– प्रा. रमेश सप्रे
खरं तर, ‘साक्षी..इन् नो मॅन्स लँड’ म्हटल्यावर मीच्या साक्षीनं वादच घातला असता. ती तुटूनच पडली असती… ‘व्हाय इन् नो मॅन्स लँड? व्हाय नॉट इन् नो वुमन्स लँड? व्हाय नॉट इन् नो पर्सन्स लँड?’
पण आता साक्षी खरंच ‘ना घरकी, ना घाटकी’ अशा अवस्थेत आहे. घर तर सुटलंय अन् घाटानं जवळ केलेलं नाहीये. अन् कधी करील असं वाटतही नाहीये. असं झालंय तरी काय साक्षीला? … काही विशेष नाही .. फक्त तिचा एस् एस् सीचा निकाल लागून ती आता अकरावीत पोचलीय.
अकरावी–बारावी .. शाळा पुरी झालेली नि कॉलेज सुरू व्हायचंय याच्या मधली अवस्था आहे तिची. म्हणूनच ती आहे नो मॅन्स लँड मध्ये! एका राज्याची किंवा राष्ट्राची हद्द संपते तिथं एखाद्या दगडावर किंवा कमानीवर लिहिलेलं असतं… ‘आभारी आहोत. भेटीबद्दल धन्यवाद!’ नंतर काही अंतरावर दुसर्या राज्याची किंवा राष्ट्राची सीमा सुरू झाल्याचं कळतं तेही अशाच दगडावर किंवा कमानीवर लिहिलेल्या मजकुरावरून .. लिहिलेलं असतं … ‘सुस्वागतम्!’ ही दोन सीमांच्या (कमानींच्या) मधली जी भूमी असते ती माणसाची भूमी नसते..असं मानलं जातं. मग ती कुणाची भूमी असते? देवदूतांची? देवाची?… असेलही.
ज्या दिवशी खूप अपेक्षा नि आकांक्षा घेऊन येणार्या नव्या नव्हाळीतील तरुणाईसाठी हा उच्च माध्यमिकचा (हायर सेकंडरी) टप्पा बनेल तो दिवस भाग्याचा! पण असं काही अपवाद सोडल्यास बर्याच उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था त्रिशंकूसारखी अधांतरी असते.
ही दोन वर्षे युवकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची असतात. त्यांना आपल्या अस्तित्वाचं, व्यक्तिमत्त्वाचं भान अधिक जाणीवपूर्वक येऊ लागलेलं असतं. त्यांची आत्मप्रतिभा (सेल्फइमेज) प्रगल्भ (प्रभावी) होऊ लागलेली असते. आवडी–निवडी, मतं–दृष्टिकोन, भविष्याबद्दलचा विचार, स्वप्नं नि योजना सार्या वेगानं घडत–बिघडत नव्यानं घडत असतात. त्यांना गरज असते या काळात मित्र – तत्त्वज्ञ – मार्गदर्शक असलेल्या समुपदेशकाची (कौन्सेलरची). ही भूमिका त्यांचे शिक्षक चांगल्या प्रकारे निभावू शकतात. थोडंसं उद्बोधन (ओरिएन्टेशन) केलं तर या संवेदनक्षम तसेच स्फोटक वयात शिक्षक त्यांची जीवनं आकारू शकतात. पाऊल चुकून, वाईट संगतीत पडून उभ्या जीवनाचा सर्वनाश घडवण्यापासून त्यांना वाचवू शकतात. आज तर हे अत्यंत आवश्यक आहे.
सर्व बाजूंनी माध्यमं, मालिका, जाहिराती यांच्यामधून बुद्धी बधीर होईल असा हल्ला होत आहे. स्वतंत्र विचारशक्ती योजनापूर्वक खुंटवली जातीय. अधू केली जातेय. ‘अधू मेंदूचे मधू’ जीवनात काय साध्य करू शकतील?
हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. वाढलेला अभ्यास त्यातून वाढत चाललेल्या संधी या दृष्टींनी विकास साधणं ही खरी या कालखंडाची गरज असते. मानसिक आधाराची, भावनिक अस्तराची खूप आवश्यकता असते. या टप्प्यावर युवा वर्ग प्रवेश करतो तोच मुळी चित्रविचित्र कल्पना उराशी बाळगून.
या कालखंडात प्रवेश करताना काही गोष्टी मिळूनच जातात. वरखर्चासाठी (पॉकेटमनी) अधिक पैसे, शिक्षणासाठी रोज प्रवास, अनेकांना दुचाक्या (वाहनं), क्वचित वेळा घरातून निघण्याच्या व घरी परतण्याच्या आणि मुख्य म्हणजे हे सारं करायला अधिक स्वातंत्र्य! साहजिकच कानात वारं शिरायला नि इकडे–तिकडे भटकायला नि भरकटायला पुरेसं अनुकूल वातावरण असतं. ‘तू जपून टाक पाऊल जरा| जीवनातल्या मुशाफिरा’ हा या वर्गासाठी सावधान–मंत्र असतो. याचा पारंपारिक अर्थ (उदा. सातच्या आत घरात!) असा घ्यायचा नसतो. तर भावी जीवनातील करिअर व आव्हानांच्या दृष्टीनं करायचा असतो.
साक्षीचंच बघू या. ती आहे विज्ञान शाखेची मुलगी. म्हणजे तिची त्रिविध कामं ही गिरणी कामगारासारखी यांत्रिक झालीयत – लेक्चर्स – प्रॅक्टिकल्स – जर्नल्स! तिचं दळून पीठ झालेल्या अवस्थेत रोज घरी परतणं याचंच उदाहरण आहे. जणू हे दळलं जाणं कमी आहे म्हणून तिच्या वाट्याला (नशिबात) पिळलं जाणंही येतं. गणित – विज्ञान या भरपूर मार्क्स मिळवायच्या विषयांसाठी असलेले कोचिंग क्लासेस. ऊसाचा चरकच जणू. गणित – आधिभौतिकी (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), जीवशास्त्र (बायॉलॉजी) या विषयांसाठी स्वतंत्र क्लासेस. सकाळी सहापासून ते रात्रीपर्यंत या शाळा व शिकवण्यांच्या चरकात पिळलं जाऊन एखाद्या चिपाडासारखी निरस – निःसत्त्व स्थिती झालीय साक्षीची.
पंचकोशांचा संतुलित विकास म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकसन व चारित्र्य संवर्धन (कॅरेक्टर फॉर्मेशन). हे पाचही कोश संकटात पडून साक्षी भकास जीवन जगू लागते. तिची मनगटं, एकूणच देहाकृती आक्रसू लागते. आकुंचित पावते त्या काळात जेव्हा ती रसरशीत, चैतन्ययुक्त होणार असते. असं कसं घडतं?
पहिला अन्नमय कोश धोक्यात येतो कारण नीट, साधं, सकस, पोटभर जेवण बंदच होतं. सकाळी जाताना डबा घ्यायचा. तोही कोरडा. नाहीतर पुस्तक–वह्या घाण होणार. तुम्ही जर अशा युवांचे डबे उघडून पाहाल तर थक्कच व्हाल. मुलं शक्यतो डबे आणण्याच्या भानगडीच पडत नाहीत. बाहेरचं तेच तेच मसाल्याचं, तळलेलं, चटपटीत नि चमचमीत घेऊन खाऊन भावी अनारोग्याची पूर्वतयारी केली जाते.
