-ः बंध रेशमाचे ः- अक्षयतृतीया

0
304
  • मीना समुद्र

आज संपूर्ण जगातल्या मानवाला ग्रासणार्‍या कोरोनाच्या संकटावेळी आपण संयमाची आणि निःस्वार्थी सेवेची जोड देऊन, होता होईल तेवढे दान गरजूंसाठी करावे आणि सर्वांचे आरोग्य अक्षय, अखंड, अबाधित राहावे- यातच अक्षयतृतीया साजरी करण्याचे सार्थक आहे!

 

आज अक्षयतृतीया म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीया. हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस. आपल्या भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्त अतिशय शुभ मानले गेले आहेत. चैत्रप्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, वैशाख तृतीया म्हणजे अक्षयतृतीया, अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी किंवा दसरा हे तीन संपूर्ण दिवस आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा दिवस अशा प्रकारे वर्षभरातले कोणत्याही कामासाठी शुभफलदायी असे हे मुहूर्त मानले गेले आहेत.

अक्षय तृतीयेला अक्षय्य तृतीया असेही म्हणतात आणि या दिवशी कृतयुगाची किंवा त्रेतायुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. भगवान परशुरामाचा जन्मही याच दिवशी झाला त्यामुळे परशुराम जयंतीही या दिवशी साजरी केली जाते. यासंबंधी एक कथा सांगितली जाते ती अशी की, शाकलदेशात धर्म नावाचा एक अत्यंत सदाचरणी, सत्यवचनी, नित्यनेमाने देवपूजा करणारा वाणी राहात होता. त्याने ब्राह्मणमुखातून अक्षयतृतीयेचे माहात्म्य ऐकले. या दिवशी पितरांना संतुष्ट करण्यासाठी स्नान, होम, दान, तर्पण करतात हे ऐकून त्याने नदीवर पितरतर्पण करून देवपूजा केली आणि पाण्याने भरलेला घट व दक्षिणा ब्राह्मणांना अर्पण केली. त्याने मोठ्या श्रद्धेने आणि एकनिष्ठतेने हा नेम दरवर्षी चालू ठेवला. देवाचे नामस्मरण करताना त्याला मृत्यू आला. त्या पूर्वजन्मीच्या पुण्याईने त्याला पुढच्या जन्मी राजपद मिळाले तेव्हाही त्याने दानधर्म चालूच ठेवला. त्याचा खजिना कधीच रिकामा झाला नाही. तो अक्षय राहिला.

‘अक्षय’ या शब्दाचा हाच अर्थ आहे. अक्षय म्हणजे अमर, अवीट. आत्मा अविनाशी, अमर आहे हा आपल्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. त्यामुळे एका जन्मात मृत्यू झाला तरी पुनर्जन्मात माणसाचे पूर्ण पुण्यसंचित कामी येते आणि त्यात सातत्य राखल्याने ते कायम राहाते, एवढेच नाही तर वाढत राहाते हेच या कथेवरून आपल्याला कळते.

अ-क्षय म्हणजे क्षय नसलेला. क्षय म्हणजे खंड, र्‍हास, हानी. परंतु माणूस एखादे काम सुरू करतो उत्साहाने; पण त्यात त्याने दिरंगाई केली, आळस केला, सातत्य राखले नाही तर ते शेवटासही जात नाही आणि सुफलही होत नाही. आपल्या कामावर; आपण जे काही करतो त्यावर आपला पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा, पूर्ण प्रयत्नसातत्य राखले तरच ते कल्पनातीत यशस्वी होते. त्याला अक्षयत्व, अखंडत्व आणि अमरत्व म्हणजेच सुयश लाभते. मग ते व्यक्तिजीवनात असो की सम÷ष्टीजीवनात असो. सम÷ष्टीजीवनात तर मतभेद न करता, खंड न पाडता कार्य सफल करणे अधिक महत्त्वाचे. सामाजिक किंवा व्यावहारिक जीवनातही म्हणूनच ‘अक्षयतृतीया’ महत्त्वाची. या दिवशी, या सुमुहूर्तावर केलेले काम नेहमी सुफलदायी आणि अविरत, अखंड चालणारेच असेल या विश्वासाने, या श्रद्धेने माणसे मुलांची मुंज, साखरपुडा, विवाहविधी, बारसे, गृहप्रवेश आणि व्यक्तिगत आनंदाचे क्षण अक्षयतृतीयेला साजरे करतात. तसेच सामाजिक जीवनात कार्यालये, इमारतीचा कोनशिला समारंभ, ग्रंथ प्रकाशन, सभा-संमेलनांचे उद्घाटन यासाठी हाच दिवस सुयोग्य म्हणून निवडतात. या दिवशी केलेले काम हे नक्कीच टिकेल आणि सतत चालू राहील अशी खात्री आणि असा मोलाचा मानसिक आधार या मुहूर्ताने मिळतो. ही श्रद्धा किंवा अनुभवाने जनमानसात रुजलेली धारणा माणसाचा आत्मविश्वास जागविणारी, साशंकता नष्ट करणारी, क्रियाशीलतेला आणि चैतन्याला वाव व चालना देणारी, आधार देणारी, त्यामुळेच नेहमीच उत्कर्षाची, आनंदाची ठरल्यास नवल नाही.

