-ः खुले मैदान ः- अष्टपैलू क्रीडापटू चुन्नी गोस्वामी काळाच्या पडद्याआड

0
154
  • सुधाकर नाईक

‘कौशल्य, कर्तृत्व आणि प्रावीण्य’ या गुणत्रयीवर भारतीय क्रीडाक्षितिजावर आधिपत्य प्रस्थापिलेले माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तथा प्रथमश्रेणी क्रिकेटपटू सुबिमल ऊर्फ चुन्नी गोस्वामी यांचे नुकतेच कोलकात्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्याविषयी…

 

‘कौशल्य, कर्तृत्व आणि प्रावीण्य’ या गुणत्रयीवर भारतीय क्रीडाक्षितिजावर आधिपत्य प्रस्थापिलेले माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तथा प्रथमश्रेणी क्रिकेटपटू सुबिमल ऊर्फ चुन्नी गोस्वामी (८२) यांचे नुकतेच (३० एप्रिल रोजी) कोलकात्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

१९६२ मधील आशियाई मेळ्यातील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधारपद भूषविलेले चुन्नीदा हे भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगातील एक अलौकिक मुकुटमणी होत. गोस्वामी, हल्लीच निधन झालेले पी. के. बॅनर्जी आणि तुलसीदास बलराम हे आघाडीवीर त्रिकुट भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार, साक्षीदार होत. ऑलिंपियन चुन्नीदांचे कौशल्य, पदलालित्य आणि प्रावीण्य विलक्षण, विस्मयकारी होते आणि त्यामुळेच नामवंत भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सुभाष भौमिक यांनी त्यांची तुलना रोनाल्दिन्हो, रोनाल्डो या महान ब्राझिलियन फुटबॉलस्टारशी केली होती.

भारताच्या महान क्रीडापटूंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ एकच नव्हे तर फुटबॉल आणि क्रिकेट या दोन्ही क्रीडाप्रकारांत आपला ठसा उमटविला.

१५ जानेवारी १९३८ रोजी अविभक्त बंगालमधील किशोरगंज जिल्ह्यात (विद्यमान बांगलादेश) जन्मलेले सुबिमल गोस्वामी उपजत क्रीडापटू होते. १९४६ मध्ये वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी ते मोहन बगानच्या ज्युनियर संघात दाखल झाले. बलायदास चटर्जी यांनी गोस्वामींची गुणवत्ता हेरली आणि योग्य मार्गदर्शन दिले. १९५३ पर्यंत ते मोहन बगानच्या ज्युनियर संघातर्फे खेळले. १९५४ मध्ये संघसूत्रधारांनी त्यांना सीनियर संघात बढती दिली आणि फुटबॉलमधील निवृत्तीपर्यंत ते केवळ मोहन बगान ऊर्फ मरिनर्सतर्फेच खेळले आणि संघाचे यशस्वी आघाडीवीर म्हणून त्यांनी नामना प्राप्त केली. संपूर्ण फुटबॉल कारकीर्द केवळ एकमेव मोहन बगान क्लबतर्फे घालविलेले चुन्नीदा यांनी आपल्या कारकिर्दीत मरिनर्सतर्फे सुमारे २०० गोल नोंदले आणि कारकिर्दीत बगानला १४ अजिंक्यपदे प्राप्त करून दिली. १९६० च्या दशकातील मोहन बगानच्या सुवर्णयुगात त्यांना जर्नैल सिंग, टी. ए. रेहमान हे अव्वल बचावपटू, मध्यरक्षक अशोक चटजीर्र्, गोलरक्षक पीटर थंगराज आदि नामवंत खेळाडूंची साथ लाभली. १९६० ते ६४ या पाच वर्षांच्या कर्णधारपदाच्या कालखंडात चुन्नीदांनी मोहन बगानला सलग तीन ड्युॅरँड चषक आणि सलग चार वेळा कोलकाता लीग अजिंक्यपदे मिळवून दिली.

फुटबॉल कारकिर्दीच्या ऐन बहरात चुन्नीदांना नामवंत प्रशिक्षक बिल निकोलसन यांच्या मार्गदर्शनाखाली टोटेनहॅम या इंग्लिश क्लबतर्फे ‘ऑफर’ आली होती पण त्यानी ती विनम्रपणे नाकारली. मोहन बगानतर्फे उत्तम पाठबळ आणि देशी फुटबॉलप्रेमींकडून लाभणारे अलोट प्रेम माझ्यासाठी अधिक मोलाचे आहे असे सांगत त्यांनी विदेशी आमिष धुडकावले.