पालक–शिक्षक संघटना, महाविद्यालयांचे व्यवस्थापन, काही खाजगी समाजसेवी संस्था यांनी पुढाकार घेऊन खास महिलावर्गानं तयार केलेले चवदार पण स्वच्छ सकस पदार्थ कॉलेज कँटीनमध्ये उपलब्ध करून देण्याची योजना राबवण्यासारखी आहे. काही उदार दात्यांच्या अनिवासी, माजी विद्यार्थ्यांच्या साह्यानं हा प्रयोग गोव्यात करून बघण्यासारखा आहे. व्यावसायिक महाविद्यालयात अशी सोय असली पाहिजे. काही मोठ्या, नावाजलेल्या संस्थात अशी उपाहारगृह असतात.
नीट आहार मिळाल्याशिवाय विचार – च्चार –आचार सारं परिणामकारक होणार नाही. अभ्यासाची सर्व अंगं (लेखी–प्रायोगिक–मौखिक इ.) प्रभावित होतील. परिणाम म्हणून शिक्षणातील एकूणच विद्यार्थ्यांची कामगिरी नीट होणार नाही.
दुसरा कोश प्राणमय. या काळात दीर्घश्वसन, उभा श्वास (डायफ्रॅमिक ब्रीदिंग), तालबद्ध श्वसन असलं तर प्राणशक्ती मोठ्या प्रमाणावर निर्माण होते, जी देहाच्या आरोग्यासाठी तशीच शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी खूप उपयोगी पडते. हे ज्याचं त्याला करता येते. पण आपली साक्षी इकडे बिलकूल लक्ष देत नाही.
मनोमय कोशाची उपासमार होते. भावनात्मक स्थैर्य न लाभल्याने आशा–निराशेचा लपंडाव मनात चालू राहतो, उत्साह – निरुत्साहाचे झटके वारंवार येत राहतात. कधी कधी एकांतिक (एक्स्ट्रीम स्टेप्स) पावलं उचलली जातात. यात कुणाचंही कल्याण नसतं. अशा वेळी चांगला दोस्त, सहेली खूप उपयोगी पडतात. कारण या काळात मित्रवर्गाचं दडपण (फिअर ग्रूप प्रेशर) व अनुकरण खूप असतं. सकारात्मक साथसंगत मिळाली तर जीवन घडायला – घडवायला वेळ लागत नाही. विज्ञानमय कोशाचा विकास म्हणजेच विचारांचा, चिंतनकौशल्याचा विकास. खरं तर शिक्षणाचा उद्देशच हा आहे. पण सध्या फक्त ‘माहितीचं आदान–प्रदान’ (एक्स्चेन्ज ऑफ इन्फर्मेशन) हे शिक्षणाचं स्वरूप बनलंय. नव्या ज्ञानाची निर्मिती कोणत्याही स्वरूपात घडतच नाही. गंभीर प्रश्न आहे हा! विज्ञानमंडळं–वाङ्मयमंडळं, चर्चा, वादविवाद मंच असे उपक्रम बर्याच ठिकाणी नसतातच. असले तरी त्यात विज्ञानाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग जवळजवळ शून्य असतो.
आनंदमय कोशाबद्दल तर विचारायलाच नको. साक्षी मोबाइलवर आपल्याच वयाच्या मित्रमैत्रिणींशी बोलताना हसते तेवढीच. क्वचित दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहताना. पण एरवी हास्यमुद्रा नसतेच. प्रसन्न, टवटवीत, हसरा चेहरा ही आपली कमाई असते. मेकअप करून, ब्युटी पार्लरमधून असा चेहरा तयार होत नाही.
एकूण काय तर या टप्प्यावर सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्षच होतं. हल्ली गणित–विज्ञान विषयावर किती जोर दिला जातो? त्यांचे क्लासेस, असाइनमेंट्स यानं अख्खं जीवन व्यापलं जातं मुलांचं नि मग ते झाकोळून जातं. आईवडलांच्या नजरेसमोर हे घडत असतं. त्यांना ते योग्य वाटतं असं नाही. पण मार्कांच्या शर्यतीत हा जीवन–विकास दुय्यम ठरतो. हा संवाद पहा– ‘साक्षी, ब्रेकफास्ट तरी नीट करून जा.’ ‘वेळ नाही. मी दुपारी जेवायला नसेन आणि रात्री क्लासहून यायला उशीरच होईल.’ … रात्री परतल्यावर ‘आता इतकी थकलेय की भूकच नाही. झोप येतेय… बापरे, झोप आली तर अभ्यासाचं काय?’
