सांस्कृतिक केंद्राचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव

0
10
  • रवींद्र माहिमकर

‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय’ ही संस्था आज महाराष्ट्रातील समाज जागृतीचे व प्रबोधनाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. महाराष्ट्राला भूषणावह असलेल्या या संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची सांगता आज- 5 ऑगस्ट रोजी- होत आहे. त्यानिमित्ताने या संस्थेचे कार्य, वैशिष्ट्ये, आगामी प्रकल्प यांचा हा त्रोटक आढावा.

राष्ट्राची संपन्नता त्या देशाच्या उत्पादनशीलतेवर, निर्यातीवर गणली जाते. परंतु राष्ट्रातील समाजाच्या उन्नतीचे मोजमाप त्या समाजाच्या सृजनशीलतेवर व संस्कृती या गोष्टींवर केले जाते. त्यादृष्टीने ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय’ ही संस्था आज महाराष्ट्रातील समाज जागृतीचे व प्रबोधनाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. ग्रंथालयातील जुनी-नवी प्रचंड ग्रंथसंपदा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ही संस्था स्थापन करणाऱ्या ध्येयनिष्ठ संस्थापकांचे मोठे उपकार आहेत. शारदोपासनेचे हे कार्य कोणताही गाजावाजा न करता गेली सव्वाशे वर्षे अव्याहतपणे चालू आहे.

1 ऑगस्ट 1898 नारळीपौर्णिमेच्या दिवशी विनायक कोंडदेव ओक यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची सुरुवात झाली. गिरगावातील धसवाडीत एका बैठ्या घराच्या छोट्या खोलीत संस्थेचा बिजांकूर रोवला गेला. खोलीचे भाडे होते रु. पाच. पण आज एखाद्या प्रचंड वृक्षाप्रमाणे संस्थेचा विस्तार झाला आहे. या ज्ञानवृक्षाच्या छायेत कोणाही ज्ञानतृष्णार्थाने यावे, ज्ञानसाधना करावी व तृप्त व्हावे. संस्थेची स्थापनाबिजे उपेक्षित होती. पण त्यातले सुप्त सामर्थ्य प्रचंड होते. अर्थात त्याचे श्रेय संस्थेच्या सर्व कष्टाळू कार्यकर्त्यांना जाते. 1898 अगोदर संस्थेने तीन-चार वर्षे प्रयोगात्मक काम केले ते ‘भारत सेवक समूह संस्था’ या नावाने. 1893 साली ठाण्याला वि. ल. भावे यांच्या प्रयत्नाने पहिले मराठी ग्रंथसंग्रहालय सुरू झाले. हा आदर्श व प्रेरणा या तरुणांसमोर होत्या. छोट्या पेटाऱ्यात मावणारे 300 ग्रंथ हे संस्थेचे भांडवल! पहिल्या वर्षी संस्थापकांनी घरोघर फिरून जेमतेम 78 सभासद नोंदवले. आज संस्थेच्या मुंबईत चार व पुण्यात एक अशा पाच वास्तू आहेत. एकूण साडेचार लाखांपेक्षा अधिक पुस्तके आहेत. त्यात नवीन भर पडतेच आहे. सुमारे बारा हजारापेक्षा जास्त सभासद व 44 ग्रंथालय शाखा आहेत (त्यातील 33 कार्यरत). मुंबई महानगरपालिकेच्या 29 वाचनालयांचे काम संस्थेकडे आहे. तसेच बालगोपाळांसाठी सानेगुरुजी बालमंदिर वाचनालयाच्या 26 शाखा आहेत.

संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनी अध्यक्षीय भाषणात त्यावेळचे महाराष्ट्रातील अग्रगण्य बुद्धिवंत न्या. माधव गोविंद रानडे म्हणाले होते की, संस्थेचे स्वरूप आज जरी क्षुल्लक दिसत असले तरी संस्थेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा आहे. कालांतराने संस्था प्रचंड आकार घेईल याची मला खात्री आहे. सव्वाशे वर्षांपूर्वीची ही भविष्यवाणी आज फलद्रूप झाली आहे हे निश्चित.

