Home बातम्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर प्रणय प्रसंग

हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर प्रणय प्रसंग

0

प्रा. मिलिंद म्हाडगुत

हिं दी चित्रपट म्हटला म्हणजे त्यात प्रणय प्रसंग असणे ओघाने आलेच. हल्लीच्या चित्रपटांतील प्रणय प्रसंगात तर थिल्लरपणाच जास्त दिसत असतो. पण पूर्वीच्या चित्रपटांतील प्रणय प्रसंग बरेच जिवंत वाटायचे. प्रणय प्रसंग हा जरी हिंदी चित्रपटांचा महत्त्वाचा गाभा ठरत असला तरीसुद्धा बहुतेक प्रणय प्रसंग हे भडकच वाटत आले आहेत. पण तरीही राजकपूर नर्गीस, दिलीपकुमार मधुबाला, धमेंद्र हेमामालिनी सारख्या जोड्यांनी या प्रणयांना एक वेगळेच स्वरूप प्राप्त करून दिलेले आहे. म्हणूनच हिंदी चित्रसृष्टीतील प्रणय प्रसंगांचा विचार केल्यास मोगले आझम, कागजके फुल व श्री ४२० या तीन चित्रपटांतील प्रणय प्रसंग हिंदी चित्रपटसृष्टीतील माइल स्टोनठरलेले आहेत.

चित्रपट मोगले आझम. कलाकार : दिलीपकुमार मधुबाला, दिग्दर्शक के आसीफ. या चित्रपटातील बडे गुलाम अली खॉंचे ते शास्त्रोक्त गाणे प्रेम जोगन बन केव त्यावर शहजादा सलीम व अनारकली यांचा खुललेला प्रणयशहजादा सलीम व अनारकली ही दोघे भव्य कमानीखाली वनराईत विसावलेलीतिच्या संगमरवरी चेहर्‍यावरून तो मोराचे पीस फिरवू लागतो, ती शहारते. तो तिचे दोन्ही बाहू पकडून तिच्याजवळ सरकतो. ती डोळे मिटून घेत लालभडक ओठ पुढे करते. मोराच्या पिसाखाली दडलेले या दोघांचे चेहरे सुप्त प्रणयाचा आविष्कार उभे करतात. दिग्दर्शक के. आसीफने टिपलेला हा चमत्कार भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ प्रणय प्रसंग म्हणून नोंदला गेला आहे. खानसाहेबांनी अस्सल रागदारीतल्या चिजा आळवूनही, त्यावर फिल्मी संगीताचा फारसा लेप न लावताही मोगले आझममधील या प्रणयप्र्रसंगाना कमालीची लोकप्रियता मिळाली होती. आणि आजसुद्धा हा प्रणयप्रसंग हिंदी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड म्हणून मिरवला जातो.

दुसरा चित्रपट : कागज के फूल. कलाकार गुरुदत्त आणि वहिदा रेहमान. गाणे : वक्त ने किया क्या ऐसी सितम…, दिग्दर्शक : गुरुदत्त. या गाण्यामध्ये शांती आणि सुरेश सिन्हा डोळ्यांनी बोलताना दिसतात. त्यांच्या अंतर्मनातील कल्लोळ कैफी आझमीच्या शब्दांतून आणि गीता दत्तच्या गळ्यातून व्यक्त होतो. गुरुदत्तने अंधारमय विश्‍वाचे सुरेख चित्र मांडताना त्यात सावल्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खेळ दर्शविले आहेत. प्रकाशझोत एकावरून दुसर्‍यावर फिरवून प्रतीकात्मक परिणाम साधला आहे. सिनेमास्कोपच्या विराट वाइड अँगलमधून चित्रित झालेल्या लंब्या चौड्या सावल्या म्हणजे दिग्दर्शक गुरुदत्तच्या सर्जनशीलतेचे परिपूर्ण रूप म्हणायला हवे. नायक नायिका जाग्यावर ठेवूनसुद्धा केवळ प्रतिकात्मकतेचा आधार घेऊन एक प्रभावी प्रणय प्रसंग उभा करण्यात गुरुदत्त यशस्वी ठरलेले आहेत.

