बनावटगिरी झालेली सर्व पदे रद्द केली असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर ती भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. ज्या उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया कायदेशीर झाली होती त्यांना नियुक्तीची पत्रे दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सुरुवातीस वरील प्रकरण दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पोलिसांकडे दिले होते त्यांनी केलेल्या चौकशीनुसार बनावटगिरी झाल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु त्यात कोणते अधिकारी किंवा अन्य कोण जबाबदार आहेत हे पुढील चौकशीअंती कळू शकेल. कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई होईल, असे पर्रीकर म्हणाले.
एका आरोग्य खात्यातच सुमारे ३२० पदे आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असताना सदर पदे भरण्याची प्रक्रिया चालू ठेवली होती. त्यामुळेच गोंधळ निर्माण झाला होता. वरील प्रकरणाच्या चौकशीमुळे काही उमेदवारांची वयोमर्यादा उलटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने प्रत्येक वर्गातील नोकरीसाठी आवश्यक असलेल्या वयोमर्यादेत आणखी दोन वर्षे वाढविण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधी लवकरच अधिसूचना जारी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळे उमेदवारांवर वरील प्रकरणाच्या चौकशीचा कोणताही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.
४७०० कोटी रु. नियोजनासाठी गोव्याचा प्रस्ताव
या वर्षासाठीच्या राज्याच्या नियोजनासाठी ४७०० कोटींचा रु. चा प्रस्ताव तयार असून आज दिल्लीत होणार्या नियोजन आयोगाच्या बैठकीत वरील प्रस्ताव सादर केला जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांना सांगितले.
गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाचा आराखडा ५० टक्के अधिक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
वरील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री काल संध्याकाळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील एनडीएचे उमेदवार पी. ए. संगमा यांच्याच विमानाने दिल्लीला गेले.
खनिज साठ्यांची उचल धोरणानंतर : पर्रीकर
खाण परिसरात असलेले खनिज साठे उचलण्याचा सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे सांगून खाण धोरण तयार झाल्यानंतरच त्यावर निर्णय घेणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.
सध्या खाण धोरणाचा मसूदा तयार करण्याचे काम चालू असल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यात एकही ट्रक खनिजाची वाहतूक करीत नसल्याचे सांगून याबाबत जिल्हाधिकार्यांना नजर ठेवण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.
बेकायदेशीर खनिज विषयावर आपण कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे ते म्हणाले. खाण प्रश्नावर पर्रीकर नरम पडल्याची काहीजण टीका करीत आहेत, परंतु त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
… तर वाहतूक खात्यातील पदेही रद्द
दरम्यान, वाहतूक खात्यातील निरीक्षकांची भरती चुकीच्या पद्धतीने झाल्याचे सिद्ध झाल्यास वरील २८ पदे रद्द केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर सांगितले.
सरकारच्या या धोरणामुळे वेगवेगळ्या खात्यात वादग्रस्त पद्धतीने भरती झालेल्या कर्मचार्यांची तारांबळ उडाली आहे.