Home बातम्या सरकारी प्राथमिक शाळांचा दर्जा वाढविण्याचे विधानसभेत आश्‍वासन

सरकारी प्राथमिक शाळांचा दर्जा वाढविण्याचे विधानसभेत आश्‍वासन

0

पर्वरीत सरकारी हायर सेकंडरीबाबत ठोस आश्‍वासन नाही

सरकारी विद्यालयांना व खास करून सरकारी प्राथमिक शाळांना पुढील सहा महिन्यांत आवश्यक त्या सर्व साधनसुविधा पुरवून शाळांचा दर्जा वाढवण्याचे आश्‍वासन काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला दिले.

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील घोषणा केली.

सरकारी शाळांमध्ये साधनसुविधांचा अभाव असल्याचे रोहन खंवटे व सुभाष फळदेसाई यांनी नजरेत आणून दिल्यानंतर पर्रीकर यांनी पुढील सहा महिन्यांत सरकारी प्राथमिक शाळांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे आश्‍वासन दिले.

सरकारी शाळांतील विद्यार्थी दूरदूरहून पायी चालत येत असताना या शाळांना बालरथ पुरवण्यात आलेले नाहीत. या उलट अनुदानित शाळांना मात्र बालरथ पुरवण्यात आले असल्याचे सुभाष फळदेसाई यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले असता सरकारी शाळांना येत्या सहा महिन्यात आवश्यक त्या सर्व साधनसुविधा उपलब्ध करू देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

यासंबंधीचा मूळ प्रश्‍न पर्वरी मतदारसंघातील अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी उपस्थित केला होता. पर्वरी मतदारसंघात उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्याची सरकारची योजना आहे काय, असा सवाल यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. मतदारसंघात केवळ एकच उच्च माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षण घेण्यासाठी पर्वरीबाहेर जावे लागत असल्याचे खंवटे यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, सध्या पर्वरीत एक उच्च माध्यमिक विद्यालय आहे. एका विद्यालयापासून ७-८ कि.मी. पर्यंतच्या अंतरावर दुसरे विद्यालय सुरू करता येत नाही. या अटीमुळे पर्वरीत आणखी एक उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्यास अडचण येत आहे. यंदा ११ वी इयत्तेला प्रवेश घेतलेल्या मुलांचा आकडा यापूर्वीच्या तुलनेत ३ हजारांनी खाली गेलेला असून पुढील तीन वर्षे ही स्थिती अशीच राहणार असल्याचे ते म्हणाले. प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यासाठीची वयोमर्यादा काही वर्षांपूर्वी वाढवण्यात आली होती. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे ते म्हणाले. पर्वरीतील परिस्थितीविषयी बोलताना पर्रीकर म्हणाले की, पेन्ह-द-फ्रान्स परिसरातील विद्यार्थी हायर सेकंडरी शिक्षणासाठी पणजीला येत असतात. सुकूर परिसरातील म्हापश्याला जातात. तर पर्वरी परिसरातील विद्यार्थी पर्वरी येथील हायर सेकंडरीत प्रवेश घेतात. पर्वरी येथे आणखी एक हायर सेकंडरीची मागणी असेल तर त्याबाबत विचार करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.