मुं. म. ग्रंथ संग्रहालयासाठी अनेक दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व नेतृत्वाचा लाभ प्रथमपासूनच झाला. त्यात लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, डॉ. बाबासाहेब जयकर, म. म. पा. वा. काणे, आचार्य दोघे, प्रा. प्रियोळकर, न. र. फाटक, अनंत काणेकर, स. का. पाटील, वा. वि. भट, प्रा. सुरेन्द्र गावसकर, लक्ष्मणशास्त्री जोशी इ. अनेकांचा सहभाग आहे आणि अर्थातच त्यावेळचे कार्यकारी मंडळाचे सदस्य; आणि सांप्रत, खासदार मा. शरदचंद्रजी पवार. ही संस्था म्हणजे या सर्वांच्या कर्तृत्वाचे दृष्यफळ आहे.

या संस्थेचे गेल्या शतकातले काही महत्त्वाचे टप्पे म्हणजे, 1910 साली श्रीमंत सयाजीराव यांच्या हस्ते गिरगाव- भाई जीवनजी लेनमधील इमारतीची कोनशिला बसवली गेली. बाजूच्याच इमारतीतील सदाशिव नानाभाई हाटे यांनी संस्थेच्या इमारतीचे स्थापत्त्यविषयक काम विनामूल्य केले. 1923 साली संस्थेचा रौप्यमहोत्सव तात्यासाहेब केळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. 1941 ला संस्थेच्या दादर शाखेची स्थापना झाली. 48 साली नारळी पौर्णिमेला संस्थेचा सुवर्णमहोत्सव मुंबई इलाख्याचे पंतप्रधान बी. जी. खेर यांच्या हस्ते झाला. त्याच्या पुढच्या पाच वर्षांत ठाकूरद्वारच्या वास्तूचे चार माळ्यांचे काम पूर्ण झाले. 1959 साली संस्थेचा हीरकमहोत्सव साजरा झाला. तसेच संस्थेला नायगाव येथे साडेचार हजार चौ. यार्ड जागा मिळाली. मार्च 1959 ला पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते पहिल्या भव्य वास्तूचा कोनशिला समारंभ संपन्न झाला. पुढील वर्षी सानेगुरुजी बालविकास मंदिर हे विनामूल्य वाचन केंद्र स्थापन झाले. पहिल्या वास्तूला जोडूनच दुसऱ्या वास्तूचे उद्घाटन 1972 साली कवी कुसुमाग्रज ऊर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या शुभहस्ते झाले. संस्था खूप मोठी झाली, नावारूपाला आली म्हणून पुढील वर्षी नायगाव क्रॉस रोडचे नाव ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग’ असे करण्यात आले. त्याच वर्षी संस्थेचा अमृतमहोत्सव उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत साजरा झाला. 1985 ला महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार संस्थेला मिळाला. 1997 ला संस्थेचे शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे झाले व आता शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा सांगता समारंभ साजरा होत आहे. एका लोककल्याणकारी संस्थेचे 125 वर्षांचे अबाधित अस्तित्व ही फार दुर्मीळ पण तितकीच आनंदाची गोष्ट आहे.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आज महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक केंद्र झाले आहे. महाराष्ट्राला ललामभूत असलेल्या या संस्थेची खास कार्यवैशिष्ट्ये आहेत. त्यातले ग्रंथ संदर्भालय हे अखिल महाराष्ट्राचे भूषण आहे. सुमारे दोन लाखांची ग्रंथसंपदा, 12000 दुर्मीळ ग्रंथ, 900 दोलामुद्रिते, जुन्या पोथ्या, मासिके, वर्तमानपत्रे, जुनी हस्तलिखिते, साहित्यिकांच्या स्वाक्षरी, हस्ताक्षर, फोटो संग्रह इ. या ज्ञानभांडारात आहेत. दरवर्षी 15000 अभ्यासक त्याचा उपयोग करतात. रोज बारा तास हे संदर्भालय संस्थेच्या सेवातत्पर सेवकांकरवी सर्वांना खुले असते. मराठी भाषा संशोधन मंडळ व इतिहास संशोधन मंडळाचे कार्य प्रशंसनीय आहे. दाते सूची मंडळाकडून मराठी ग्रंथांची, नियतकालिकांची विषयवार सूची तयार आहे. असे अभूूतपूर्व कार्य इतर भारतीय भाषेत झालेले नाही. महाराष्ट्र प्रबोधन शाखेतर्फे शारदोत्सव व्याख्यानमाला, परिसंवाद, निबंध स्पर्धा व साहित्य-चळवळविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रकाशन विभागातर्फे थोर साहित्यिकांकडून मौलिक ग्रंथ लिहून घेऊन त्यांचे प्रकाशन केले जाते. तसेच दुर्मीळ पुस्तकांच्या आवृत्त्या पूर्वी काढण्यात आल्या. मराठी भाषा लघुलिपी केंद्रातर्फे वर्ग चालवले जात असत. आता संग्रहालयाचे कामकाज, संदर्भ नोंदी इ. अध्ययावतपणे संगणकावर होत असते, पण कार्ड पद्धतीनेही होते.

संस्थेच्या शताब्दी वर्षात अनेक विनंत्या व आवाहने करूनही कोणाकडून भरघोस आर्थिक मदत मिळालेली नाही, ही मोठी खंत व संस्थेचे दुर्भाग्यही! संस्थेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी दानशूर मराठी भाषाप्रेमिकांनी सहकार्य करणे अत्यंत जरूरीचे आहे. साहित्य संमेलनासाठी तुम्ही जरूर कोटी रुपये खर्च करा; पण काही लाख रुपये तरी या संस्थेकडे वळवा. ‘महाकोश’कारांनीही या संस्थेकडे जरूर लक्ष द्यावे अशी आग्रहाची विनंती करावीशी वाटते. संस्था अध्यक्ष मा शरदचंद्रजी पवार झाल्यावर मात्र आर्थिक पाठबळ काही प्रमाणात वाढले.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची आजची आर्थिक स्थिती फारच चणचणीची आहे, सेवकांचे पगार तुटपुंजे आहेत, ही खंत आहे व त्याचा खेदही वाटतो. काही वर्षांपूर्वी संस्थेची प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्यासाठी संचालक दर्जाचे पद निर्मिले गेले. संस्थेने गेल्या चार दशकांत प्रखर आर्थिक उन्हाळे सोसले; आता सावली मिळेल अशी आशा व्यक्त करूया. अनेक पत्रकार, संशोधक, साहित्यिक, विद्या व्यासंगींनी या संस्थेच्या आधारे ज्ञानसाधना केली आहे. मराठी माणसाला, मराठी भाषेला भूषणावह असलेल्या तसेच समाजाला हितकारक असलेल्या या ग्रंथसंग्रहालयाला कोणी अंतरता कामा नये. आपली कल्याणकारी (?) राज्य व केंद्र सरकारे मदतीचे केव्हा मनावर घेतील हे नंतर पाहू, पण प्रत्येक मराठी माणसाने आपल्या सहकार्याचा हात या संस्थेस देणे फारच अगत्याचे व निकडीचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र संस्कृतीचा, मराठी भाषेचा विकास काही प्रमाणात नक्कीच साध्य होईल. ग्रंथसंग्रहालय आता अध्यक्ष मा. शरद पवार व उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, खा. अनिल सावंत, रामदास फुटाणे आदी व विश्वस्त खा. सुप्रिया सुळे, प्रतापराव आसबे, खा. अनिल देसाई, अरविंद तांबोळी, प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, उमा नाबर, कमिटी सदस्य व संल्लग्न संस्था प्रतिनिधी कार्यरत आहेत व प्रगतीच्या मार्गाने आगेकूच करत आहेत. अर्थात सेवकवर्गाचे योगदान मोठे आहे. डॉ. प्रदीप कर्णिक मराठी संशोधन मंडळाचे संचालक आहेत आणि त्यांचे योगदान खचितच महत्त्वाचे आहे.