– प्रमोद आचार्य
आता त्याला ‘रथ’ म्हणणं धाडसाचं ठरेल.
संपूर्ण वातानुकूलित कोच. फ्लॅट स्क्रीन टीव्ही, व्हीसीडी प्लेयर, म्युझिक सिस्टम, टॉयलेट, पॅन्ट्री आणि उपलब्ध असलेलं प्रत्येक उपकरण चालवण्यासाठी दरेका सीटपाशी अत्याधुनिक कंट्रोल पॅनल.
भारतीय जनता पक्षाचे पुढारी लालकृष्ण अडवाणींच्या जनचेतना यात्रेच्या रथात चढण्याचा आम्हाला मान मिळाला आणि आतमधील वातावरण बघून आम्ही थक्क झालो.
‘‘काय हाय-टेक आहे याच्यात… सगळं साधंसुधं आहे… तुम्हीही हलताय, मीही हलतोय, तुमचा कॅमेरामनही हलतोय… मग कसलं आलंय हाय-टेक?’’ चढताक्षणीच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते रविशंकर प्रसादांशी वाद सुरू झाला.
म्हटलं, आपण व्होल्वो कोच हा विषय घेऊन का भांडतोय? या विषयावर चर्चा करायला आपण थोडाच एवढा आटापिटा केलाय…? चढताना मनोहर पर्रीकरांनी मला सांगितलेलं- ‘‘मुलाखतीचं मला काही माहीत नाही, तू आतमध्ये घूस. जे होतंय ते कर.’’ श्रीपाद नाईक, नरेंद्र सावईकर आतमध्ये होते. आम्ही वर चढलोय याची राजेंद्र आर्लेकरांनीही खातरजमा करून घेतली. सगळेजण एकच गोष्ट सांगत होते- आम्ही तुला आतमध्ये पोचवलं. आता तुझी लढाई तू लढ…!
मग मी सरळ विषयालाच हात घातला. ‘‘मी अडवाणीसरांशी बोलू शकतो का?’’ मी रविशंकर प्रसादांना विचारलं. त्यांनी सरळ हात जोडले. ‘‘पाया पडतो तुझ्या, पण त्यांच्याशी बोलायचं नाव काढू नकोस. तुम्ही येता, त्यांना वेडेवाकडे प्रश्न विचारता. नको ते त्यांच्या तोंडून वदवून घेता आणि नवा वाद सुरू करता. नकोच ते,’’ प्रसाद म्हणाले.
मला राग आला.
‘‘तुम्हाला काय म्हणायचंय, मिडियावाले वाद सुरू करतात? तुम्ही काहीच करत नाही… आम्ही ऑफिसमध्ये बसतो आणि आज कसला वाद सुरू करायचा असं ठरवून त्यांना प्रश्न विचारतो की काय?’’ माझा युक्तिवाद.
‘‘अरे, रागवू नकोस. त्यांना प्रश्न विचारायचं सोडून तुला पाहिजे ते कर इकडं. दिल्लीला त्यांनी मुलाखती दिल्या त्याचे परिणाम आम्ही अजून भोगतोय. तू ते सोडून काहीही कर. आम्ही ठरवलंय, नकोच त्या मुलाखती. चार राज्यं झाली, आम्ही मुलाखतीच दिल्या नाहीत,’’ प्रसाद
माझ्याबरोबर आमचा कॅमेरामन ओंकार फळारी होता. प्रसादांचे शब्द ऐकताच ओंकारने सरळ कॅमेरा सरसावला. रिकॉर्ड बटन दाबलं आणि आमची तासभराची रथयात्रा सुरू झाली. ओंकार लगबगीन आतमधील शॉट्स घेऊ लागला. रविशंकर आ वासून त्याला बघू लागले. काय करतोय हा? त्यांच्या चेहर्यावरचा भाव.
‘‘तुम्हीच म्हटलं ना, मुलाखत सोडून काहीही करा. तो तेच करतोय,’’ मी मध्ये पडलो. त्यांचं एक वाक्य आम्हाला एवढं आततायी करेल याचा बहुधा त्यांनी कधी विचारही केला नसणार.
अडवाणी केबिनमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले. बरोबर होते उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक आणि नरेंद्र सावईकर. त्यांच्या गप्पा चाललेल्या. एरव्ही रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांना ते अभिवादन करत. पण करमलघाटावर कोण येणार आदरातिथ्य करायला? सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. गोव्याचं दिलखुलास वातावरण हळूहळू बसमध्ये भरू लागलं. यात्रेच्या सिरियस मूडमध्येसुद्धा हास्य-विनोद सुरू झाले.
अडवाणी खूष होते. ‘‘एवढा प्रतिसाद माझ्या कुठल्याही यात्रेला मिळाला नाही. गोव्यातसुद्धा एवढा उत्साह… मनाला बरं वाटलं…’’ अडवाणी सांगत होते.
