सुधीर ः एक झुंजार व्यक्तिमत्त्व

0
13
  • – शरत्चंद्र देशप्रभू

कै. सुधीर देशप्रभू हा असाच एक फिनिक्स, ज्याने शून्यातून आपले ब्रह्मांड निर्माण केले. इतके झाले तरी सुधीरच्या स्वभावात धूर्तपणाचा लवलेश नव्हता. कदाचित हीच त्याची ताकद किंवा उणीव असू शकेल.

सुधीर देशप्रभूविषयी लिहिताना मनात कालवाकालव होते. बालपणीचा सुधीर म्हणजे अस्वस्थ आत्मा. नाही म्हटले तरी खेळात त्याला रस होता; परंतु दृष्टिकोन स्पर्धात्मक. अन्यायाविरुद्ध अकांडतांडव करायचा. कोरगावची मॅच हरल्यावर आमची चेष्टा करायचा. आम्ही करत असलेल्या सार्‍या खटाटोपात त्याचा सहभाग असायचा. परंतु बालपणी त्याच्यातले वेगळेपण जाणवत असे. जयंत कलाकाराचे गुण घेऊनच जन्मलेला. याने सुधीरच्या डोळ्यातील तेज जोखले होते अन् प्रभावीपणे रेखाचित्राद्वारे मांडल्याचे स्मरते. त्याच्यात हुडपणा होता, निरागसपणा होता, चेहर्‍यावर बाल्याची झाक होती. परंतु या सार्‍या माहोलात आपले खास असे वैशिष्ट्य त्याच्या स्वभावात जाणवत असे. जबर महत्त्वाकांक्षेची मनोभूमिका कदाचित बालपणातच त्याच्या मनात रूजली असावी. त्यामुळेच बेदरकार अन् संवेदनशील वृत्ती, धाडसीपणा अन् निर्णयक्षमता, परंपरेचा अभिमान अन् नावीन्याचा सोस अशा परस्पर विरोधी प्रवृत्तीचा विलक्षण संयोग, अनोखा मिलाफ सुधीरच्या वाढत्या वयात दिसून येत होता.
आमचे वास्तव्य पेडण्यात उत्सवानिमित्त आणि उन्हाळी सुट्टीपुरते मर्यादित. यामुळे पेडण्यातील नातेवाईकांशी फारसा संपर्क नसे. त्यात सुधीर आमचा कनिष्ठ बंधू मोहनच्या वयाचा. दोघांची दोस्ती दाट, तसेच खेळलेल्या कुस्त्या पण भयानक. चार-चार तास चाललेल्या कुस्त्यांत कै. बालाजीमामांना हस्तक्षेप करावा लागत असे. एरव्ही बालाजीमामा हे शांत स्वभावाचे. मुलांच्या मन कासावीस करणार्‍या कुस्त्या पाहूून ते भडकून उठत. शिक्षणासाठी पुण्याला मावशीकडे रवाना झाल्यावर सुधीरशी संपर्क आणखीनच कमी झाला. पानशेतनंतरच्या पुण्याचे वर्णन ऐकावे ते सुधीरकडूनच. तसेच पुणेकरांच्या वर्तणुकीतल्या गमतीजमती. परंतु सुट्टी संपून पुण्याला जायची वेळ आली की सुधीर सारे घर डोक्यावर घेत असे. पेडण्याबद्दलची आंतरिक ओढ त्याला पुण्याला जाण्यापासून परावृत्त करत असे. जाण्याचे वेध लागले की चिडचिड सुरू व्हायची. शालान्त परीक्षा झाल्यावर एकदाचे हे दिव्य संपले. सुधीरने उच्च शिक्षणासाठी सेंट झेवियरमध्ये प्रवेश घेतला. परंतु मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या सुधीरला इंग्रजी लेक्चर्स समजणे अवघड गेले असावे. पेडण्यात त्याकाळी आपल्या अडचणी कुणाशी मांडण्याची रीतच नव्हती. जो तो आपलेच श्रेष्ठत्व मिरवणार. कदाचित सुधीरच्या बंडखोर स्वभावाला कॉलेजचे वातावरण मानवले नसेल. परंतु आजोबांच्या म्हणजे कै. भालचंद्र शेणवी देसाईंच्या ओळखीने सुधीरची ‘नवप्रभा’त वर्णी लागली. सुधीरला तसा साहित्यात रस होता असे ठामपणे सांगणे कठीण; परंतु बोलण्यात वारंवार ना. सी. फडके यांच्या सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरच्या तीन कादंबर्‍यांचा उल्लेख असे. शिवाय कै. लक्ष्मणराव सरदेसाई यांच्या ‘मोहोर’ या लघुकथेबद्दल तो भरभरून बोलत असे.

‘नवप्रभा’त रूजू झाल्यावर सुधीरचा मुक्काम रात्री झोपण्यासाठी आमच्या पणजीतील बिर्‍हाडी असे. हे बिर्‍हाड आम्हाला तसेच पेडण्यातील नातेवाईकांना फार उपयोगी पडले. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या जागेत कितीतरी पेडणेकर रात्रीचा मुक्काम ठोकत. गदग, बेळगावला जायची बस किंवा मुंबईला जायची आगबोट पकडण्यासाठी रात्रीचा मुक्काम आमच्याकडे ठरलेला. तसेच पणजीत नोकरी असलेल्यांसाठी पण या बिर्‍हाडाचा आधार व्हायचा. सुधीर पण नोकरीच्या प्रारंभीच्या काळात याच बिर्‍हाडी होता. सतरंजी म्हणजे याचे अंथरुण. पांघरुण कधी घेतच नसे. पावसाळा असू दे किंवा हिवाळा. पोटावर झोपायची याची सवय. उशीची याला गरजच भासत नसे. फावल्या वेळात मांडी ठोकून काहीतरी लिहीत बसे, नाहीतर निरंतर गप्पा. एकतर्फी दुसर्‍यांना बोलायची संधीच मिळत नसे. नवनव्या कल्पना, बेत, आडाखे यांची पुनरावृत्ती त्याच्या कथनात असे. काही असो, ‘नवप्रभा’तली नोकरी त्याने एकनिष्ठतेने केली. वादळे निर्माण झाली, परंतु हिकमतीने सामना केला. रात्रपाळीच्या वेळी बस चुकली तर पायलटला घेऊन ‘नवप्रभा’च्या कार्यालयात नियोजित वेळेवर यायचे बंधन प्रामाणिकपणे पाळले. प्रुफरिडर, उपसंपादक, मुख्य उपसंपादक अशी पदे सातत्यपूर्ण काम करून पटकावली. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध राखले. पेडण्यात त्याचे समांतरपणे व्यापाराचे प्रयोग चालूच होते. दुकान अन् नंतर घाऊक व्यापारात मुशाफिरी हे ‘नवप्रभा’तली नोकरी सांभाळून करणे म्हणजे तारेवरची कसरत. परंतु सुधीरला हे सहज झेपत असे. अपार शारीरिक श्रम करण्याचे बळ अन् प्रबळ इच्छाशक्ती. परंतु ‘नवप्रभा’ हे त्याने उदरनिर्वाहाचे साधनच म्हणून निवडले असावे. यात करिअर करायची कधी वृत्ती किंवा कल सुधीरच्या वागण्यात दिसून आला नाही.

