करमल घाटातील अपघातात 1 पर्यटक ठार

0
7

>> धोकादायक वळणावर टँकरच्या धडकेने कार कोसळली दरीत;
>> 4 पर्यटक जखमी;
>> जखमींवर काणकोण आरोग्य केंद्रात उपचार

अंधेरी-मुंबई येथून पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या पर्यटकांच्या कारला काल करमल घाटात एका धोकादायक वळणावर टँकरची धडक बसली, त्यात कारमधील पाच जणांपैकी एका 19 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला. वरुण गांधी (19) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. या अपघातात मेद पाटवा (19), अमेय जंत्रे (19), सिया चौरदिया (19) व सेवागी लोधा (19) हे चार पर्यटक जखमी झाले. काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा अपघात घडला.
काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी-मुंबईतील पाच पर्यटकांचा गट गोवा फिरायला आला होता. ते रविवारी मडगाव येथून रेंट-अ-कार घेऊन पाळोळे येथे आले होते. काल दुपारी 3.30 च्या सुमारास पाळोळे येथून मडगावच्या दिशेने जात असताना करमल घाटात मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या एलपीजी टँकरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने ती दहा मीटर खोल दरीत कोसळली. करमल घाटातील सातत्याने अपघात होणाऱ्या धोकादायक वळणावरच हा अपघात घडला. कार दरीत कोसळल्यानंतर त्याखाली सापडून वरुण गांधी याचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच काणकोण अग्निशामक दलाचे जवान व काणकोण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीना खोल दरीतून वर काढून उपचारासाठी दाखल काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. एका पर्यटकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी काणकोण पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस पुढील तपास करीत आहेत.

करमल घाट नव्हे, ‘मरणघाट’
एका बाजूने गुळे ते करमल घाटपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. नुकताच सभापती रमेश तवडकर यांनी या त्याचा शुभारंभ केला होता. पावसाळ्यापूर्वी करमल घाटातील सदर वळण दुरुस्त केले नाही, तर या भागातील अपघातांची शृंखला चालूच राहणार असून, करमल घाट रस्त्याला ‘मरणघाट’ असे जे नाव पडले आहे, ते सार्थ ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त
होत आहेत.

तुटलेल्या कठड्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
करमलघाट उतरणीवर व धोकादायक वळण असलेल्या ठिकाणी काणकोणच्या बाजूने उभारण्यात आलेला लोखंडी संरक्षण कठडा गेल्या एका महिन्यापूर्वी ट्रकच्या धडकेने मोडून पडला होता. हा कठडा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यासंबंधीचे वृत्त दै. ‘नवप्रभा’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी कठड्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने आज एक युवकाचा नाहक बळी गेला, असा आरोप काणकोण पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप केंकरे यांनी केला. या मृत्यूला सरकारी अधिकारीच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

‘त्या’ वळणावर आतापर्यंत 9हून अधिक अपघात
करमल घाटातील सदर धोकादायक वळणावर 9 पेक्षा अधिक अपघात झालेले असून, गुळे ते बाळ्ळीपर्यंतचा रस्ता होईल तेव्हा होईल. निदान त्या आधी या धोकादायक वळणाची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी काणकोणच्या नागरिकांतून होत आहे.