त्यांची ऊर्जा थक्क करणारी होती. ८४ वर्षांचा हा राजकारणी गेले वीस दिवस अखंड फिरत होता. उत्तरेहून सुरू झालेली यात्रा दक्षिणेला जाऊन पुन्हा मध्य भारतात पोचत होती, पण त्यांच्या तोंडावर ना थकवा ना चिडचिडेपणा. प्रत्येक ठिकाणी ते स्वत: उभे राहत, पाच मिनिटे बोलत आणि पुन्हा बसत.
आतमध्ये आमच्या गप्पा फेर धरू लागल्या. रविशंकर प्रसादांबरोबर भाजपचे कित्येक मातब्बर नेते आतमध्ये होते. व्यंकय्या नायडू, अनंत कुमार, गोपिनाथ मुंडे आणि अडवाणींच्या कन्या प्रतिभा.
‘‘तुम्ही अडवाणींच्या वयाच्या व्हाल तेव्हा तुम्हीही अशी यात्रा करू शकाल का?’’ मी कुतूहलाने प्रतिभा अडवाणींना विचारले.
‘‘अरे, काय सांगू तुला. त्यांचा फिटनेस आम्हा तरुणांना लाजवणारा आहे. काही लोकं मला विचारतात, थकलात का तुम्ही? मी म्हणते, आम्हाला थकण्याचा अधिकार तरी आहे कुठे? बाबांकडे बघितलं की सगळा थकवाच निघून जातो. त्यांचा आवेश वेडावून टाकणारा आहे.’’
‘‘पण मग त्यांच्या डायेटचं काय?’’
‘‘काहीही नाही. ते कधीच जास्त खात नाहीत. यात्रेसाठी असा वेगळा मेनूही नाही. दक्षिणेला होतो तेव्हा इडली वगैरे खायचो. आता पुन्हा सगळं बदलणार. प्रदेशाप्रमाणे आमचा आहार बदलतो. कुठलाही पदार्थ आवडला म्हणून ते खात बसत नाहीत. त्यांचा स्वत:वर प्रचंड ताबा आहे.’’
‘‘पण ही यात्रा अडवाणींच्या वा भाजपच्या पुनरुत्थानासाठी नाहीय…’’ अनंत कुमार बोलू लागले, ‘‘आजूबाजूला चाललेला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांचा अपव्यय बघून अडवाणी खरंच उद्विग्न झाले, म्हणून ही यात्रा!’’
यात्रा सुरू झाली तेव्हापासून भाजपच्या प्रधानमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या प्रश्नावरून वादंग सुरू झाले. मोदी, नितीश की अडवाणी या प्रश्नाने संपूर्ण पक्षाला हैराण करून टाकले. बोलताना वेळोवेळी सगळे पुढारी एकच गोष्ट पुन्हापुन्हा ठासून सांगत होते, या यात्रेमागे आणखी कसलाच उद्देश नाही.
व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांचा मुद्दा आम्ही आधीपासूनच उचलून धरलेला आहे. अण्णा हजारे वगैरे नंतर आले. त्यांना जनाधार मिळाला. पण मुद्दा आधीपासून आमचा आहे. उगाच आमची विश्वासार्हता कमी होत असल्याने आम्ही असले उपद्व्याप करतो असा आरोप आमच्यावर करू नका.’’
‘‘पण भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडलेल्या तुमच्या माणसांचं काय?’’
सगळे काही क्षण गडबडले. आम्ही कुठे कुणाला प्रॉटेक्ट करतोय. कॉंग्रेस आपल्या माणसांना सांभाळून घेते. आम्ही सरळ सांगितलंय- तपास करा. गरज पडली तरी कारवाईही करा.
पण भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सुरू झालेल्या यात्रेचा उद्देश रेड्डी-येड्डींमुळे खिळखिळा झालाय एवढं मात्र जाणवलं. ही यात्रा भारतासाठी आहे, कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही असं ते पुन्हा पुन्हा सांगत होते.
मग व्यंकय्यांनी आपल्या कोट्या सुरू केल्या. भाजपा सोडला तर दुसरा कुठलाच पक्ष कसा एकसंध राहू शकत नाही हे मला पटवून देण्यासाठी त्यांनी एकाहून एक अशा कोट्या सुरू केल्या. या कोट्या तुम्ही आज प्रुडंट मिडियावर दुपारी दोन, चार व रात्री साडेदहा वाजता बघू शकता.
