सुनावणीस गैरहजर राहिल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या वॉरंटला अनुसरून काल सहारा सम्राट सुब्रतो रॉय उत्तर प्रदेश पोलिसांना शरण आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केले. त्यांना ४ मार्चपर्यंत उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात ठेऊन ४ मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणीस हजर करावे असे आदेश स्थानिक कोर्टाने दिले.
गुंतवणूकदारांना २० हजार कोटी रुपये परतावा केला नसल्याच्या प्रकरणात सुनावणीस गैरहजर राहिल्याने सुप्रीम कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. परवा पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता, मात्र ते सापडू शकले नव्हते.
दोन दिवस अटक चुकवल्यानंतर ६५ वर्षीय रॉय काल सकाळी आपल्या लखनऊ येथील सहारा सहार या प्रासादात पोलिसांना शरण आले. त्यांना तेथून संध्याकाळी ५ वा. कडक सुरक्षा व्यवस्थेत पुढच्या दारावर असलेल्या माध्यमांना चुकवून मागच्या गेटने दंडाधिकार्यांकडे नेण्यात आले.
माफी मागून वॉरंट मागे घेण्याची रॉय यांची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.