Home बातम्या हवामानाचा मच्छिमारीला फटका

हवामानाचा मच्छिमारीला फटका

0

शेकडो ट्रॉलर नांगरलेलेच

राज्यात मच्छिमारी मोसम सुरू होऊन आठवडा पूर्ण झालेला असतानाच वादळामुळे मासळी मिळत नसल्याने ट्रॉलरवाले हवालदिल झाले असल्याचे मच्छिमारी सूत्रानी सांगितले.

मच्छिमारी मोसम सुरू होऊन आठवडा पूर्ण झालेला असतानाही मासळी न मिळण्याची गेल्या कित्येक वर्षातील ही पहिलीच घटना असल्याचे सूत्रानी स्पष्ट केले. गोव्यातील विविध जेटींवरून मच्छिमारी मोसम सुरू झाल्यानंतर शेकडो ट्रॉलर्स मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. मात्र, गेला आठवडा त्याला अपवाद ठरल्याचे सूत्रानी स्पष्ट केले.

समुद्रात गेल्यास वाईट हवामानामुळे मासळी मिळत नसल्याने तसेच वादळी वारा व पाऊस यामुळे ट्रॉलर व बोटी समुद्रात बुडण्याच्या भीतीमुळे शेकडो ट्रॉलर्स हे जेटींवरच नांगरून ठेवण्यात आले आहेत. गोव्यातील मच्छिमारी बोटींवर काम करणारे परराज्यातील खलाशीही अजून कामावर परतले नसल्याने त्याचाही मच्छिमारीवर परिणाम झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. ज्या अवघ्याच बोटी समुद्रात जात आहेत त्याना कोळंबी व अन्य प्रकारची छोटी मासळी यावर समाधान मानावे लागत आहे. जी काही तुरळक मासळी राज्यातील शहरांमधील मासळी बाजारात उपलब्ध होते तिचे दर अत्यंत महागडे असल्याने मासळी खाणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरले आहे.