१९५४ ते १९६४ या कालावधीत चुन्नीदा यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ५० आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या चुन्नीदांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९६२ मधील जकार्ता एशियार्डमध्ये अंतिम फेरीत तूल्यबळ दक्षिण कोरियाला नमवून अजिंक्यपदाचा मान प्राप्त केला. १९६४ मध्ये भारताला आशिया कप रौप्यचषक मिळवून दिला. चुन्नीदांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिंपिक, एशियन गेम्स, आशिया कप, मर्डेका कप आदी स्पर्धांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

१९६२ मध्ये आशिया खंडातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार मिळालेले गोस्वामी यांच्या धवल कामगिरीची नोंद घेत केंद्र सरकारतर्फे १९६३ मध्ये प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने आणि १९८३ मध्ये पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले.

१९६८ मध्ये चुन्नीदांनी फुटबॉल संन्यास घेतला पण क्रीडा मैदानापासून फारकत घेतली नाही. त्यानी आपला मोहरा क्रिकेट मैदानाकडे वळविला आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही आपले कर्तृत्व प्रस्थापिले. १९६२-६३ ते १९७१-७२ या दशकभराच्या कालखंडात गोस्वामी बंगालतर्फे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून चमकले. प्रथम श्रेणी कारकिर्दीतील ४६ सामन्यांत चुन्नीदांनी एक शतक आणि ७ अर्धशतकांसह १५९२ धावा आणि ४७ बळीही घेतले. १९७१-७२ मधील मोसमात चुन्नीदांच्या नेतृत्वाखालील बंगालने रणजी चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील अंतिम सामन्यात मुंबईने पहिल्या डावातील आघाडीवर बंगालवर मात करीत जेतेपद मिळविले. चुन्नीदांच्या ९६ धावांवर बंगालने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या पण अजित वाडेकरच्या १३३  धावांवर मुंबईने ४६९ धावा फटकावीत पहिल्या डावात आघाडी घेतली. चुन्नीदांनी दुसर्‍या डावातही ८४ धावा ठोकीत ७ बाद २६१ वर डाव घोषित केला, पण मुंबईने दुसर्‍या डावात ३ बाद ७७ धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीवर जेतेपद मिळविले.

सुमारे दशकभर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या चुन्नीदांनी जानेवारी १९७२ मध्ये बिहारविरुध्द कारकिर्दीतील सर्वोच्च १०३ धावा २६५ मिनिटांत नोंदल्या. हे त्यांचे कारकिर्दीतील पहिले आणि एकमेव प्रथम श्रेणी शतक होय.

चुन्नीदांच्या क्रिकेट कारकिर्दीतील आणखी एक धवल आलेख म्हणजे, १९७१-७२ मध्ये गॅरी सोबर्स यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाला पराभूत करण्यातही त्यांनी मौलिक योगदान दिले. हनुमंत सिंह यांच्या नेतृत्वाखालील मध्य आणि पूर्व विभागाच्या संयुक्त संघाचा इंदूर येथे वेस्ट इंडीजविरुध्द सामना रंगला आणि त्यात गोस्वामी आणि सुब्रतो गुहा यांच्या प्रभावी कामगिरीवर मध्यपूर्व संघाने पाहुण्याना पराभूत केले. चुन्नीदांनी  विजयात महत्त्वपूर्ण योगदान देताना आठ बळी घेतले होते.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलनंतर स्थानिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही आपले कौशल्य, आधिपथ्य सिध्द केलेल्या चुन्नीदांनी १९७० च्या दशकात भारतीय फुटबॉल संघाचे निवड समिती सदस्यपदही भूषविले. तसेच १९९६ मध्ये सुरू झालेल्या इंडियन फुटबॉल लीगच्या सल्लागार समितीतही त्यांनी योगदान दिले.

भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार, शिल्पकार असलेले चुन्नीदा अखेर वार्धक्य आणि हार्टऍटॅकमुळे पंचत्वात विलीन झाले. राष्ट्रीय संघसाथी पी. के. बॅनर्जीनंतर महिन्याभरातच चुन्नीदांनीही इहलोक त्यागला असून भारतीय फुटबॉलसाठी हा मोठा धक्काच ठरावा. चुन्नीदा यांच्या मागे पत्नी आणि पुत्र सुदीप्तो असा परिवार आहे.

भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार तथा शिल्पकार असलेल्या चुन्नीदांनी आपल्या अलौकिक कर्तृत्वाने भारतीय फुटबॉल क्षितिजावर आपले नाव अधोरेखित केलेले असून फुटबॉलबरोबरच क्रिकेटमध्येही महारथ गाजवित भारतीय युवा पीढीपुढे नवा आदर्श, नवा कित्ता घालून दिलेला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत नव्या पीढीने क्रीडानैपुण्याला झळाळी देणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरावी.