Home बातम्या सख्ख्या भावाची हत्या करणार्‍या दोघांना अटक

सख्ख्या भावाची हत्या करणार्‍या दोघांना अटक

0

वरचाबाजार फोंडा येथे मित्रानेच मित्राच्या डोक्यावर दगड घालून खून केल्याची घटना ताजी असतानाच काल दि. १८ रोजी रात्री -बेतोडा येथे स्वतःच्याच सख्ख्या भावावर सुर्‍याचा वार करत खून केल्याच्या आरोपावरून दोन भावांना अटक करण्यात आली आहे.

हिरू बाळू चव्हाण (५०), ठावरू बाळू चव्हाण (४५) व तारू बाळू चव्हाण (४०) हे तिघेही बंधू सिद्धापूर गंगावती कोपले (कर्नाटक) या आपल्या मूळ गावातून पैसा कमावण्यासाठी गोव्यात आले. तिघांपैकी ठावरू चव्हाण हा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू लागला. नशिबाने साथ दिल्याने त्याने जास्त पैसे कमावले. बेतोडा येथे जागा घेऊन घर बांधले व पत्नी आणि दोन मुलांसह तो त्या घरात राहायला लागला तर दोन बंधू ढवळी येथे भाड्याच्या खोलीत राहून काम करायचे. भावाने भरपूर कमाई केल्याने त्याने आपणालाही पैसे द्यावेत असा त्यांनी त्याच्या मागे तगादा लावला. त्याने त्यांना कष्ट करून पैसे कमावण्याचा सल्ला दिला. तो सल्ला न मानता हिरू व तारू हे दोघेही काल रात्री ८ च्या दरम्यान बेतोड्यात आले. परत बाचाबाची झाली. तारू याने सुरा काढून ठावरूवर भराभर वार करून त्याला यमसदनाला पाठवले. यावेळी मुलगे घरी नव्हते. पत्नीच होती. पोलिसांना खबर दिल्यानंतर तारूला अनमोड घाटात बसमध्ये पकडण्यात आले, तर हिरूला फर्मागुडी येथे अटक केली. अधिक चौकशीसाठी ६ दिवसांचा रिमांड घेण्यात आला आहे. निरीक्षक सी. एल. पाटील याप्रकरणी तपास करीत आहेत.