– प्रा. मिलिंद म्हाडगुत
राजेश खन्ना गेला. एक युग मागे ठेवून गेला. त्या युगात फक्त राजेश आणि राजेशच होता. १९७१ साली तर जिकडे पहावे तिकडे राजेशच दिसत होता. त्या साली राजेशचे ‘आन मिलो सजना’, ‘कटी पतंग’, ‘आनंद’, ‘अंदाज’, ‘हाथी मेरे साथी’ व ‘मर्यादा’ हे सहा चित्रपट जोरात चालू होते. कोणत्याही कपड्यांच्या दुकानावर जा– राजेशचा ‘गुरू शर्ट’, ‘मर्यादा शर्ट’, ‘हाथी मेरे साथी शर्ट’ टांगलेला दिसत असे. कोणत्याही हॉटेलात जा, राजेशच्याच चित्रपटांतील गाणी ऐकू येत असत. राजेशचा करिष्माच असा होता.
पण या सुपरस्टारची सुरुवात मात्र निराशाजनक झाली होती. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने– ‘राज’ने बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला होता. नंतरचे त्याचे ‘आखरी खत’, ‘औरत’, ‘बहारों के सपने’ हेही चित्रपट बाराच्या भावात गेले होते. पण नंतर ‘आराधना’ने त्याला हात दिला. या चित्रपटाने त्या काळात युवा पिढीला अक्षरशः वेडे केले होते. राजेशच्या त्या अदांवर युवती जाम फिदा झाल्या होत्या. ‘मेरे सपनों की रानी’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘कोरा कागज था मन मेरा’, ‘गुनगुना रहे भँवर’ यांसारख्या राजेशवर चित्रीत केलेल्या गाण्यांनी त्या काळात हंगामा माजविला होता. पण राजेशचे यश ‘आराधना’पुरतेच सीमित राहिले नाही. नंतर आलेल्या ‘दो रास्ते’ने त्यावर कळस चढवला. त्यातल्या ‘छुप गये सारे नजारे ओए क्या बात हो गई’ या राजेश– मुमजातवर चित्रीत केलेल्या गाण्याने एकच धमाल उडविली होती. या चित्रपटाच्या यशाने राजेश सुपरस्टार बनला.
नंतर १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘सच्चा झुठा’नेही राजेशला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यातला त्याचा डबलरोल एवढा हिट झाला की त्या वर्षाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यालाच प्राप्त झाला. ‘सच्चा झुठा’चे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नायकही तो होता आणि खलनायकही. याच चित्रपटाबरोबर प्रदर्शित झालेल्या ‘सफर’नेही त्याचे स्थान मजबूत केले. यात नेहमीचा प्रणयी राजेश नव्हता, तर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा कर्करोगग्रस्त राजेश दिसत होता. ‘आनंद’ या ऑल टाइम क्लासिक चित्रपटातही तो कर्करोगी बनला होता. पण त्यातला नायक हा सहा महिन्यांचे आयुष्य आहे हे माहीत असूनही लोकांना आनंद देणारा मस्त कलंदर होता. या उलट ‘सफर’मधला नायक गंभीर होता. पण या दोन्ही भूमिका लोकांना भिडल्या होत्या. त्यातला ‘आनंद’ तर लोकांनी डोक्यावरच घेतला होता. या आनंदने कितीतरी दुःखी, पीडित लोकांना जगण्याची ऊर्जा मिळवून दिली होती. या चित्रपटात राजेशबरोबर त्यावेळचा नवोदित अमिताभही होता. आनंदएवढाच अमिताभचा बाबुमोशायही प्रचंड गाजला होता.
नंतर परत राजेश–अमिताभची भेट झाली ती ऋषिकेश मुखर्जींच्याच ‘नमक हराम’मध्ये. त्यावेळी अमिताभ हिट स्टार बनला होता. त्यामुळेच अमिताभचा विकी सोमूपेक्षा सरस बनला होता. पण ‘नमक हराम’ही ‘आनंद’एवढाच हिट ठरला होता. राजेशच्या क्रेजमुळे ‘हाथी मेरे साथी’सारखा बी ग्रेड चित्रपटसुद्धा सुपरहिट ठरला होता. खरे तर ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटातील भूमिका राजेंद्रकुमारला ऑफर करण्यात आली होती. पण हाथीवर चित्रपट केंद्रित असल्यामुळे राजेंद्रने ती भूमिका करण्यास नकार दिला. मग ती भूमिका राजेशकडे आली व राजेशने तिचे सोने करून टाकले.
