सावली

0
27
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

आजच्या ग्रामीण स्त्रीला कोणी बरे शाप दिलाय? का म्हणून तिला मरत-मरत जगावे लागते? आयुष्यभर पतीची सावली बनून राहिल्याने हे प्रायश्चित्त का? भारतीय खेडवळ स्त्रीचा त्याग आजपर्यंत उपेक्षितच राहिला आहे. सावली असून नसल्याप्रमाणे आहे.

माणसाबरोबर माणसाची सावली जन्मापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबतीला असते. जेथे-जेथे माणूस जातो, तेथे-तेथे सावली त्याला चिकटूनच जात असते.
सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण पूर्वेकडून तिरपे पडते तेव्हा माणसाची सावली शास्त्रीय कारणामुळे लांब पडत असते. परत सूर्यास्ताच्या वेळी पश्चिमेकडून सूर्यकिरण तिरपेच पडत असते. फक्त दुपारच्या मध्यान्ह प्रहरी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा सूर्यकिरण सरळ रेषेत आपल्या डोक्याला स्पर्श करते आणि सावली पायाखालीच लहानशी पडते.

सावलीची भीती बाळगायचे कारणच नाही. कारण आपल्या शरीरात रक्तवाहिन्या जशा आवश्यक असतात तशीच सावलीदेखील आवश्यक म्हणूनच आपल्या सोबत वावरत असते. सावलीला जरी आपण हाताने ढकलले तरी ती जाणारी नसते. आपल्या रक्षणासाठी आपली मैत्रीण बनून ती राहत असते. पण आपल्याला तिची पर्वा नसते. कित्येकदा आपले लक्षच तिच्याकडे नसते. ती आपल्याबरोबर नेहमीच वावरत असते याची कल्पनादेखील आपल्याला येत नाही. सावली जर उपद्रवी असती तर तिचे अस्तित्व आपल्याला जाणवले असते. ती निरुपद्रवी आहे म्हणूनच आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो; आणि तिचे महत्त्वच विसरून जातो.

आपला मृत्यू आपल्या जन्माबरोबरच आपल्या सोबतीने सावलीसारखा वावरत असतो. पण आपण त्याचे अस्तित्वच ओळखत नाही. जणू काही अमरपट्टा घेऊन आल्यासारखे मदांधपणे वावरतो. आपल्या अस्तित्वाचे खरे ज्ञान जर आपल्याला झाले असते तर सर्वात अगोदर आपला अहंकार पिकलेल्या पानासारखा गळून पडला असता. खूप प्रकारचा अहंकार आपल्यावर आरूढ झालेला असतो. ऐश्वर्याचा, संपत्तीचा, पैशांचा, ज्ञानाचा, रूपाचा, घराचा, पत्नीचा, पतीचा, मुलांचा, जमिनीचा, शक्तीचा, कीर्तीचा, सत्तेचा, भक्तीचा, घराण्याचा, जातीचा असे विविध रूपांचे अहंकार आपल्याला गुलाम बनवत असतात.

नम्रता आपण विसरतो व घमेंडीने आणि उर्मटपणाने आपाद्मस्तक बहरतो. मृत्यूची सावली आपल्या वागण्याकडे पाहून खदाखदा हसते याची आपल्याला जाणीवच नसते. सावली दिसत असून न दिसल्याप्रमाणे आपण वागतो. एवढे ढोंगी बनून आपल्याला कसे बरे चालेल?
जे आपल्यासाठी सावलीसारखे वावरतात त्यांची आपल्याला पर्वा नसते. आपले आई-बाप आपल्यासाठी एवढे कष्ट घेतात, त्या कष्टांना दुसरी उपमाच नाही. त्यांच्या आधाराशिवाय या भूमीवर आपण उभेच राहू शकलो नसतो. कित्येक बालकांचा जमिनीवर रांगण्याअगोदरच जीव जात असतो, तसे आपण कधीच संपून गेलो असतो. आई-बापाने गोंजारत-चुचकारत आपल्याला सांभाळले, वाढवले, पोसले; पण आपल्या लक्षात ते सत्य येतच नाही. मायेची सावली किती गडद असते याची आपल्याला कल्पनाच येत नाही. हा फारच मोठा दोष आपल्या रक्तात आज सामावलेला आहे आणि हेच तर खरे आपले दुर्भाग्य आहे. मायेच्या सावलीचे माहात्म्य जर आपण ओळखले असते तर एकाही माता-पित्याचे त्यांच्या वार्धक्यामध्ये हाल झाले नसते. मुलांच्या संसारातून जिवंतपणीच त्यांची उचलपट्टी झाली नसती. ‘आजची गरज- आजची गरज’ असे ढोल बडवत वृद्धाश्रमांची निर्मिती झालीच नसती. आपल्या प्राचीन संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाला हा विभक्तवाद बिलकूल मान्य नाही. या विषयावर कितीतरी ऊहापोह अगोदरच झाला आहे तरी आपल्याला खरी अक्कल येत नाही.

आपली धर्मपत्नी आपल्याबरोबर सावलीसारखी तळमळत असते. आपण लहान-लहान कारणांवरून तिच्यावर भडकतो, विनाकारण तिचा अपमान करतो, कित्येकदा निष्कारण रडवतो. तिच्या त्यागाचा तिरस्कार करतच आपण जगत असतो. तिची दिवस-रात्र आपल्या संसारासाठी चाललेली धडपड आपल्या कठोर हृदयाला पाझर फोडत नाही. सकाळपासून मध्यान्ह रात्रीपर्यंत पोराबाळांसाठी तिची चाललेली अखंड सेवा आपण ओळखत नाही. सगळ्या आप्तेष्टांना वगळून आपल्यासाठी हाता-पायांना आपल्या पतीनिष्ठेची बेडी तिने घालून घेतली आहे ती आपल्याला दिसत नाही. एवढी पवित्र जाण जर आजच्या प्रत्येक मर्दाला आली असती तर डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पुसत आजच्या स्त्रीला जगावे लागले नसते.

खेड्यातील स्त्रीची कहाणी नेहमीच हृदयद्रावक बनून राहिली आहे. दिवसभर शेतात अतिश्रमांची कामे करावीत. घरी येऊन चूल पेटवावी, भात कांडून तांदूळ करावेत, नदीवर नेऊन धुणी धुवावीत, जंगलात जाऊन चुलीसाठी लाकडे आणावीत, घरातील व घराबाहेरील साफसफाई, पोराबाळांची उष्टी-खरकटी, भांड्यांची सगळी घासपूस करून दोन घटकांची उसंत नाही; आणि हे सगळे कमी म्हणून दारुड्या पतीची मारपीट सहन करावी. अशा या स्त्रीचे सांत्वन कोणी करावे?
अहिल्येला पती गौतमने शाप दिल्यावर ती शिळा होऊन पडली व श्रीरामाचा पदस्पर्श झाल्यावर तिचा उद्धार होऊन तिला मुक्ती मिळाली. पण या आजच्या ग्रामीण स्त्रीला कोणी बरे शाप दिलाय? का म्हणून तिला मरत-मरत जगावे लागते? आयुष्यभर पतीची सावली बनून राहिल्याने हे प्रायश्चित्त का? भारतीय खेडवळ स्त्रीचा त्याग आजपर्यंत उपेक्षितच राहिला आहे. सावली असून नसल्याप्रमाणे आहे.
सावली आपल्यासाठी कोण सांभाळून आहे? सावलीकडे आपले कोणते कर्तव्य आहे? या दोन प्रश्नांची उत्तरे जर आजच्या माणसाने शोधली तर खूप झाले असे म्हणावे लागेल.