सरकारी शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देणार

0
32

>> राज्य पातळीवरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, बलिदानाचा विसर पडता कामा नये. स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी राज्यातील सरकारी माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालयांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे दिली जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल राज्य पातळीवरील अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पणजी येथे केली.

राज्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त येत्या वर्षभरात पाच कलमी कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्याला सर्वच क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी स्वयंपूर्ण गोवा २.० मोहीम हाती घेण्यात आली असून, राजकीय पक्ष, पंच सदस्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
ग्राम विकासासाठी राज्यातील मागास असलेल्या १६ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात उत्तर गोव्यातील ६ आणि दक्षिण गोव्यातील १० गावांचा समावेश आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दोघांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान
मद्यधुंद वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेले पोलीस कर्मचारी शैलेश गावकर यांची पत्नी कविता शैलेश गावकर (बाळ्ळी-केपे) आणि विश्वास देयकर यांची पत्नी स्नेहा विश्वास देयकर, (आंबावली-केपे) यांना या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपा तत्त्वावर नोकरीची नियुक्तीपत्रेही देण्यात आली.

४ ते ६ महिन्यांत खाण व्यवसाय सुरू
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ऑक्टोबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खनिज लिजांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आगामी ४ ते ६ महिन्यात खनिज व्यवसाय सुरू केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.