साबांखातील पदे आतातरी योग्यतेनुसार भरा : सरदेसाई

0
7

उमेदवारांची निवड करताना घोटाळा झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अडकून पडलेली नोकरभरती आता नव्याने परीक्षा घेऊन मार्गी लावण्यात येणार आहे, ही चांगली गोष्ट असून निदान आतातरी ही पदे योग्यतेनुसार भरण्यात यावीत, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काल केली.

या नोकरभरती घोटाळ्यासंबंधी गोवा फॉरवर्डने गोवा विधानसभेत तसेच विधानसभेबाहेरही आवाज उठवला होता. त्यानंतर प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते, असे सरदेसाई यांनी काल निदर्शनास आणून दिले. ही पदे वशिला अथवा घोटाळ्याशिवाय भरण्याचे आश्वासन सरकारने उच्च न्यायालयात दिले होते. त्यामुळे आता सरकारने हे आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
राज्यातील उच्च शिक्षित व हुशार अशा बेरोजगारांना नोकऱ्या मिळायला हव्यात. सरकारी पदांची विक्री म्हणजे वाईट प्रशासन असून, याविरुद्ध गोवा फॉरवर्ड पक्ष डोळ्यांत तेल घालून भरती प्रक्रियेकडे लक्ष ठेवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.