-ः सरळवाट ः- म्हापशातील सहकारी बँका व पतसंस्था

0
323
  • प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

 

संजीवनी सहकारी साखर कारखाना, मच्छीमार सहकारी संस्था यांसारख्या सहकार क्षेत्रातील संस्था कार्यरत असतानाच गोमंतकाच्या विविध भागांत सहकारी बँका व सहकारी पतपेढ्या सुरू झाल्या. याला म्हापसानगरीही अपवाद नव्हती.

 

मुक्तीनंतरच्या कालखंडात गोमंतकात सहकार कायदा अस्तित्वात आला. ग्राहक सहकारी संस्थांमार्फत नागरिकांना स्वस्त दरात धान्यपुरवठा केला जाऊ लागला. ‘गोवा राज्य सहकारी बँक मर्यादित’ ही सहकार क्षेत्रातील शिखर बँक सुरू झाली. संजीवनी सहकारी साखर कारखाना, मच्छीमार सहकारी संस्था यांसारख्या सहकार क्षेत्रातील संस्था कार्यरत असतानाच गोमंतकाच्या विविध भागांत सहकारी बँका व सहकारी पतपेढ्या सुरू झाल्या. याला म्हापसानगरीही अपवाद नव्हती.

सर्वप्रथम म्हापशातील नागरिकांनी एकत्र येऊन ‘म्हापसा ग्राहक सहकारी संस्था’ स्थापन करून स्वस्तदरातील धान्यवितरणास सुरुवात केली. म्हापसा पालिका बाजारपेठेतील एका दुकानात ही सहकारी संस्था कार्यरत होती. आज या संस्थेचा व्याप बराच वाढला असून ‘म्हापसा बाजार’ या आस्थापनामार्फत म्हापसा नगरपालिका बाजारपेठ व म्हापसानगरीच्या विविध भागांत सुरू केलेल्या शाखांमधून धान्य वितरणाबरोबरच इतर जीवनावश्यक वस्तूंची किफायतशीर दरात विक्री होते. याशिवाय सहकारी तत्त्वावरील विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यरत असून ‘म्हापसा बाजार’प्रमाणेच ‘बार्देस बाजार’ ही सहकारी तत्त्वावरील संस्था म्हापसानगरीच्या आणि गोव्याच्या विविध भागांत कार्यरत आहे.

‘दि म्हापसा नागरी सहकारी बहुराज्य

बँक मर्यादित’ या बँकेचा उत्कर्ष व पतन

दि म्हापसा अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. या सहकार क्षेत्रातील बँकेची स्थापना इ.स. १९६० च्या मध्यावर झाली. म्हापसानगरीतील छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांना त्यांच्या व्यवसायास हातभार लागावा यासाठी ही बँक सुरू करण्यात आली होती. त्यासाठी म्हापसानगरीतील काही प्रमुख व्यापार्‍यांनी सहभाग घेतला व ही सहकारी बँक अस्तित्वात आली. या प्रमुख व्यापार्‍यांमध्ये सवश्री पुरुषोत्तम प्रभू वालावलकर, बाबा हिरू नायक, बांदिवड्याचे भगवंत प्रभू पर्रीकर, पुरुषोत्तम भगवंत पर्रीकर, महादेव पुंडलिक कामत धाकणकर, विनायक पुंडलिक कामत धाकणकर, गोपाळकृष्ण विठ्ठल प्रभू पर्रीकर, व्यंकटेश विठ्ठल प्रभू पर्रीकर, विनायक विठ्ठल प्रभू पर्रीकर, जनार्दन दत्तात्रय झारापकर, वसंत उत्तम जोशी, हरी नीळकंठ फळारी, रघुवीर शाणू पानकर, गजानन शाणू पानकर, पांडुरंग दत्ताराम पानकर, विनायक रामचंद्र नायक, श्रीपाद श्रीकृष्ण प्रभू साळगावकर, अनिल शांताराम कामत, विनायक दत्ताराम सावकार, दियोग जुआंव सिक्वेरा, गोपाळ मंगेश नाईक, रामकृष्ण मंगेश नाईक, प्रभाकर शिवराम पानकर, दत्ताराम केशव मंत्रवादी, लवचंद्र दत्ताराम गवंडळकर, क्लेमेंत पिएदाद डिसौझा, जगन्नाथ खलप, रघुवीर नारायण बोडके आदी व्यापार्‍यांचा सहभाग होता. अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना कर्ज वितरित करून त्यांच्या व्यापार-व्यवसायात त्यांना सहकार्य केले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या व व्यापार्‍यांच्या दृष्टीने ही सहकारी बँक अडीअडचणीच्या वेळी मदत करणारी अन्नदायीनी होती.