तिसरा चित्रपट : श्री ४२०. कलाकार राजकपुर नर्गीस, दिग्दर्शक राजकपुर, गाणे : प्यार हुआ इकरार हुआएकाच छत्रीत लगटून उभे नायक नायिका रस्त्याच्या कोपर्‍यात पावसापाण्यात कुडकुडत स्वत:च चहा पीत बसलेला चहावाला भैय्या, मै न रहुँगी तुम न रहोंगे फिर भी रहेगी निशानियॉं म्हणत नायकांना वास्तव दाखविणारी नायिका व धो धो पावसात रेनकोट घालून निघालेली ती तीन मुले हा संपूर्ण नजाराच माणसांना धुंद करून सोडतो. राजू विद्या म्हणजे राजकपुर नर्गीसचा छत्रीखालचा सौम्य प्रणय आदर्श चित्रीकरणाचा, चित्रणातून मिळालेल्या सिनेमॅटीक परिणामाचा उत्कृष्ट नमुना ठरतो. याला अर्थातच संगीतकार शंकर जयकिशनाचाही सिंहाचा वाटा आहे. गाण्याच्या सुरुवातीला असलेले संगीत योग्य वातावरण निर्मिती करते. तसेच गीतकार शैलेंद्रचे शब्दही तेवढेच परिणामकारक वाटतात. या तीनही चित्रपटांना प्रदर्शित होऊन नाही म्हटले तरी ५० वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. तंत्र, आजच्या मानाने जुने असले तरी नायक नायिकेची जमलेली केमेस्ट्री’, परिणामकारक गीतरचना, कर्णमधुर संगीत व मुख्य म्हणजे दिग्दर्शकाचे अफलातून टेकिंगयामुळे ही गाणी व प्रणयप्रसंग आजही तेवढेच ताजे वाटतात. या तीनही प्रणयी प्रसंगांत काम करणारी प्रेमी युगले ही त्या काळात प्रत्यक्षातही प्रणयी युगले होती. दिलीपकुमार मधुबाला यांचे प्रेमप्रकरण त्यावेळी भलतेच तेजीत होते. दोघेही निकाहकरणार होती. पण मधुबालाच्या पैशांवर डोळे ठेवून बसलेला तिचा बाप अल्लाउतखॉं मध्ये तडफडला व या प्रेमप्रकरणाचा बोर्‍या वाजला. पण सलीम अनारकलीच्या भूमिकांत दिलीप मधुबाला इतकी समरस झाली होती की प्रत्यक्षातले प्रेम ती पडद्यावर जगत आहे असेच वाटत होते. तीच गोष्ट गुरुदत्त वहिदा रेहमानची.

त्याकाळी गुरुदत्त विवाहित होता. पण तरीही त्याचा जीव वहिदामध्ये अडकला होता. यामुळेच चिडून गुरुदत्तची पत्नी गीता त्याचे घर सोडून निघून गेली होती. पण गुरुदत्त वहिदाच्या प्रेमाचे सुर कागजके फुलच्या त्या गाण्यातून प्रतीत होताना दिसतात. पुढे वहिदानेही साथ सोडल्यामुळे निराश झालेला प्रतिभाशाली दिग्दर्शक गुरुदत्त आत्महत्या करून हे जग सोडून गेला. राजकपुरही विवाहित असूनसुद्धा नर्गिसच्या प्रेमात पागल झाला होता. त्यातूनच श्री ४२० मधल्या त्या अजरामर गाण्याचा जन्म झाला. हे गाणे बघताना आजही या दोघांचे जमलेले ट्युनिंगआपल्याला अवाक करून सोडते. नंतर नर्गिस सुनील दत्तशी लग्न करून राजला सोडून गेली. पण राज तिला शेवटपर्यंत विसरू शकला नाही.

नर्गिसच्या अत्ययांत्रेत डोळे पुसत चाललेला राजकपुर लोकांचे लक्ष वेधून घेत होता. म्हणूनच रुपेरी पडद्यावरच्या या तीन अजरामर प्रणय प्रसंगातून त्या असफल प्रेमाचा आविष्कारही प्रतीत होताना दिसतो. त्यातील प्रेमाच्या उत्कटतेबरोबरचा भावनिक ओलावा व मनाची तगमग याची फोडणी मिळाल्यामुळेच हे तीन प्रणय प्रसंग महान म्हटले आहेत यात शंकाच नाही.