गोव्याच्या वातावरणात सगळे रमायला लागले होते. मात्र संपूर्ण वातावरणात एक प्रकारचा तणाव जाणवत होता. पहिल्या दिवसापासून ही यात्रा वादात घेरली गेलेली. कॉंग्रेसप्रमाणेच भाजपचे मंत्री-संत्री भ्रष्टाचाराच्या बेफाम अश्वावर बेधुंदपणे स्वार होऊन शक्यतो सर्व स्वैराचार करत सुटलेले. अडवाणी दरवेळेला प्रधानमंत्रिपदाचा प्रश्न विचारल्यावर नवीन उत्तर देत चाललेले. मोदी आले तर नितीश नाहीत, नितीश आले तर मोदी गायब, अशा अंतर्गत वादांनीच या यात्रेला ग्रासलेले.
इन्फॉर्मल गप्पा चाललेल्या असल्या तरी सर्वांच्या मनात माझ्या दरेका वेड्यावाकड्या प्रश्नावर संशयाची पाल चुकचुकत होती. प्रत्येकाचा एकच ध्यास होता. हा जे करतोय त्यातून नवीन वाद जन्माला आला नाही म्हणजे मिळवली!
‘‘लोक वैतागलेत.’’ रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘‘लोकांचा मूड बदलतोय. त्यांना भ्रष्टाचाराचा किळस आलाय. दक्षिणेतल्या काही राज्यांमध्ये आमचे खासदारसुद्धा नाहीत. तिथे पण आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जनक्षोभ आहे आणि पुढील निवडणुकीत तो निश्चितच दिसून येईल.’’
नंतर विषय आला गोव्याचा. लगेच सगळेजण दिगंबर कामत सरकारवर तुटून पडले. ‘‘दिल्लीला कॉंग्रेस सरकारने जेवढा भ्रष्टाचार केलाय, तेवढाच गोव्यात कामत सरकारनं केलाय,’’ प्रसाद कडाडले. ‘‘लोकलेखा समितीचा अहवाल स्वीकारत नाहीत, वरून समितीचा अध्यक्षच बदलतात. आम्ही गप्प बसणार नाही. चाललंय काय यांचं?’’ व्यंकय्या गरजले.
‘‘पण गोव्यात तुम्ही सत्तेवर येऊ शकता का?’’
सगळे संभ्रमित वाटले.
मुंडे दुखावलेले. मध्ये ते पक्ष सोडतात की काय अशी हवा तयार झालेली. विचारलं तेव्हा म्हणाले, ‘‘अडवाणींच्या व्यक्तित्वापुढे सगळा कडवटपणा विरून जातो.’’
‘‘पण दुभंगलेल्या मनांचं काय?’’
‘‘असले मुद्दे या यात्रेत आणायचे नसतात,’’ मुंडे म्हणाले.
‘‘मतभेद कुठे नसतात? पण वैयक्तिक मतभेद पक्षापेक्षा मोठे असू नयेत.’’ व्यंकय्या बोलायला लागले, ‘‘आमचा पक्ष संघटनेमुळे चालतो; व्यक्तींमुळे नाही. आम्ही अडवाणींचासुद्धा आदर करतो तो त्यांची पक्षावर असलेली असीम निष्ठा आणि विचारसरणीवर असलेला निस्सीम विश्वास बघून.’’
वाजपेयी होते तेव्हा पक्षाला एकसंध ठेवू शकणारे ‘लार्जर दॅन लायफ’असे नेतृत्व पक्षाजवळ होते. २००९ सालच्या निवडणुका अडवाणींच्या नेतृत्वाखाली हरल्यावर पक्षाच्या दुसर्या फळीवर पकड असणारे अखेरचे नेतृत्वही ढासळले. म्हणूनच एनडीएला प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांकडे बघायची पाळी आली. सुषमा स्वराज विरोधी पक्षनेत्या म्हणून लोकसभेत स्थानापन्न झाल्या. मात्र संपूर्ण पक्षाची आणि पर्यायाने आघाडीची धुरा त्या पेलू शकतील यावर भाजपामध्येच अनेक गट पडले. मोदींचं नाव आलं. पण मोदी आले की वाद येतात आणि प्रधानमंत्रिपदावर बसणार्या माणसाभोवती एवढे वाद आणि लोकशाहीच्या गाभ्यालाच सुरुंग लावणारे आरोप असणे बरे नव्हे. नितीश कुमारांचं म्हणाल तर किती भाजपवाले खुल्या मनाने त्यांना आलिंगन देतील याविषयी शंकाच आहे.
अशा परिस्थितीत अडवाणी यात्रा काढतायत म्हटल्यावर अनेकांना पोटशूळ उठलेला असणारच. यात्रेची सुरुवात जेपींच्या जन्मगावापासून झाली; गुजरातेतून नव्हे. ही पक्षाची आयडियॉलॉजिकल शिफ्ट आहे की सोयीचं राजकारण यावर भाजपामध्येसुद्धा वाद असणार. पण ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणून रथयात्रा काढणारे आणि जनचेतना यात्रा काढणारे अडवाणी वेगळे वाटले.
