22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

सोवळे-ओवळे

  • मीना समुद्र

पराकोटीचं कडक सोवळं जेव्हा समाजात पाळलं जातं तेव्हा मात्र समाजाचं आरोग्य सुधारत नाही तर ते अधिकाधिक बिघडत जातं हे आजपर्यंतच्या मानवइतिहासातून आपल्याला चांगलेच माहीत झाले आहे. जाती, धर्म, पंथ आणि स्पृश्य-अस्पृश्य यातला भेदाभेद हा अमंगळच आहे.

‘‘पूजेचा सगळा स्वयंपाक आज तू करायचा… सोवळ्याने’’- सासूबाईंनी तिला आज्ञावजा सूचना केली तशी ती थोडी धास्तावली. पूर्ण स्वयंपाक एकटीनं करण्याबद्दल तिची काहीच तक्रार नव्हती; पण ‘सोवळ्याने’ या शब्दाने ती थोडी नाराज झाली. पण नाईलाज होता! उगीचच स्वतःची नाचक्की ओढवून घ्यायची तिची तयारी नव्हती. त्यामुळे तिने रेशमी साडी काढली होती, आणि कपडे धुऊन वेगळे वाळत घालून तयार ठेवले होते. सकाळपासून ती भरभर तयार होऊन कामं उरकू लागली. निम्मीशिम्मी तयारी झाली, तोपर्यंत बाळ उठलं. आज सासूबाईच सांभाळतील म्हणून तिनं वाट पाहिली, पण त्या आंघोळीला गेल्या असाव्यात म्हणून तिने बाळाला उचलून घेतले आणि त्याला उगी करू लागली. तेवढ्यात त्या आल्याच आणि ‘अंथरुणाला, गादीला शिवलीस, मी घेतच होते ना त्याला. आजकालच्या तुम्हा मुलींना कसलं भानच नसतं. आता ये, पुन्हा आंघोळ कर’ म्हणून त्यांनी फर्मान सोडलं तेव्हा ते तिला जाचक वाटलं.

तिच्या माहेरी आजीचं सोवळं-ओवळं असायचं. पण तिची आई कामाला जाणारी. तिनं लेकीला समजावलं होतं की हे सगळं स्वच्छता पाळण्यासाठी, शुद्धता राखण्यासाठी आहे. त्यामुळे धूतवस्त्राने पूजा, स्वयंपाक केला तरी हरकत नसते. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असे. वेगवेगळ्या स्वभावाचे, सवयीचे, कामाचे लोक एकत्र राहत. आळशीपणाने अस्वच्छता, पारोसेपणाची शक्यता जास्त. तेव्हा अन्न परब्रह्माची शुद्धता, स्वच्छता राखणं अगदी जरूर असावं. कुणीही येऊन आपला आवडता पदार्थ बचकभर घेऊन खाल्ला, बाहेरून येऊन हातपाय न धुता पदार्थांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली तर शिस्त आणि आरोग्य जपले जाणार नाही म्हणून सोवळ्याची ही पद्धत असावी. शिवाय देवाला आपण जे देतो ते सारेच अतिशय चांगलेच देतो. पानफूल ताजे टवटवीत वाहताना जो प्रसन्नपणा असतो तोच नैवेद्य दाखवतानाही. शरीर अंतर्बाह्य जेवढे स्वच्छ तेवढे ते निरोगी आणि प्रसन्न असते. अशा मनःस्थितीत अगदी मन लावून एकाग्रपणे निगुतीने केलेला स्वयंपाक, पूजा हे वैयक्तिक आणि कौटुंबिकदृष्ट्या दोन्हींना सुखदायक! सोवळ्याच्या अलगतेमुळे आजूबाजूचा गोंधळ, गडबड विसरून थोडा एकांत लाभत असावा. म्हणून फक्त स्त्रियांनी हे शास्त्र निर्माण केले म्हणावे तर तसेही नाही. पुरुषही पूजेला ‘सोवळे’ (रेशमी वस्त्र) नेसतात. पूजेनंतर ते खुंटीला चुंबळ करून टांगून ठेवण्यात येत असे. हे कधीतरीच धुतलं जाणारं वस्त्र ‘सोवळं’ म्हणून कसं काय चालतं हाही एक प्रश्‍नच!

कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या बालपणीच्या आठवणी वाचताना सोवळ्या-ओवळ्याचा एक उल्लेख आढळला. त्यांची आजी आंघोळ करून सोवळ्याने देवपूजा आणि स्वयंपाक करीत असे. अशावेळी कोणी शिवले तर ती संतापून पुन्हा आंघोळ करून कामाला लागे. नैवेद्याला कुणाला हात लावू द्यायची नाही. पण लहानग्या मंगेशने लाडाने किंवा व्रात्यपणाने शिवले तर मात्र तिला चालायचे. मग गोड हसून आपल्या या लाडक्या नातवाचे ती लाड करीत असे. यावरून माणसाविषयी वाटणारे प्रेम हेच सर्वश्रेष्ठ आहे, असा संस्कार त्यांच्या मनावर झाला.

