हे कलात्मक स्वातंत्र्य?

0
10

भारतीय समाजमानसावर पिढ्यानपिढ्या अधिराज्य करून राहिलेली रामायणाची चिरनूतन कथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या नावाखाली लेखक दिग्दर्शक ओम भारतकुमार राऊत यांनी ‘आदिपुरुष’ मध्ये तिचे जे वाटोळे केले आहे, ते कीव आणणारे आहे. तब्बल सहाशे कोटी खर्च करून देशातील सर्वांत खर्चिक चित्रपटांपैकी एक ठरलेल्या या चित्रपटाने मोठ्या अपेक्षा बाळगून असलेल्या प्रेक्षकांचा घोर अपेक्षाभंग तर केलाच, परंतु संवादांपासून दृश्यांपर्यंत सगळ्या बाबतींत निराशाही केली आहे. या चित्रपटातील हनुमानाचे छपरी संवाद असोत किंवा व्हीएफएक्समध्ये हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपटांतील दृश्यांची केलेली सहीसही नक्कल असो, चित्रपटातील पात्रांचे चित्रविचित्र पेहराव असोत किंवा वाल्मिकी रामायणाच्या कथेशी घेतलेली बेछूट फारकत असो, अनेक कारणांनी सध्या या चित्रपटावर टीकेची प्रचंड झोड उठताना दिसते आहे. लोकमान्य ः एक युगपुरुष, तानाजी या चित्रपटांनंतर एवढी मोठी झेप ओम राऊत यांनी घेतल्याने त्याबाबत सर्वांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु दीर्घ प्रतिक्षेनंतर आलेल्या ‘आदिपुरुष’ने प्रेक्षकांसमोर जे काही ठेवले, ते सर्व अपेक्षांवर बोळा फिरवणारे ठरले. मोठ्या अपेक्षेने हा चित्रपट पाहायला जाणारे प्रेक्षक चित्रपट अर्ध्यावर सोडून बाहेर पडताना दिसत आहेत. या चित्रपटाबाबत सर्वाधिक आक्षेप घेतला गेला तो मनोज मुंतशीर शुक्ला या तरुणाने लिहिलेल्या त्यातील संवादांना. रामायणातील पात्रांना – भले मग तो हनुमान असो अथवा रावण, काही मूल्ये आहेत. रावण हा जरी कुकर्मी असला तरी तो शिवभक्त ब्राह्मण होता हे सर्वविदित आहे. हनुमान हा रामाचा परमभक्त होताच, परंतु तो नैतिकतेचाही आदर्श मानला जात आला आहे. राम, सीता, हनुमान ही भारतीय जनमानसात पूजली जाणारी दैवते आहेत. अशावेळी कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांच्या पोशाखांपासून संवादांपर्यंत वाट्टेल ती मोकळीक घेण्याचा अधिकार या मंडळीना दिला कोणी? तद्दन गल्लाभरू देमार बॉलिवूडपटासारखे हनुमानाच्या तोंडचे ‘बाप’ काढणारे संवाद या चित्रपटाची पातळी दर्शवतात. शाकाहारी रावण यात आपल्या वाहकाला मांस खायला घालतो. सीतेचा जन्म राजा जनकाच्या पोटी मिथिलेत म्हणजे आजच्या नेपाळमध्ये झाला होता हे सर्वज्ञात असताना ती भारतात जन्मलेली दाखवली गेली आहे. हे प्रकरण येथेच संपत नाही. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून टीझरपर्यंत आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातल्या दृश्यांवर नक्कल केल्याचा गंभीर आरोप होऊ लागला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधील प्रभासची पोझ ही वानरसेना स्टुडिओजच्या एका शंकराच्या पोस्टरची नक्कल असल्याचा आरोप त्यांनी केला, तेव्हापासून या चित्रपटावर चौर्यकर्माचा आरोप सतत होत राहिला आहे. चित्रपटांतील अनेक दृश्ये गेम ऑफ थ्रोन्स, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, प्लॅनेट ऑफ द एप्स या हॉलिवूडच्या निर्मितींमधील दृश्यांची सहीसही नक्कल आहेत हे प्रेक्षकांनी सप्रमाण दाखवून दिलेले आहे. रामायणाच्या कथेला या मंडळींनी एखाद्या देशी व्हिडिओगेमची अवकळा आणली. रामकथेला हास्यास्पद पातळीवर आणलेले स्पष्ट दिसत असूनही स्वतःला संस्कृतिरक्षक म्हणवणारे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते याबाबत ब्र काढायला तयार नाहीत, यावरून यामागचे हितसंबंध स्पष्ट होतात. बहुतेक तटस्थ चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटावर टीकेची झोड उठवलेली असताना एका विशिष्ट प्रसारमाध्यम संस्थेशी संबंधित परीक्षणांमध्ये मात्र या चित्रपटाला भरपूर स्टार दिले गेले, त्यातून मनोरंजन उद्योगामध्ये पडद्यामागे काय चालत असते त्याचेही दर्शन घडते. चित्रपट असो, नाटक असो किंवा अन्य काही, एखादी कलाकृती जेव्हा सादर केली जाते, तेव्हा ती जर इतिहासाशी निगडित असेल किंवा समाजाच्या श्रद्धास्थानांशी संबंधित असेल, तर त्यासंदर्भात तथ्यांची मोडतोड होणार नाही याची काळजी संबंधितांनी घेतलीच पाहिजे. ती घेतली गेली नाही तर मग त्याविरुद्ध पोलीस तक्रारी, जनहित याचिका दाखल होणे, आंदोलने होणे असे प्रकार होतात. पण ही नकारात्मक प्रसिद्धीही शेवटी गल्ला भरण्यास कारणीभूत ठरत असल्याने अशा वादांना जाणीवपूर्वक वाव दिला जातो का हीही विचार करण्याजोगी बाब आहे. ‘बॉक्स ऑफिसवरचा प्रतिसाद महत्त्वाचा’, ‘मला जे रामायण समजतेय ते मी मांडलेय’ वगैरे युक्तिवाद करून स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा सध्या जो प्रयत्न चालला आहेे, तो पटणारा नाही. आधी आपल्या छपरी संवादांचे केवीलवाणे समर्थन करून झाल्यानंतर आता प्रचंड टीका होत असल्याने ते संवाद बदलण्याची तयारी दाखवली गेली आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नसते, परंतु काळ सोकावत असतो. कलात्मक स्वातंत्र्य आणि बेछूट मोकळीक यात फरक आहे आणि सुजाण प्रेक्षकांना तो नक्कीच कळतो!