या संपूर्ण यात्रेत ना धर्माचा विषय आला, ना रामाचा. ना हिंदूंचा, ना मुसलमानांचा. अण्णांचा भ्रष्टाचार विरोधाचा मुद्दा आणि बाबा रामदेवांचा काळ्या पैशांचा मुद्दा घेऊन अडवाणींची वारी सुरू झाली.
मध्ये ‘कॅश फॉर वोट्स’ प्रकरण पुन्हा उफाळून आले. अमरसिंगांना तुरुंगाची हवा खावी लागली आणि भाजपचे थिंक टँक म्हणवणारे सुधिंद्र कुलकर्णींसारखे रथी-महारथी अजून जामिनाची वाट बघत आहेत. अशा परिस्थितीत- अडवाणींनी ‘मला अटक करा’ अशी गर्जना केली.
मुद्दा साधा आहे. हा विषय घेऊन भाजपने २००९ ची लोकसभा निवडणूक लढवली. पण लोकांना आकृष्ट करण्यात हा मुद्दा सपशेल अपयशी ठरला. कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर आली. मग या घटनेचं आता राजकारण करून भाजपला काय साधायचंय? याचा या यात्रेला फायदा होतोय की तोटा? की फक्त नवीन वाद निर्माण होताहेत?
एवढ्यात बस अचानक थांबली आणि माझी तंद्री भंगली. बस केपेला पोचलेली. तिथे स्वागत समारंभ होता. पैंगीण-काणकोणप्रमाणे इथेही बोलायला अडवाणी उभे राहिले.
‘‘गोव्यात आलं की बरं वाटतं. छोटासा प्रदेश आहे पण इथे प्रचंड उलथापालथ होते. लोकं सुशिक्षित आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड डायनॅमिझम आहे. काही वर्षांआधी इथे मनोहर पर्रीकरांचे सरकार होते. आम्ही चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न केला,’’ अडवाणी बोलत गेले.
संध्याकाळचे पाच वाजलेले. कार्यकर्त्यांनी चहा आतमध्ये पोचवला. चहाचे घुटके घेत कुडचडेचा प्रवास सुरू झाला. वाटेवर अनेक मंडळी कुतूहलाने अडवाणींकडे बघत होती. केबिनमध्ये बसलेले अडवाणी त्यांना अभिवादन करून पुढे जात होते. यात्रा गोव्यात शिरायला सुमारे अडीच तास उशीर झालेला. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते चिंतेत होते. म्हापशाची सभा सगळ्यात महत्त्वाची होती. अडवाणी साडेनऊनंतर तिथे पोचले तर सगळा खेळखंडोबा होणार होता. कारण दहानंतर ध्वनिक्षेपक वापरता येत नाही, आणि ध्वनिक्षेपक नसताना एवढी मोठी सभा कशी घेणार? म्हणून नऊ वाजेपर्यंत अडवाणींनी तिथे पोहोचणे गरजेचे होते. सगळी लगबग चालू होती.
शेवटी आम्ही कुडचडेला पोहोचलो. तिथला जनसमुदाय बघून सगळे थक्क झाले. ‘‘गोव्याची लोकसंख्या बघितली तर प्रचंड प्रतिसाद दिसतो. काय म्हणतोस प्रमोद?’’ अनंत कुमारनी मला विचारलं.
‘‘भरपूर लोक आलेत. काही टेन्शन घेऊ नका.’’ -मी.
एकेक करून सगळे पुढारी बसमधून उतरू लागले. अडवाणी शो-स्टॉपर म्हटल्यावर ते अखेरीस उतरणार होते. मध्येच त्यांना जाणवलं, आपलं ट्रेडमार्क जॅकेट आपण घातलेलं नाहीय. ते आतमध्ये आले. जॅकेट घेतलं आणि जनमानसाला अभिवादन करत खाली उतरले.
त्याच उत्साहानं, त्याच त्वेषानं, त्याच जोषानं अडवाणी चालत स्टेजकडे वळले. तीन तास उन्हात थांबून, एक तास हलत-डुलत बसमधून प्रवास केल्याने आम्हालाही जरासा थकवा जाणवत होता. माझ्या कॅमेरामनने- ओंकार फळारीने- संपूर्ण प्रवासात कॅमेरा घेऊन अखंड सर्कस केलेली. पण आम्ही ८४ वर्षांच्या त्या तरुणाकडे बघितलं आणि ताजेतवाने असल्याचा कन्व्हिंसिंग आव आणला.
ओंकार माझ्याकडे बघून हसला. ‘‘म्हापशाला जाऊया का कव्हरेज करायला?’’ त्याने विचारले.
मी हसलो. आमची मिनी रथयात्रा संपलेली. अडवाणींची सभा सुरू झालेली.