‘अंदाज’ या चित्रपटाचेही असेच झाले. ‘अंदाज’चा नायक होता शम्मी कपूर, पण त्यावेळी ‘राज’ चित्रपटामुळे राजेश जी. पी. सिप्पींशी करारबद्ध होता. त्यामुळे त्याला त्यात पाहुण्या कलाकाराची भूमिका देण्यात आली. राजेशच्या वाट्याला फक्त चार प्रसंग आले होते. पण राजेशने त्यात अशी काही जान ओतली की तोच त्या चित्रपटाचा नायक बनला. खास करून हेमा मालिनीला मोटरसायकवर घेऊन ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहॉं कल क्या हो किसने जाना’ हे गाणे म्हणणारा राजेश त्या काळात सगळ्या युवकांचा आयकॉन बनला होता. आजसुद्धा हे गाणे बघितल्यावर एक प्रकारची उभारी येते. या गाण्यातल्या राजेशच्या त्या ‘स्टाईली’ वाखाणण्यासारख्याच होत्या. ‘दुश्मन’ या चित्रपटातल्या ‘वादा तेरा वादा’ या राजेशने साकार केलेल्या कव्वालीवर त्या काळात चित्रपटगृहात दौलतजाडा होत असे. तीच गोष्ट ‘दुनिया में लोगों को धोका भी होता है’ या ‘अपना देश’मधल्या गाण्याची. राजेशवर चित्रीत केलेल्या या गाण्याच्या वेळी लोक चित्रपटगृह डोक्यावर घेत असत.
राजेश आणि किशोरकुमार यांचे सुरेख टुनिंग जमले होते. अगदी ‘आराधना’च्या ‘मेरे सपनों की रानी’पासून ते ‘हमें तुमसे प्यार कितना, हम नहीं जानते’ या ‘कुदरत’च्या गाण्यापर्यंत राजेशवजा किशोरने अनेक गाणी गायली. पण त्याचबरोबर मुकेशचे व राजेशचेही समीकरण जुळत होते. ‘कटी पतंग’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच किशोरने गायलेली ‘ये जो मोहब्बत है’, ‘ये श्याम मसतानी’ व ‘प्यार दिवाना होता है’ ही तीन गाणी सुपरहिट ठरली होती. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजेश खन्नाने आशा पारेखबरोबर होडीत मुकेशच्या आवाजात म्हटलेले ‘जिस गली में तेरा घर न हो बालमा’ या गाण्याने किशोरच्या या तिन्ही गाण्यांवर मात केली होती.
‘आनंद’मधल्या मुकेशने राजेशकरता म्हटलेल्या ‘मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने’ व ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ या दोन गाण्यांनी तुफान लोकप्रियता संपादन केली होती. तरीही राजेशने नेहमीच किशोरकरता हट्ट धरला. ‘दुष्मन’ या चित्रपटातील ‘वादा तेरा वादा’ हे गाणे रफीला द्यायचे चालले होते, पण राजेशच्या हट्टापोटी शेवटी हे गाणे किशोरला द्यावे लागले. पण राजेश फक्त गाणे साकार करण्यापुरताच मर्यादित राहिला नाही; त्याचा अभिनयही सक्षम असायचा. ‘अमर प्रेम’मध्ये त्याने असेच लाजवाब अभिनयाचे प्रात्यक्षिक घडविले होते. ‘आँसू पोछो पुष्पा, आय हेट हियर’ असे म्हणणारा त्याचा तो बंगाली आनंदबाबू सुरेख जमला होता. कोठेही हिरोगिरी न करता त्याने लवचीक अभिनयाचे दर्शन घडविले होते.
