-ः खुले मैदान ः- ‘कोरोना फायटर्स’ मोहिमेत माजी विश्वविजेत्या खेळाडूंचेही योगदान

0
286

 

  • सुधाकर रामचंद्र नाईक

आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षितिजावरील अजोड कामगिरीमुळे राज्यशासनात उच्चतम हुद्दे मिळालेले हे भारतीय खेळाडू आता जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून देशवासीयांना बहुमूल्य सल्ला देण्याची जबाबदारी पार पाडीत आहेत.

 

तमाम विश्वाला पार हादरविलेल्या ‘कोरोना व्हायरस’ने सर्व जग संभ्रमित बनले असून प्रत्येक देश आपापल्या परीने या दुष्टचक्राचा सामना करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी 23 मार्चला ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. 21 दिवसांचा हा कालावधी आता 3 मेपर्यंत वाढविण्यात आलेला असून त्यामुळे काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसत आहे.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी या महामारीवर नियंत्रण राखण्यासाठी अविश्रांत प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक राज्यातील सरकार, सेलेब्रेटीज, समाजसेवी संस्थाही आपापल्या परीने लोकांना धीर देत आहेत. प्रधानमंत्री मोदींनी ‘लॉकडाऊन’च्या कालखंडात जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलेले असून त्या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी पोलीस दल अहोरात्र झटत आहे.

कोरोना पीडितांचा जीव वाचविण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी प्रयत्नशील आहेत तद्वतच पोलीस दलही लोकांना सुरक्षित घरी राहाण्यासाठी अहोरात्र, अविश्रांत ड्युटी बजावत आहेत. राज्यांच्या सीमा, चेकनाके, चौकाचौकांत पोलिसांची गस्त अविरत जारी असते आणि ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ असा सल्ला देण्याचे कार्य ते बजावत आहेत. नाठाळांना जरब बसविण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसीखाक्याचाही अवलंब करावा लागतोच म्हणा, पण अशा बिकट समयी पोलिसांचा संयमच जास्त दिसून येतो.

भारतीय क्रिकेट संघाचा एक माजी ‘वर्ल्ड कप मॅचविनर’ जोगिंदर शर्मा हरयाना पोलिस दलातर्फे जनतेला ‘घरी रहा, स्वस्थ रहा’ असा सल्ला देण्याचे कर्तव्य पार पाडीत आहे. द. आफ्रिकेत झालेल्या 2007 मधील आयसीसी टी-20 विश्वचषकातील हा हिरो हरयाना पोलिस दलात उपअधीक्षक असून ‘लॉकडाऊन’ कालावधीत पोलिसदलासमवेत रस्त्यावर उतरून जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहे.

23 ऑक्टोबर 1983 रोजी रोहतक, हरयाना येथे एका सर्वसामान्य कुंटुंबात जन्मलेल्या जोगिंदर याने एक दर्जेदार द्रुतगती गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून क्रिकेक कारकीर्द सुरू केली. जोगिंदरने 2002-03 मध्ये हरयानातर्फे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जोगिंदरने मध्य प्रदेशविरुद्ध शानदार पदार्पणात 81 धावा आणि 84 धावांत 11 बळी अशी प्रभावी कामगिरी बजावीत हरयानाला 103 धावांनी विजय मिळवून दिला. उजव्या हाताने प्रभावी तेज गोलंदाजी करणार्‍या जोगिंदरने पहिल्याच मोसमात आपला ठसा उमटविताना 24 बळी आणि 280 धावाही केल्या. आपली प्रभावी कामगिरी जारी राखताना जोगिंदरने 2003-04 मधील मोसमात 23 बळी आणि 148 धावा केल्या. रणजीमधील या कामगिरीवर जोगिंदरची उत्तर विभाग संघात निवड झाली आणि तेथेही त्याने दुलीप करंडक आदी स्पर्धांत आपली छाप पाडली. 2004 मध्ये जोगिंदरने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. बांगलादेशविरुद्ध चटगाव येथे तो आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध ढाका येथील सामन्यातही तो खेळला. जोगिंदरची आंतरराष्ट्रीय कारकीदर्ं विशेष दीर्घ ठरली नाही. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याला केवळ चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली.

तथापि, अल्पशा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतही जोगिंदरने आपला ठसा उमटविताना भारताला विश्वचषक जिंकून देण्याची मर्दुमकी गाजविली. द. आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वचषकातील अखेरच्या दोन्ही सामन्यांतील जोगिंदरची कामगिरी सदैव स्मरणात रहाण्याजोगी ठरावी. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला अंतिम षटकात विजयासाठी 22 धावांची गरज होती आणि मायकल हसीसारखा अव्वल फलंदाज यष्टिवर होता, पण जोगिंदरने भेदक गोलंदाजीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फटकेबाजीची मुळीच संधी न देता दोन महत्त्वपूर्ण बळीही घेतले आणि भारताला 15 धावांच्या विजयासह अंतिम फेरीत नेले. अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे कडवे आव्हान आणि त्याना जिंकण्यासाठी अंतिम षटकात केवळ 13 धावांची गरज होती आणि कर्णधाराने परत एकदा चेंडू जोगिंदरकडेच सोपविला. जोगिंदरचा पहिला चेंडू ‘वाइड’ ठरला, तिसर्‍या ‘फूलटॉस’वर मिसबाह उल हकने षटकार खेचला. जोगिंदरने हिंमत न हारता पुढचा चेंडू ‘आउड साइट दी ऑफ स्टंप’ टाकला आणि अतिआत्मविश्वासी मिसबाहने ‘स्कूप’ फटक्याद्वारे चेंडू सीमापार करण्याचा धाडसी प्रयत्न केला पण तो प्रयत्न ‘बूमरँग’ ठरला आणि श्रीसंतने लिलया झेल टिपल्याने पाकिस्तानचा डाव आटोपला आणि भारताला अजिंक्यपद प्राप्त झाले.

टी -20 विश्वचषकातील भारतीय विजयाच्या या शिल्पकाराचा हरयाना सरकारने उचीत सत्कार करताना 21 लाखांचा पुरस्कार आणि पोलिस दलात अधिकारी पद बहाल केले. 13 वर्षांच्या पोलिस दलातील सेवेत असलेला जोगिंदर सध्या डेप्युटी सुपरिंटेंड ऑफ पोलिस म्हणून कार्यरत आहे.

क्रिकेटर म्हणून देशासाठी योग्यतम योगदान दिलेला जोगिंदर आता पोलिस अधिकारी म्हणून बिकट समयी देशसेवेत सक्रिय आहे. राज्यातील सर्वसाधारण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकार्‍याची जबाबदारी आव्हानात्मक आहे आणि आपण ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतोय. प्रधानमंत्र्यांच्या ‘लॉकआऊट’ आवाहनाचे पालन करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून जनतेला ‘घरी रहा, स्वस्थ रहा’ असा सल्ला देतो. बहुतेकदा लोक आपल्या छातीवरील नाव वाचून ओळखतात, क्रीडाक्षेत्रातील आपल्या कामगिरीची दखल घेतात आणि आमची विनंती आनंदाने मान्य करतात, असे जोगिंदर म्हणतो.

हरयाना पोलिस दलात विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेटस्टार जोगिंदर शर्माव्यतिरिक्त राष्ट्रकूल मेळा सुवर्णपदक विजेता मुष्टियोद्धा अखिल कुमार, आशियाई मेळा विजेता कबड्डीपटू अजय ठाकूर आदी अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू ‘कोविड 19 लॉकडाऊन’ अंमलबजावणीत जनतेला ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ असा संदेश देण्याची जबाबदारी पार पाडीत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षितिजावरील अजोड कामगिरीमुळे राज्यशासनात उच्चतम हुद्दे मिळालेले हे भारतीय खेळाडू आता जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून देशवासीयांना बहुमूल्य सल्ला देण्याची जबाबदारी पार पाडीत आहेत. कोरोना महामारीला रोखण्यासाठी त्यांचे हे योगदान खरोखरच निस्पृह आणि वाखणण्याजोगे असून त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो आणि देश तथा विश्व कोरोना विषाणूमुक्त होवो अशी प्रार्थना करूया.