येथील गोवा चेंबर्सच्या सभागृहात काल झालेल्या प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीत गेल्या तीन-चार महिन्यांत सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेऊनच सरकार विरोधी आवाज उठविण्याचा निर्णय बैठकीत घेतल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
पंचायती असो, जिल्हा पंचायती असो, सहकार क्षेत्र असो सरकार अधिकारांचा गैरवापर करून या संस्थाच्या कारभारात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप शिरोडकर यांनी केला. याबाबतीत पर्रीकर सरकारने क्रीडा क्षेत्रही बाजूला ठेवले नाही, असे ते म्हणाले.
खाण धोरण तयार करण्यापूर्वी येथील खनिजांचे साठे उचलणे चुकीचे ठरेल. २५ हजार कोटींच्या ‘डंप’ची सरकार कशा पध्दतीने विल्हेवाट लावेल यावर आपल्या पक्षाचीही नजर असेल असे सांगून जनतेनेही त्यावर नजर ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
वरील बैठकीत तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्ष संघटित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
नोकर्यांच्या बाबतीतही पर्रीकर सरकारचे धोरण अन्यायकारक असून मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केलेल्या उमेदवारांना सेवेत घेण्याची मागणी शिरोडकर यांनी केली.
दि. १२ पासून सुरू होणार्या विधानसभा अधिवेशनात वरील सर्व प्रश्नावर पक्ष आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरील बैठकीस विरोधी नेते प्रतापसिंह राणे वगळता अन्य सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
विरोधी नेते गोव्याबाहेर होते. त्यांचे विमान उशिरा सुटल्याने ते बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत, असे शिरोडकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी गृहमंत्री रवी नाईक, खा. शांताराम नाईक, सरचिटणीस आल्तीन गोमस उपस्थित होते.