एकमेकांवरील विश्‍वास व आदर यामुळे सहकारी बँक असूनही या बँकेच्या संचालक मंडळासाठी कधी निवडणूक होत नव्हती. सर्व संचालक बँकेच्या आणि सदस्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्वंकष विचार करून निर्णय घेत असल्यामुळे आणि निःस्वार्थी वृत्तीच्या संस्थापक सदस्यांमुळे संचालक मंडळ बिनविरोध निवडून यायचं!

‘म्हापसा नगरी सहकारी बँक’ सुरुवातीला येथील श्री. जयराम रामचंद्र सिरसाट यांच्या म्हापसा नगरपालिका बाजारपेठेसमोरील ‘रामचंद्र बिल्डिंग’च्या पूर्वेकडील कोपर्‍यावर असलेल्या आस्थापनात सुरू झाली होती आणि बँकेचे पहिले अध्यक्ष म्हणून कै. बाबा हिरू नायक बांदिवडेकर यांची निवड करण्यात आली होती.

अस्मादिकांना आजही आठवतं. इ.स. १९७२ च्या दरम्यान अस्मादिकांनी वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवली. अस्मादिक त्यावेळी शिक्षकी पेशात होते आणि गोव्यातील एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे म्हापसा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. शिवाय श्रीमहारुद्र देवस्थानजवळील सावंत यांच्या इमारतीच्या तळमजल्यावरील पान-सिगारेट विक्रीचे दुकानही सांभाळीत होते. त्यामुळे ‘हॉटेल धाकुली’ या हॉटेलच्या एका भागात सिगारेटची घाऊक विक्री करणारे कै. वासुदेव शिरोडकर यांच्याकडे सिगारेट खरेदीसाठी व त्यांना या कार्यात मदत करणारे स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार कै. महाबळेश्‍वर नाईक यांच्याकडे येणे-जाणे होत असे. वृत्तप्रतिनिधी म्हणूनही कार्यरत असल्यामुळे कै. महाबळेश्‍वर नाईक यांनाही ‘कॅफे धाकुली’मध्ये अस्मादिक भेटण्यासाठी जात असत. अस्मादिकांनी वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवल्याचे कळताच त्यांनी अस्मादिकांच्या ज्ञानाचा फायदा ‘म्हापसा नागरी सहकारी बँके’स व्हावा यासाठी संचालक मंडळ सदस्यत्वाची निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. त्याचवेळी म्हापसानगरीचे बाजारपेठेतील आमचे एक मित्र कै. वासुदेव सावंत हेही ही निवडणूक लढविण्यास उत्सुक होते. त्यामुळे दि म्हापसा नागरी सहकारी बँकेच्या निवडणुका जाहीर होताच अस्मादिक व कै. वासुदेव सावंत यांनी निवडणुकीसाठी आपली उमेदवारी दाखल केली. ही उमेदवारी दाखल करताना तत्कालीन संचालक मंडळावर अविश्‍वास दाखवण्याचा उद्देश नव्हता तर संस्थेच्या उत्कर्षास आपलाही हातभार लागावा आणि आपण घेतलेल्या बँकिंग या विषयावरील पदव्युत्तर पदवीचा फायदा बँकेस व्हावा हाच ही निवडणूक लढवण्याचा इरादा होता. आम्ही उमेदवारी दाखल केल्यामुळे या सहकारी बँकेवर संचालक मंडळासाठी निवडणूक घेण्याचा प्रसंग प्रथमच आला. या निवडणुकीवेळी बँकेचे अध्यक्ष म्हणून निरलस व निःस्वार्थी वृत्तीचे म्हापशाचे प्रथितयश वकील ऍड. मनोहर सिनाई उसगावकर होते, तर उपाध्यक्ष म्हणून पणजीतील धेंपो वाणिज्य महाविद्यालयातील एक प्राध्यापक, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अस्मादिकांनी ‘अकौंटन्सी ऍण्ड ऑडिटिंग’चे ज्ञान मिळवले ते चार्टर्ड अकौंटंट व्ही. बी. प्रभू वेर्लेकर हे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. संचालक मंडळासाठी निवडणूक न होता एकमताने सर्व संचालकांची निवड व्हावी यासाठी या दोन्ही महनीय व्यक्तींनी प्रयत्न करून त्यांच्या गटातील एका उमेदवाराला आपली उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. परंतु सदर उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेता बँकेच्या भागधारकांना मतदानासाठी आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे मग आम्ही आमच्या बाजूने मतदान करू शकणार्‍या भागधारकांना आणून मतदान करून घेतले. मतमोजणीच्या वेळी आम्ही दोघेही निवडून आल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी जाहीर केले. बँकेच्या संचालक मंडळाचा सदस्य म्हणून अस्मादिक संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण कार्यरत राहिले.