तसा हा काळच सृष्टीतल्या चैतन्याचा! चैत्रात वसंतागमन होऊन त्याने आपले पाय पक्के रोवलेले असतात. चैत्रपालवी, मोहर, पाना-फुला-फळांचे बहर यांनी सजलेली पृथ्वी, सृष्टी. सगळीकडे चैजन्याचा खळाळ अन् सूर्यतेजाचा चढतावाढता झळाळ. हीच झळाळी वृक्षवेलींच्या अंगाखांद्यावर सतेज टवटवीत, घवघवीत पाने-फुले-फुले आणि रसदार फळे घेऊन अवतरते. पृथ्वी अग्नितप्त आणि अग्निदीप्त त्यामुळे सृष्टीतल्या रूपसंपदेचा निखार जाणवतो तशीच माणसाच्या जीवाची मात्र उष्म्यामुळे काहिली होत असते. तप्त शरीर आणि तप्त मन शांत करण्यासाठी जणू आंबा, फणस, काजू, कलिंगडांसारखी सरस सुरस फळे; जांभळे, कोकम, करवंदांसारखी रानफळे आपल्या सेवेला हजर होतात. सुरंगी, अबोली, चोनचाफा, मोगरा अशी विविध रंधरंगानी युक्त मादक वा शीतलसुगंधी फुले फुललेली असतात. पिवळ्या बहाव्याचा, तसेच लाल गुलमोहराचा नखशिखान्त बहर नजर खिळवून ठेवतो. शुभ्र आणि लाल चाफाही तेवत असलेला दिसतो. सावरीची लालजर्द पेलाकारी फुले पाखरांशी गुजगोष्टी करत असतात. काही झाडाच्या बोंडातून सावरीच्या रूपेरी पर्‍या उडत असतात. भुंगे गुंजारव करत असतात.

सृष्टीच्या लावण्यामुळे आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलविणारा वसंतोत्सव म्हणजे रसरंगनाद, रूपगंध यामुळे नयनोत्सव आणि रसनोत्सव होत असतो. त्यामुळे अक्षयतृतीया ही समृद्धीची, संपन्नतेची सुलक्षण साक्ष वाटते. जिथे प्रसन्न मन असते आणि सर्व प्रकारची समृद्धी असते तिथे आपोआप उदारतेनं ते दुसर्‍याला द्यावंसं, दान करावंसं वाटतंच. अक्षयतृतीया वैशाखात येत असल्याने वणव्याच्या झळीने तप्त झालेल्या, संत्रस्त झालेल्यांना शांत करण्यासाठी जलकुंभदान केले जाते. रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी आणि काही दुकाने, आस्थापने येथेही मोठमोठे जलकुंभ ठेवलेले असतात. प्रवासी वाटसरूंसाठी आणि तहानलेल्यांसाठी ती अतिशय सुखद सोय असते. मंदिरातून अभिषेकपात्रेही अक्षय भरली जातात. गंध, सुपारी, यव, फुलं, द्रव्य घातलेला घट सुताने वेढे देऊन दक्षिणेसह दान करणे हे पुण्याचे मानले जाते. या धर्मघटाचे वर्णन ‘ब्रह्माविष्णुशिवात्मक’ असे केले असून हे दान दिल्यामुळे वितर, पितामह तृप्त होतात अशी धारणा आहे. आपल्या प्रिय व्यक्तींची आठवण आपल्याला नेहमीच येत असते. सणावाराला ती दूर असतील तर जास्तच. तसेच एखादी व्यक्ती जगातच नसेल तर तिची आठवण अशा रूपात क्षयतृतीयेला केली जाते. त्यानिमित्त होणारे दान हे मनःशांती देते. एकूणच हा एक कृतज्ञता दिवस असे वाटते.

या दिवशी शेतकरी कामाला सुरुवात करतात. पेरणी, उगवण, साठवण, दान अशी अखंड प्रक्रिया त्यामुळे सुरू राहाते. अक्षय समृद्धी देणारी ही तृतीया ‘अखेती’ किंवा ‘अखिती’ म्हणूनही ओळखली जाते. चैत्र प्रतिपदेपासून तो अक्षयतृतीयेपर्यंत स्त्रिया ‘चैत्रांगण’ काढतात. आंबाडाळ, पन्हे, भिजवलेल्या हरभर्‍याची ओटी यामुळे फुलापानांनी सजवलेली चांदीच्या पाळण्यात झुलणारी चैत्रागौर प्रसन्न होते. गुलाबपाणी, मोगरा-वाळा-हीना अशा अत्तराच्या वासांनी हळदीकुंकवाला आलेल्या स्त्रिया विसावतात. मने शीतल सुगंधाने प्रसन्न, हर्षोत्फुल्ल होतात. ग्रीष्मावर मात करण्यासाठी अक्षयतृतीया ही जणू गुरुकिल्ली आहे.

आज संपूर्ण जगातल्या मानवाला ग्रासणार्‍या कोरोनाच्या संकटावेळी आपण संयमाची आणि निःस्वार्थी सेवेची जोड देऊन, होता होईल तेवढे दान गरजूंसाठी करावे आणि सर्वांचे आरोग्य अक्षय, अखंड, अबाधित राहावे- यातच अक्षयतृतीया साजरी करण्याचे सार्थक आहे!