धावाधाव सुरू आहे रेसच्या ट्रॅक(मार्गा)वरून.. प्रशिक्षित घोड्यांसारखी ज्यांना कानसुद्धा इकडे–तिकडे हालवायची परवानगी नसते. कारण पुढे रोखलेल्या कानांच्या टोकानं फिनिशिंग लाइन पार करूनच स्पर्धा जिंकली जाते. इथंही एकेका गुणानी गुणवत्ता यादी बदलत राहते. केवढं दडपण मनावर!
अकराविला पुरेशी दमछाक नि बारावीला तर विचारूच नका. स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे अक्षरशः दिव्य असतं. सीतेचं अग्निदिव्य काहीच नाही असं! यावेळी विज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांचा विचार केलाय कारण त्यांच्या या काळातील जीवनाची जातच वेगळी असते.
अगदी हसतखेळत, रमतगमत जरी नाही तरी आरामात अभ्यास कसा करता येईल? एकूणच या दोन वर्षातील जीवनाला घडवण्यासाठी काय करता येईल?
श्र सर्वांगीण विकासाला प्राधान्यक्रमानं महत्वं द्यावं लागेल. अभ्यास आहेच. पण पालकांची भूमिका या दृष्टीनं महत्वाची आहे. आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांच्या तना–मना–जीवनावर लादणारे ‘लादेन’ होणं बंद झालं पाहिजे.
श्रठरावीक अभियांत्रिकी – वैद्यकीय (इंजिनिअरिंग–मेडिकल) शाखांसाठी प्रवेश म्हणजे अंतिम उद्दिष्ट न मानता पर्यायी अनेक उपलब्ध शाखांचा विचारही करायला हवा.
श्र मुलांचे प्रेरक (इन्स्पिरेटर) बनलं पाहिजे. केवळ घाम फोडणारे (पर्स्पि–रेटर) आणि सार्या कोवळ्या, मानवी भावना मारणारे (टर्मिनेटर) ही भूमिका मागे पडली पाहिजे.
श्र पालक–शिक्षकांनी या काळात ‘मित्राची’ जबाबदारी पार पाडली पाहिजे. फार फार गरज आहे या भूमिकेची. नंतर समुपदेशनासाठी जाण्यापेक्षा वेळीच सावधगिरी घेतली पाहिजे.
श्र या कोणाच्याही मालकीच्या नसलेल्या भूमीला देवभूमी बनवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
या संदर्भात एक दूरदर्शनवरची जाहिरात आठवते. एका मोबाईल कंपनीची. दोन देशांच्या सीमांवर उंच काटेरी तारांचे कुंपण.. रक्षण करणारे कडवे सैनिक.. एकीकडे एकट्यानंच फुटबॉल खेळणारा मुलगा… दुसरीकडून त्याच वयाचा तो खेळ पाहणारा मुलगा… मध्ये ‘नो मॅन्स लँड!’ हा मुलगा फुटबॉल असा उंच उडवतो की तो दोन कुंपणांच्या मध्ये पडतो…आणायला जातो, दुसर्याला खुणावतो…तोही धावत येतो…नि सुरू होतो दोघांचा निरागस खेळ ‘नो मॅन्स लँड’वर …दोन्ही बाजूंच्या सैनिकांच्या नजरा तो खेळ कौतुकानं पाहत असतात. पालकांना व शिक्षकांना साक्षीसाठी ‘नो मॅन्स लँड’ अशी भूमी बनवता येईल का?…कशी? पुढच्या वेळी…