इ.स. १९७५ साली अस्मादिक प्रथम म्हापसा नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून व नंतर इ.स. १९७७ मध्ये म.गो. पक्षाचा उमेदवार म्हणून म्हापसा मतदारसंघातून गोवा, दमण व दीव संघप्रदेश विधानसभेवर निवडून आले. साधारणतः १९७७-७८ च्या दरम्यान ‘दि म्हापसा नागरी सहकारी बँके’च्या संचालक मंडळासाठी झालेली निवडणूक अस्मादिकांसह म.गो पक्षाचे आमदार ऍड. रमाकांत खलप व काही म.गो. पक्षाचे पदाधिकारी यांनी लढवली आणि निवडूनही आले. निवडून आलेल्या संचालकांमध्ये तत्कालीन बँकेचे अध्यक्ष ऍड. मनोहर सिनाई उजगावकर व उपाध्यक्ष श्री. व्ही. बी. प्रभू वर्लेकर यांचाही समावेश होता. इ.स. १९७८ च्या दरम्यान दि म्हापसा नागरी सहकारी बँकेतील माझ्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत तत्कालीन म. गो. पक्षाच्या मुख्यमंत्री कै. शशिकलाताई काकोडकर यांनी अस्मादिकांची ‘गोवा राज्य सहकारी बँक मर्यादित’ या सहकार क्षेत्रातील शिखर बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. दरम्यान ‘दि म्हापसा नागरी सहकारी बँके’च्या संचालक मंडळावर म.गो. पक्ष आमदारांची व पदाधिकार्‍यांनी निवड झाल्याचे कळताच कै. शशिकलाताई काकोडकर यांनी बँकेचे अध्यक्ष ऍड. मनोहर सिनाई उजगावकर यांच्या बँकेच्या उत्कर्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचीच पुन्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड व्हावी अशी अस्मादिकांकडे इच्छा प्रदर्शित केली. पुढे निवडून आलेल्या संचालकांच्या आग्रहाखातर ज्या ऍड. मनोहर सिनाई उजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचे धडे घेतले त्यांच्या विरोधात जाऊन, त्यांना बाजूला सारून ऍड. रमाकांत खलप बँकेचे अध्यक्ष बनले.