एका घरगुती सत्यनारायणप्रसंगी पूजा-स्वयंपाक सोवळ्याने होत असताना एका बाजूने रांगत जाऊन तिथले फळ उचलून तोंडाशी लावलं तेव्हा त्याच्या बहिणीनं त्याला खसकन् बाजूला केलं. तेव्हा त्या घरातली गृहिणी म्हणाली, ‘‘असू दे, लहान मुलानं घेतलं तर चालतं. लहान मूल देवाचं रूपच असतं. देवाला भूक लागलेली दिसतेय.’’ सोवळ्यात उपासतापास करतात. अभक्ष्यभक्षण चालत नाही. चामड्याच्या वस्तू चालत नाहीत. पूर्वी मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना वेगळं ठेवून सोवळं पाळलं जाई ते त्या लेकीबाळीचं, स्त्रीचं आरोग्य राखण्यासाठी, आराम मिळण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीही. खूप पूर्वी विधवा स्त्रीचं केशवपन करून तिला पांढर्‍या किंवा लाल वस्त्रात लपेटून ‘सोवळी’ केली जाई. अशा स्त्रीनं कांदा-लसणीसारखे तामसी पदार्थ खाऊ नयेत, इतरत्र जाऊ नये, असे जाचक निर्बंध तिच्यावर असत. पण ही दोन्ही ‘सोवळी’ ‘सोवळे-ओवळे’ या शब्दाच्या रूढार्थापेक्षा खूप वेगळी. पहिल्या प्रकारचे अलगपण स्नानाने सुटत असे. पण तोपर्यं तीन दिवस ती स्त्री अस्पर्श असे. इकडे हात लावू नको, तिकडे शिवू नको अशा सूचना तिलाही मिळत आणि घरच्या छोटे कंपनीला ‘तिला कावळा शिवलाय, तिच्याजवळ जायचं नाही’ असं बजावलं जात असे.

एरव्ही घरात पाळलं जाणारं सोवळं पूजा, नैवेद्य, ब्राह्मण-सवाष्ण भोजनानंतर संपत असे. घरातल्यांना थोडी शिस्त, थोडा संयम, स्वच्छतेचे यमनियम आणि येणार्‍या अतिथीला सन्मान आणि विशेष वागणूक देणे इथपर्यंत सारे ठीक. वैयक्तिक स्वच्छता, शुचिता, पावित्र्य जपणे हेही ठीक. ‘ऐसे कैसे हे सोवळे जे शिवताच होय ओवळे’ असं म्हणण्याइतकं ते तकलादू वाटू नये. पराकोटीचं कडक सोवळं जेव्हा समाजात पाळलं जातं तेव्हा मात्र समाजाचं आरोग्य सुधारत नाही तर ते अधिकाधिक बिघडत जातं हे आजपर्यंतच्या मानवइतिहासातून आपल्याला चांगलेच माहीत झाले आहे. जाती, धर्म, पंथ आणि स्पृश्य-अस्पृश्य यातला भेदाभेद हा अमंगळच आहे. श्रीमंतांचे सोवळे म्हणजे गरिबांना विशिष्ट अंतरावर ठेवणे, त्यांच्या कष्टाने स्वतः उपभोग घेणे आणि त्यांना हीन लेखून अधिकाधिक गर्तेत लोटणे. श्रेष्ठ-कनिष्ठतेचा भेद हाही एक भ्रम आहे, भ्रांती आहे. सोवळे पाळणे म्हणजे ही अलगतेची भावना जोपासणे. तेथे जेव्हा गुर्मी आणि उद्दामपणा येतो तेव्हा ही अलगता समाजासाठी शाप ठरते. कलह, वाद, भांडणे आणि सर्वनाशाला ही अशी वागणूक कारणीभूत ठरते. स्वत्व आणि आत्मभानाची जाणीव निर्माण करताना समानत्वाची, सहकाराची, सहयोगाचीच जाणीव जोपासावी लागते; तुटकपणा आणि तुच्छपणाची नव्हे!

शेख महंमदांचा एक अभंग आहे- ‘ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे-ओवळे; विठ्ठलाच्या पायी सारेच एक.’ विठ्ठलावर सर्वांचे प्रेम-भक्ती सारखीच; मग जातीपाती, वर्णभेद तिथे कशाला? मंदिर प्रवेश, पिण्याचे पाण्याचे सोवळे-ओवळे कशासाठी पाळायचे? उच्चवर्णीयांचा बडगा कशासाठी सहन करायचा? सर्व मानव म्हणजे देवाचीच लेकरे. चांदणे, पाऊस, नदी-समुद्राचे पाणी, पक्ष्यांचे गान, सृष्टीचे सारेच लाघव सर्वांसाठीच. पण तिथे जेव्हा स्पृश्यास्पृश्यता पाळली गेली तेव्हा तिथे संघर्ष झाला. साधुसंतांनी, महात्म्यांनी हे अमंगल विचार दूर करून समाजात खूप मोठे परिवर्तन घडवून आणले. एकनाथांनी ‘सर्वाभूती परमेश्‍वर’ जाणून तहानलेल्या गाढवाच्या मुखात गंगेचे पाणी ओतले आणि अस्पृश्यांना भोजन दिले. अस्पृश्यांचा स्पर्श तर सोडाच; त्यांची सावली अंगावर पडली तरी पाणी टाकून पाऊल टाकण्याचा प्रकार ज्ञानेश्‍वरांच्या काळी होता. ‘नरेचि केला हीन किती नर’ अशा स्वरूपातले समाजातले सोवळे नष्ट करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मभर केला.

कोरोनाच्या काळात मात्र अलगता, विलगता, समजुतीने राखलेले अंतर हे सर्वस्वी आरोग्यदायक ठरले, कल्याणकारक ठरले.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION