– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
प्राचीन काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मपरंपरेत गणपतीला अनन्यसाधारण आणि वंदनीय असे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. कारण कोणत्याही धार्मिक विधीला किंवा मंगलकार्याला सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा होते. गणेशपूजेशिवाय कुठलेही धार्मिक आणि मंगलकार्य सुरूच होऊ शकत नाही. गणेशपूजनानंतरच इतर देव-देवतांची पूजाअर्चा केली जाते. श्रीगणेश हा सर्व विघ्नांचे हरण करणारा विघ्नहर्ता असल्यानेच हाती घेतलेल्या धार्मिक किंवा मंगलकार्यात कोणतेही विघ्न येऊ नये, ते सुरळीतपणे चालावे, आपल्यावर कोणतेही संकट न येता आपल्याला सुख मिळावे, आपल्या सार्या इच्छा फलद्रूप व्हाव्यात हाच त्यामागचा हेतू असतो. एवढंच कशाला, आपण मुळाक्षरं शिकतो तेव्हा ‘श्रीगणेशाय नमः’ असेच शिकत सुरुवात करतो. विद्येची, बुद्धीची देवता असलेल्या श्रीगणेशाला नमन करूनच आपण ज्ञानप्राप्तीला सुरुवात करतो. ज्ञानप्राप्तीमुळे आपण सुसंस्कृत होतो, आपणास धन-दौलत प्राप्त होते, कौटुंबिक आणि सामाजिक सुख लाभते.
जगाच्या पाठीवर विविध देशांत विविध धर्मीय, विविध रूपांत श्रीगणेशाला पाहतात आणि त्याचे पूजन करतात. आपल्या भारत देशातही विविध राज्यांत गणेशपूजन होते. परंतु खर्या अर्थाने गणेशोत्सव हा गोवा आणि महाराष्ट्र राज्यांत मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि भव्य प्रमाणात साजरा केला जातो. एवढेच कशाला, दर महिन्यात येणारी कृष्ण पक्षातील ‘संकष्ट चतुर्थी’ किंवा शुक्ल पक्षात येणारी ‘विनायकी चतुर्थी’ ही व्रते गोवा आणि महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने बहुतेक हिंदू लोक करतात. वर्षातून दर मंगळवारी येणार्या ‘संकष्ट चतुर्थी’ आणि ‘विनायकी चतुर्थी’ ही व्रते तर बहुतेक हिंदू लोक पाळतात. दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ‘गणेशचतुर्थी’च्या निमित्ताने श्री गणेशमूर्ती फटाक्यांच्या गजरात घरी आणली जाते आणि मग खर्या अर्थाने आपल्या गोव्यात ‘चवथ’ आणि महाराष्ट्रात, त्यातही मुख्यतः कोकणात ‘श्री गणेशचतुर्थी’ अमाप उत्साहाने दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, अकरा दिवस किंवा एकवीस दिवस साजरी केली जाते. यांत बहुतेक कुटुंबांत दीड दिवस, एखाद्या वाड्यावर पाच दिवस, काही वाड्यांवर दर तीन वर्षांत (तिसालांत) पाच दिवस, काही जणांकडे सात, नऊ, अकरा किंवा एकवीस दिवस गणपती असतो. खास करून नवस (आंगवण) केलेले गणपती काही कुटुंबांत सात, नऊ, अकरा किंवा एकवीस दिवस पुजले जातात. त्यानंतर गणेशमूर्तीचे यथोचित असे विसर्जन केले जाते.
गोव्यातील गणेशचतुर्थीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी श्री गणेशमूर्तीचे पूजन केले जाते ती जागा सुशोभित असे मखर लावून सजवली जाते. मखराचा आकार, रंगरंगोटी विविध प्रकारची असते. गोव्यावर आणि कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहे. या प्रदेशात विविध प्रकारची फळं, फुलं, वनस्पती आहेत. श्री गणेशाला निसर्गदेवता मानली जाते. त्यामुळे श्री गणेशमूर्तीची ज्या ठिकाणी स्थापना केलेली असते त्या ठिकाणी मूर्तीच्या डोक्यावर छताच्या बाजूने विविध प्रकारच्या फळा-फुलांनी सजवलेली चौकोनी आकाराची माटोळी बांधली जाते. श्रावण आणि भाद्रपद महिन्यांत उगवणारी शेकडो फुले आणि बहरणारी फळे माटोळीला बांधली जातात. नारळाची पेंड, सुपारीचे शिपटे, मयंडोळी केळ्यांचा घड, आंब्याच्या पानांची डहाळी, काकडी, चिबूड, तोरींगण, पेरू, सफरचंद, कांगोणी, नागुलकुडा, हर्णे, कांगलां, फागलां आदी फळे-फुले केवणीच्या दोराने बांधली जातात. माटोळीची पूजाही केली जाते. आणि म्हणूनच गणेशचतुर्थीकडे पाहताना ती निसर्गदेवतेची पूजा म्हणूनही याकडे पाहिले गेले पाहिजे. आज सर्वत्र विकासाच्या नावाने पर्यावरणाचा र्हास होत असताना पूर्वापार चालत आलेली निसर्गदेवतेची पूजा आपल्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरावी.
कौटुंबिक गणेशोत्सव हा सर्वच हिंदू धर्मीयांत साजरा केला जातो. यात उच्च-नीच, लहान-मोठा, सधन-निर्धन असा कोणताही भेदभाव नाही. श्रीगणेश हे दैवत शेतकर्यांचे, कष्टकर्यांचे, श्रमिकांचे, सधनांचे म्हणजेच कोणाही गणेशसाधकाचे आहे. म्हणूनच कदाचित कृषिदेवता असलेल्या गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या दुसर्या दिवशी पंचमीला आपण अन्नदात्या शेताची पूजा करून नव्याने उगवलेली भाताची कणसे ‘नवं’ म्हणून घरी आणत असू. फळा-फुलांनी सजवलेली माटोळी बांधत असू. पण एक गोष्ट खरी की गणपतीचे नाते हे या मातीशी जुळलेले आहे. शेतजमिनीशी निगडीत आहे. कारण गणपतीची मूर्ती ही शेतांतून काढलेल्या चिकणमातीपासून बनवण्याची प्रथा गेल्या अनेक शतकांपासून चालत आली आहे. त्यानंतरही नदीत, विहिरीत किंवा तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यावर तीच माती काढून पुन्हा गणेशमूर्ती बनवली जाते. पर्यावरणीयदृष्ट्या हे योग्यच असल्याने आजच्या आधुनिक जमान्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण पाहता आपण सर्वांनीच निसर्गदेवता, गणेशमूर्ती निवडताना अधिक सतर्क राहिले पाहिजे.
गोव्यातील गणेशचतुर्थीचे आणखी एक वैशिष्ट्य याठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते. आज विभक्त कुुटुंबपद्धतीत नोकरी-व्यवसायानिमित्त आपल्या मूळ घरापासून दूर वास्तव्यास जातात. अनेकदा कौटुंबिक तंट्यांमुळे किंवा संघर्षामुळेही कुटुंबातील माणसे एकमेकांपासून दूर होतात. स्वतःचे वेगळे असे घरकुल बांधतात किंवा स्वतःच्या सदनिकेत राहावयास जातात. अशावेळी वाड्यावरील किंवा बिल्डिंगमधील शेजारी किंवा मित्रमंडळी मध्यान्ह रात्री किंवा पहाटे सर्व परिसर निद्राधीन असताना श्रीगणेशमूर्ती घराच्या किंवा सदनिकेच्या दाराबाहेर माटोळीचे सामान, अन्नधान्य, गणेशपूजेचे साहित्य व फटाकडे आणून ठेवतात. जाग आणण्यासाठी फटाके वाजवून निमिषार्धात तेथून नाहीसे होतात. दारात गणेशमूर्ती कोणी आणून ठेवली हे कळू नये यासाठी हे सारे करतानाच गणेशपूजेत कोणतीही अडचण येऊ नये किंवा धांदल-गडबड उडू नये यासाठी हे सारे केले जाते. बहुतेक लोक गणपतीच्या मूर्तीची आनंदाने प्रतिष्ठापना करतात. गणपतीने आपणहून आपल्या घरी आगमन केल्याची भावना त्यामागे असते. क्वचितच प्रसंगी घरी अडचण असल्यास सदर मूर्ती कोणत्याही मंदिरात नेऊन ठेवली जाते.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात सर्वप्रथम महाराष्ट्रात १८९३ पासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या प्रेरणेने सुरू झाली असे आपण खर्या अर्थाने मानतो. परंतु कोकणात आणि गोव्यात लहान प्रमाणात का होईना पण कौटुंबिक गणेशचतुर्थी ही सार्वजनिक गणेशोत्सवासारखीच होती आणि आजही आहे. कारण गेल्या काही दशकांत एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत असून विभक्त कुटुंबपद्धती अमलात येत आहे. निदान गणेशचतुर्थीत तरी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले कुटुंबीय आपल्या मूळ घरी येतात, एकत्र बसतात, एकत्र जेवतात, एकत्र श्री गणेशाच्या आरत्या म्हणतात. विखुरलेली मने एकत्र येतात आणि पुन्हा एकदा एकत्र कुटुंबपद्धतीचा आनंद लुटतात हे या गणेशचतुर्थीच्या सणाचे अमोल महत्त्व आहे असे मला वाटते.
कौटुंबिक जीवनाइतकेच सार्वजनिक जीवनही महत्त्वाचे आहे. कारण आपलं व्यक्तिगत व कौटुंबिक जीवन हे सामाजिक जीवनाचाच एक भाग असल्याने आपल्याला आपलं वैयक्तिक व कौटुंबिक जीवन सामाजिक व सार्वजनिक जीवनापासून वेगळं करता येत नाही. त्यामुळेच कदाचित समाजप्रबोधन, सामाजिक जाणिवा जागृत करण्याबरोबरच स्वातंत्र्याचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याच्या इराद्यानेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना महाराष्ट्रात रुजवली असावी. सामाजिक संघटन, जडण-घडण, स्वातंत्र्य व स्वराज्याची प्रेरणा, जीवनमूल्यांचे संगोपन आणि एकूणच सुयोग्य दिशेने वाटचाल करणारी सामाजिक जाणीव हे मूलतत्त्व यामागे असावे असे मला वाटते. कारण गणेशोत्सव हा आपले एक धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संचित आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवामागची संकल्पना आणि विधायक विचार आणि भूमिका पावसात उगवणार्या छत्र्यांप्रमाणे निर्माण झालेल्या शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्राच्या विविध भागांत लोकमान्य टिळकांची मूळ संकल्पना बाजूला पडली असून श्री गणेशोत्सव मंडळांची एकमेकांमधील स्पर्धा, अतिभव्यतेचा हव्यास, हेवेदावे, वैयक्तिक अहंकार, पर्यावरणाकडे केला जाणारा काणाडोळा, सामाजिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे एकूणच समाजात पसरलेली अस्वस्थता याचाही विचार आजच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करण्याची वेळ आली आहे. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे विविध स्वरूपात भक्तांनी पूज्य भावनेने गणेशचरणी अर्पण केलेला निधी खरोखरच सन्मार्गी लागतो का असा प्रश्न आज गणेशभक्तांसमोर उभा राहतो आहे. या प्रश्नाचे योग्य निराकरण झाल्यास सार्वजनिक गणेश मंडळाची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा मूळ हेतू साध्य झाल्याचे समाधान सर्वांनाच मिळेल.
आपल्या गोव्याच्याही विविध भागांत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उमेदीने आणि उत्साहाने साजरा केला जातो. गोवा मुक्तीनंतर म्हापसा शहरात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली असावी असे मला वाटते. म्हापशातील काही स्वातंत्र्यसैनिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला सार्वजनिक गणेशोत्सव आजच्या राममनोहर लोहिया बागेत साजरा केला जायचा. त्यानंतर ही जागा बदलून म्हापसा नगरपालिका बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावर सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना होऊ लागली ती आजतागायत सुरू आहे. गणेशचतुर्थीपासून अनंतचतुर्दशीपर्यंत म्हणजेच मूर्तिप्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत अनेक कार्यक्रम सादर केले जातात. नाट्य, संगीत, पारंपरिक कला, भजन, नृत्य आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबरच व्याख्याने, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, विविध क्षेत्रांत योगदान देणार्या नामवंतांचा व परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आदी समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे केले जातात. मराठी रंगभूमीवरील नावाजती व्यावसायिक नाटके आणि संगीत कार्यक्रम सादर करणारे म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे एकमेव असावे. आज गोव्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे जरी देणगीकुपने काढत असली तरी अशी देणगीकुपने काढून निधी गोळा करण्याचा सर्वप्रथम मान म्हापसा सार्वजनिक मंडळाला जातो. शिवाय स्मरणिकेतील जाहिराती आणि बाजारपेठेतील व्यापारी व गणेशभक्तांकडून मिळणार्या देणग्यांतूनही निधी गोळा केला जातो. दरवर्षी मागील वर्षाचा हिशेबही प्रसिद्ध केला जातो, जेणेकरून मंडळाच्या व्यवहारातील पारदर्शकता गणेशभक्तांना व देणगीदारांना दिसून येते. त्यामुळे मंडळाची विश्वासार्हताही वाढली आहे.
काही वर्षांपूर्वी म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव न्यासाची स्थापना करण्यात आली. सर्व आर्थिक व्यवहार न्यासाकडून हाताळले जातात. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वेगळ्या कार्यकारिणीची निवड केली जाते. प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत सर्व कार्यक्रमांचे आयोजन हे कार्यकारी मंडळ करीत असते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोळा झालेला निधी हा समाजाचाच असल्याची भावना बाळगून न्यास मुलांसाठी शिबिरे आयोजित करणे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, गरजूंना औषधोपचारांसाठी आर्थिक मदत देणे, रक्तदान करणे आदी उपक्रमही हाती घेत असते. सगळे व्यवहार चोख आणि पारदर्शक असल्यामुळे न्यासाकडे स्वतःची अशी भरीव मालमत्ताही आहे.
म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबद्दल एवढं लिहिण्याचं एक कारण म्हणजे आज म्हापसा शहरात वेगवेगळ्या वाड्यांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत. तरीसुद्धा म्हापसा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांत या मंडळासह अकरापगड जाती-जमातीचे लोक भक्तिभावाने सहभागी होतात हे म्हापसा गणेशोत्सव मंडळाचे खास वैशिष्ट्य आहे. दुसरं कारण म्हणजे, म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्रेरणा घेऊन गोव्यातील इतर मंडळींनीही असे उपक्रम राबवावेत हाच यामागचा हेतू आहे.
काळाशी स्पर्धा करणारे आपले धकाधकीचे जीवन, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांत आधुनिकतेच्या नावावर घातला जाणारा धिंगाणा, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील संघर्ष, सार्वजनिक जीवनात पदोपदी ढासळणारी नीतिमत्ता, राजकारणात राजमान्य झालेला भ्रष्टाचार, सत्ताधीशांची मदांध आणि अरेरावी प्रवृत्ती, राजकीय विरोधकांवर सूड उगवण्याची वृत्ती, पक्षीय राजकारणाने वैयक्तिक व सामाजिक जीवनावर केलेली मात, सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी या पार्श्वभूमीवर समस्त जनांना श्रीगणेशाने सुबुद्धी द्यावी आणि एकूणच समाजाला सन्मार्गाकडे नेण्याच्या सत्कार्यात गुंतलेल्या कार्यकर्त्यांवर वरदहस्त ठेवावा अशी प्रार्थना गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्या सुखकर्त्या, दुःखहर्त्या वक्रतुंडाकडे करतो!