‘आप की कसम’मध्ये पत्नी मुमताजच्या चारित्र्यावर संशय घेणार्या इंजिनिअरच्या भूमिकेतही त्याने कमाल केली होती. खास करून मुमताजने दुसरे लग्न केल्याची बातमी तिचे वडील रेहमान राजेशला देतात तेव्हा राजेशने मुद्राभिनयाची कमाल केली होती. सुरुवातीला ‘रोमॅन्टिक’ व नंतर संशयी व पश्चत्तापदग्ध तरुणाच्या भूमिकेत राजेशने बाजी मारली होती. ‘सफर’, ‘खामोशी’, ‘दुष्मन’, ‘आविष्कार’ हे तर राजेशचे मास्टरपीसच. राजेशने शर्मिला टागोर, हेमा मालिनी, शबाना आजमी अशा अनेक नायिकांबरोबर काम केले असले तरी त्याची खरी जोडी जमली ती मुमतातशीच. ‘दोस्ताने’पासून जमलेली त्यांची जोडी ‘बंधन’, ‘दुष्मन’, ‘आप की कसम’, ‘अपना देश’, ‘सच्चा झुठा’ करत करत ‘रोटी’पर्यंत गाजली. ‘रोटी’त ते ‘गोरे रंग पे ना इतना गुमान कर’ हे राजेश– मुमताजवर चित्रीत केलेले गाणे त्या काळात हिट ठरले होते.
‘रोटी’नंतर राजेशची सद्दीही संपायला आली. तोपर्यंत ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभचा उदय झाला होता. त्यात परत राजेश आपल्याच ‘मॅनरिझम’चा गुलाम बनायला लागला होता. नंतर ‘अमरदीप’, ‘थोडी सी बेवफाई’सारखे त्याचे चित्रपट थोडेफार चालले असले तरी राजेशला त्याची ती पूर्वीची लोकप्रियता मिळू शकली नाही.
१९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘अवतार’ व ‘सौतन’ या दोन चित्रपटांनी त्या काळात भरपूर धंदा केला होता. खास करून ‘अवतार’मधला राजेश उठून दिसत होता. दगाबाज मुलाविरुद्ध ताठपणे उभा असलेला त्याचा तो करारी पिता लोकांना जाम आवडला होता. राजकुमार– जितेंद्रबरोबर असलेला त्याचा ‘धरम कांटा’ही चांगलाच गाजला होता. पण तरीही त्याला ते आपले सोनेरी दिवस परत आणणे जमलेच नाही.
त्यावेळी राजेश बोले व जनता डोले अशी परिस्थिती होती. ‘अनुराग’ या चित्रपटाच्या वेळचा प्रसंग आठवतो. या चित्रपटात राजेश खन्ना पाहुणा कलाकार होता. पण तरीही जाहिरातीत राजेशचाच मोठा फोटो होता. आणि लोकही बघायला येत होते ते राजेशलाच. म्हणूनच राजेशने साकार केलेले ‘राम करे बबुआ’ हे गाणे सुरू झाले की लोक चित्रपटगृह डोक्यावर घेत असत. राजेशने साकार केलेली गाणी हा एक वेगळाच विषय ठरावा. प्रसंगी गाणी साकार केली तर ती राजेशनेच असे त्या काळात म्हटले जायचे. साधारण शम्मी कपूर व देव आनंदनंतर राजेशनेच गाण्यांना व खास करून प्रणयी गाण्यांना उठाव दिला. ‘अच्छा तो हम चलते है’ (आन मिलो सजना) या गाण्याने त्या काळात जो विक्रम केला होता त्याचे श्रेय जेवढे त्या गाण्याच्या चालीला जाते तेवढेच ते साकार करणार्या राजेशलाही जाते. हे गाणे चालू असताना युवक–युवतींकडून चित्कार बाहेर पडत असत. तीच गोष्ट ये ‘ये जो मोहब्बत है’ या ‘कटी पतंग’मधल्या गाण्याची. या गाण्याला त्यावेळी चित्रपटगृहात वन्स मोअर मिळत असे. ‘मर्यादा’ या चित्रपटातील ‘ग ग गुस्सा’ या मालासिन्हाला उद्देशून म्हटलेल्या राजेशच्या गाण्यालाही जबरदस्त दाद मिळत असे. एवढेच कशाला ‘मेरी प्यारी बहेनियॉं बनेगी दुल्हनियॉं’ या त्याने साकार केलेल्या गाण्यालाही टाळ्या व शिट्यांचा वर्षाव होत असे.