‘नवप्रभा’ला लिहिण्याचे प्रसंग पण क्वचितच. मनात वेगळ्याच योजना होत्या. किंबहुना पत्रकारितेतील वलयाचे त्याला कधी आकर्षण वाटलेच नाही. त्याची नजर लागून राहिली होती धंद्यातील उत्कर्षावर, आणि ती सुवर्णसंधी त्याला मिळाली. किंबहुना आपल्या हिकमतीवर त्याने ती खेचून आणली. तोर्से येथे त्याला ‘कोको’ योजनेंतर्गत पेट्रोल पंपाची एजन्सी मिळाली. कर्तव्यपूर्ती अन् आकांक्षा साफल्याचे समाधान सुधीरच्या चेहर्‍यावर उमटले. सुधीरने मग मागे वळून पाहिले नाही. गॅस एजन्सी, ट्रक वाहतूक, व्यापार सारे आपल्या कवेत घेतले. जीवन सार्थकी लागल्याची जाणीव व समाधान त्याच्या देहबोलीतून जाणवू लागले. मूळच्याच बेदरकार स्वभावाला एक नवी मिती लाभली. घोड्यावरची मांड पक्की झाली. रिकिबीत पाय घट्ट रोवले गेले. अश्‍वमेधाचा वारू चौफेर उधळला. या सार्‍या खटाटोपात बाजारात सर्वसामान्यांशी मिसळणे चालूच होते. निर्हेतूक वागण्यातून राजकीय आकांक्षा पल्लवित झाली. व्यक्तिमत्त्व विकासातील अपरिहार्य टप्पा. नगरपालिका निवडणुकीचे नगारे वाजायला सुरुवात झाली होती. प्रभागाची पुनर्रचना व्हायची होती. सुधीरने आक्रमकरीत्या ज्योकिम आलेमांव या त्या वेळच्या नगरविकासमंत्र्याकडून आपली नजर असलेल्या प्रभागाची पुनर्रचना सुयोग्यपणे करून घेतली. कूळ-मुंडकारांविरुद्ध खटले चालू असताना प्रचार मोहीम हिरिरीने राबवली. हाच उत्साह, प्रसंगावधान अन् आक्रमकता सुधीरने कै. जितेंद्र देशप्रभू यांना तिकीट देण्याच्या कामात अवलंबिली होती. श्री. प्रतापसिंह राणे अन् श्री. लुईझिन फालेरो यांना कैचीत पकडून अक्षरशः जितेंद्रसाठी उमेदवारी कॉंग्रेस पक्षाकडून खेचून आणली होती. आता हीच करामत नगरपालिका निवडणुकीत वापरली. हांजी न करता निवडणूक एकहाती जिंकली. सुधीरचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो यशाच्या पायर्‍या चढत गेला; परंतु पायर्‍यांत अडकला नाही. अशावेळी जीवनाच्या एका वळणावर आयुष्यातील फासे उलटे पडू लागले. पेट्रोल पंपची एजन्सी हातातून निसटली. कै. जितेंद्राशी अकल्पितरीत्या वितुष्ट आले. कौटुंबिक बुरूज एकामोगामाग ढासळू लागले. परंतु सुधीरला निराशा कधी स्पर्श करू शकली नाही. नाही म्हटले तरी जितेंद्रसोबत आलेल्या वितुष्टामुळे आत कुठेतरी वेदना, बेचैनी जाणवत होती. परंतु सर्वसामान्य माणसाला त्याच्या बेफाम वागणुकीमुळे हे कळलेच नाही. त्याचा आत-बाहेर असा व्यवहारी स्वभाव नव्हता. परंतु जितेंद्रविरुद्ध घेतलेल्या भूमिकेत, आवेशात जायबंदी झालेल्या श्‍वापदाची, प्रतिरोधाची भावना जाणवत असे. तसेच काहीतरी हरवल्याचे अव्यक्त दुःख. अशाच परिस्थितीत सुधीरने आर्थिक, मानसिक व शारीरिक आघातांचे वज्र बनविले अन् जीवनातल्या अंतिम यशाच्या शिखरावर पोहोचण्याची धडपड सिद्धीस नेण्याच्या मार्गास लागला. आता ध्येय होते नगराध्यक्षाची खुर्ची पटकावण्याचे. ज्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहिला ते योजने दूर गेले होते. परंतु इर्षा अन् आत्मविश्‍वासाच्या बळावर मोट बांधत सुधीर नगराध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान झाला. छोट्या अवधीसाठी का होईना परंतु त्याच्या दृष्टीने तो अटकेवर झेंडाच होता.

आता सुधीरचे शरीर थकले होते. विविध व्याधींनी ग्रस्त झाले होते. परंतु मनाची उभारी कायम होती. डोळ्यासमोर होते ध्येय- वडिलोपार्जित जमीनजुमला मुंडकारांच्या-कुळांच्या विळख्यातून बचावण्याचा. कुठल्याही जमीनदाराप्रमाणे कुळकायद्यातील राक्षसी तरतुदी मनाला क्लेष देत होत्या. मुंडकार-कुळांना पण जमीनदाराची जमीन कायद्याच्या चौकटीत हडपणे मनाला पटत नव्हते. सुधीरने सुवर्णमध्य साधून प्रलंबित खटल्यावरील समझोत्याचा मार्ग निवडला. याबाबतीत सुधीरचा दृष्टिकोन संत तुकारामासारखा. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी.’ हटवादी कुळांशी कायदेशीररीत्या संघर्ष केला. पैशाची, परिणामांची पर्वा केली नाही. या सार्‍या खटाटोपात आरोग्याची हेळसांड झाली. आरोग्य टिकवण्याचे उपदेश पालथ्या घड्यावरचे पाणी ठरले. अन् एका दुर्दैवी दिनी या झुंजार परंतु सरळसोट व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला. आमच्या घराण्यात काळाच्या ओघात दोन्ही प्रकारचे पुरुष निर्माण झाले. काहींनी घराची कीर्ती शिखरावर पोहोचवली, तर काहींनी धूळधाण केली. परंतु या धुळीतूनच फिनिक्स पक्षी निर्माण झाले अन् अवकाशात झेप घेतली. कै. सुधीर देशप्रभू हा असाच एक फिनिक्स, ज्याने शून्यातून आपले ब्रह्मांड निर्माण केले. इतके झाले तरी सुधीरच्या स्वभावात धूर्तपणाचा लवलेश नव्हता. कदाचित हीच त्याची ताकद किंवा उणीव असू शकेल.