अंगणवाडी कर्मचारी-पोलिसांत झटापट

0
19

>> मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा

>> आंदोलनकर्त्या चार कर्मचारी जखमी

येथील आझाद मैदानावर गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांनी काल आल्तिनो पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेऊन बंगल्यासमोर धरणे धरले.
या धरणे आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि अंगणवाडी कर्मचारी यांच्यात झालेल्या झटापटीत चार अंगणवाडी कर्मचारी जखमी झाल्या. यावेळी पोलिसांनी अंगणवाडी कर्मचार्‍यांचे सल्लागार व कामगार नेते हृदयनाथ शिरोडकर यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांकडून आपणाला असभ्य वागणूक मिळाल्याचा आरोप शिरोडकर यांनी केला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या धरणे आंदोलनाच्या वेळी उपस्थिती लावून अंगणवाडी कर्मचार्‍यांना पाठिंबा दिला. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या धरणे आंदोलनाला काल सात दिवस पूर्ण झाले. या कर्मचार्‍यांनी सरकारी यंत्रणेकडून आंदोलनाची दखल घेतली जात नाही तोपर्यंत दिवस व रात्र आझाद मैदानावर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारची रात्र अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आझाद मैदानावर घालविली.
दरम्यान, महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालिकेने आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांच्या विषयांवर चर्चा केली.

दरम्यान, यावेळी पोलिसांनी आमच्यावर लाठीमार केला असा आरोप कर्मचार्‍यांनी केला. आंदोलक महिलांना अडवण्यासाठी महिला पोलिसांना तैनात का केले नाही असा सवाल कर्मचार्‍यांनी केला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.