तसे पाहायला गेल्यास राजेशकडे नायकाला योग्य अशी शरीरसंपदा नव्हती. पण तरीही चेहर्यावरच्या भावामुळे व लवचीक आवाजामुळे तो बाजी मारून जायचा. ‘प्रेमनगर’ या चित्रपटात याचा प्रत्यय येतो. त्यातला तो दारूच्या आहारी गेलेला इनामदार राजेशने केवळ आवाजाच्या जोरावर खुलवला आहे. याबाबत राजेश शक्ती सामंतचे ऋण मानायचा. शक्तीदांनी आपल्याला जसे शिकवले तसे आपण केले असे त्याने एकदा मुलाखतीत सांगितले होते.
राजेशला भेटायचा योग आला तो २००५ साली. या वर्षीच्या ‘इफ्फी’मध्ये राजेशचे आगमन झाले होते. आम्ही काही गोमंतकीय चित्रपट निर्माते त्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा ते हॉटेल सिदादेमध्ये माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्याशी गप्पा मारत बसले होते. त्यांच्यातला तो पूर्वीचा ग्लॅमरस राजेश खन्ना कोठेतरी लुप्त झाल्यासारखा वाटत होता. बोलण्यातसुद्धा तो पूर्वीचा स्टायलिशपणा नव्हता. हा राजेश आमच्या आठवणीतल्या राजेश खन्नाशी फारकत घेणारा होता. पण तरीही आजसुद्धा त्याचे ‘इत्तफाक’, ‘मेरे जीवनसाथी’, ‘कुदरत’सारखे चित्रपट पाहिले की मनावर मोरपीस फिरविल्यासारखे वाटते. ‘इत्तफाक’मधला त्याचा तो रहस्यमय तरुण आजही रोमांचित करतो. ‘मेरे जीवन साथी’मधला त्याचा तो ‘चला जाता हूँ किसी की धून में’ हे गाणे म्हणणारा स्टायलिश पॉप सिंगर मन प्रफुल्लित करून जातो. ‘कुदरत’मधले ते ऑल टाइम हिट गाणे ‘मुझे तुमसे प्यार इतना’ म्हणणारा राजेशही मनावर लहरें उठवून जातो. राजेशची त्या काळातील लोकप्रियता फ्लुक नव्हती हे आजसुद्धा पटते. आजच्या काळातसुद्धा त्याच्या त्या स्टायली अजरामर वाटतात. म्हणूनच त्याच्या एन्ट्रीवर त्या काळात टाळ्या पडायच्या हे पटते. ‘यहॉं वहॉं सारे जहॉं में तेरा राज है’ हे त्याचे ‘आन मिलो सजना’तील गाणे पाहिल्यावर तो किती थोर कलाकार होता याची प्रचिती येते. प्रणयाबरोबरच राजेशने जीवनाचे ज्ञानही अधोरेखित केले. ‘जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए’सारखे त्याने म्हटलेले संवाद लोकांना स्फूर्ती देऊन गेले यात शंकाच नाही. ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम, ओ फिर नहीं आते’ या त्याच्यावर साकार केलेल्या गाण्याचा अर्थ त्यालाही पटला व लोकांनाही. घरातील भांडणे कशी फिरविता येतात याबाबत त्याने ‘बावर्ची’मध्ये दिलेले ज्ञान आजही दीपस्तंभासारखे वाटते.
आपल्याला ऋषिकेश मुखर्जी, आसित सेन, शक्ती सामंत, यश चोप्रा, विजय आनंदसारखे चांगले दिग्दर्शक मिळू शकले म्हणून आपली कारकीर्द घडू शकली असे त्याने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते. पण तरीही राजेशमध्ये वैविध्यता होती. लोकांना आकर्षित करण्याची कला होती यात शंका नाही. म्हणूनच त्या काळात त्याला युवती स्वतःच्या रक्ताने पत्रे लिहीत असत. या महान सुपरस्टारला श्रद्धांजली वाहताना त्याच्याच ‘सफर’मधले ते गाणे याद यायला लागते– ‘रोते रोते जमानेमें आये, मगर हँसत हँसते जमाने से जायेंगे हम…. जिंदगी का सफर, ये कैसा सफर, कोई जाना नहीं कोई समझा नाहीं….’