळे परसाकडेमध्ये अडथळा होणे.
* योनीभ्रंशाची कारणे ः १) वातुळ पदार्थ अधिक प्रमाणात खाणे, ताकदीच्या पलीकडे काम करण्याने आर्तव, अनियमित व लवकर लवकर येण्याने, २) कमी पोषणामुळे शरीरातील मांसधातूचे काम करण्याची ताकद कमी होणे, ३) अति प्रसवामुळे.
पथ्यापथ्य
* गुदभ्रंश ः- १) पोटात वायू धरेल, पोट डब्ब होईल, पोट फुगेल, पोटास तडस लागेल, शोचास किंवा लघवीचा अवरोध होईल असे खाणे-पिणे नसावे. २) खूप वेळा परसाकडे जावे लागेल असे खाण्यापिण्याचे पदार्थ टाळावेत. ३) हरभरा, बटाटा, मटकी, वाटाणा, मटार, पोहे, चुरमुरे, तेलकट थंड पदार्थ, शिळे अन्न, तीखट, मिरच्या कटाक्षाने खाऊ नयेत.
* योनीभ्रंश ः- १) मासिक पाळीचे सत्र बिघडणार नाही असा आहार असावा. २) पाळी पुढे-मागे ढकलण्याकरीता नको ती औषधे घेऊ नयेत. ३) अतिश्रमाची कामे टाळावी. ४) मासिक पाळीच्या काळात अधिक विश्रांती घ्यावी. ५) तिखट, आंबट व पोटात वायू धरेल असे पदार्थ टाळावेत.
लक्षणे
* गुदभ्रंश – १) परसाकडच्या वेग येण्याचे वेळेस गुदाचा भाग मोठ्या प्रमाणात बाहेर व थोड्या वेळाने आपोआप आत जाणे.
२) परसाकडच्या वेलेस गुदाचा भाग बराच बाहेर येणे व तो तसाच बाहेर राहणे व हाताने ढकलून आत सारावा लागणे.
* योनीभ्रंश – १) लघवीचे व पाळीचे वेळेस योनीचा भाग थोड्या प्रमाणात बाहेर येणे व थोड्या वेळाने आपोआप आत जाणे,
२) लघवी व पाळीचे वेळी योनीचा बराच भाग बाहेर येणे व तो तसाच बाहेर राहणे व हाताने ढकलून आत सारावा लागणे.
शरीर परीक्षण
– खाली बसून वा वाकून गुद बाहेर येते का? किती वेळ राहतो? तसेच आत ढकलावा लागतो का? याचे परीक्षण करावे.
– गुदवलीवर मोड किंवा लाली किंवा आजूबाजूला कातड्यासारखे आहे काय? याचे परीक्षण करावे.
उपचाराची दिशा
पोटात वायू धरणे कमी होते का यावर लक्ष ठेवावे. तसेच मलमूत्राचे वेग कमी होतात का? याकरीता विचार व्हावा. या गोष्टी सुधारल्या असे वाटले तर ‘भ्रंश’ कमी होणार, औषधे नीट काम करणार व शस्त्रकर्माची गरज नाही हे लक्षात ठेवावे.
अनुभविक उपचार
* गुदभ्रंश ः १) कूटजादिकषाय तीन चमचे समभाग पाण्याबरोबर घेणे.
२) अभयारिष्ट चार चमचे समभाग पाण्याबरोबर घेणे.,
३) त्रिफळा गुग्गुळ तीन-तीन गोळ्या सकाळी व संध्याकाळी बारीक करून घेणे.
४) सकाळी परसाकडे साफ व समाधानकारक व्हावी म्हणून रात्री किंवा पहाटे त्रिफला चूर्ण किंवा हरडा चूर्ण यांपैकी एक औषध एक चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावे. ५) खूप तिखट लोणची, मिरची खाऊन शौचास फार वेळा जावे लागत असेल व त्यानंतर गुदभ्रंश झाला असेल तर नागकेशव चूर्ण पाण्यासोबत घ्यावे.
शतावरी कल्प दोन ते तीन चमचे एक गरम कप दुधाबरोबर दोन वेळा घ्यावे.
* योनीभ्रंश ः १) शतावरीधृत दोन चमचे सकाळी व सायंकाळी घ्यावे.,
२) अशक्तपणा अधिक जाणवत असल्यास शतावरी कल्प दोन ते तीन चमचे एक ग्लास दुधाबरोबर दोन वेळा घ्यावे.
३) मासिक पाळी एकदाच नियमित काळी व साफ जावी म्हणून पाळीचे अगोदर सात दिवस कुमारीआसव चार चमचे दोन वेळा समभाग पाण्याबरोबर घ्यावे,
४) अंगावर विटाळ फार जास्त असल्यास प्रवाळ, कामदुधा व चंदनादिवटी प्रत्येकी तीन-तीन गोळ्या सकाळी व सायंकाळी पाण्याबरोबर घ्याव्यात.
५) चंदनगंधक उगाळून एक चमचा दोन वेळा घ्यावे.