संयमातून आत्मशक्ती वाढवा!

0
32

योगसाधना- 587, अंतरंगयोग-172

  • डॉ. सीताकांत घाणेकर

या सर्व नकारात्मक गोष्टी बघितल्या की मन खंती होते. नैराश्य येते. त्यामुळे मानसिक व मनोदैहिक रोग बळावतात. अनेकजण व्यसनाधीन होतात. काहीजण आत्महत्या करतात.
या सर्वांवर एक उत्तम उपाय म्हणजे आध्यात्मिकतेकडे वळणे.

विश्वात एक सर्वसामान्य मान्यता आहे की भारत हा एक आध्यात्मिक देश आहे. तो जगाचा आध्यात्मिक गुरू आहे. खरेच आहे, कारण हजारो वर्षांपासून इतर पैलूंबरोबर कौटुंबिक, सामाजिक, भौतिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय वगैरे अनेक क्षेत्रांत त्याने आध्यात्माला प्राधान्य दिलेले आहे. सर्वजण- ऋषि-महर्षी, संत-महात्मे, गुरू-शिष्य, राजा-प्रजा, सुशिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब, पुरुष-महिला… या पैलूवर स्थिर होते. तसेच सर्वांना पटले होते की आध्यात्मिक पैलू जर व्यवस्थित शास्त्रशुद्ध रीतीने सांभाळला तर इतर सर्व पैलू आपोआप सांभाळले जातील.

हजारो वर्षे मानवी जीवन सर्वसामान्यपणे सुखी-समाधानी होते. याचे मूळ कारण म्हणजे त्यावेळची मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धती. मूल सहा वर्षांचे झाले की त्याचे विद्यार्थी-जीवन सुरू होत असे आणि तेदेखील घरापासून, कुटुंबापासून दूर निसर्गरम्य जंगलातील ठिकाणी ऋषींच्या आश्रमात; आणि शिक्षण म्हणजे जीवनविकासासाठी हे सर्वमान्य. त्याबरोबर जीविकेसाठी शिक्षण जरूर आवश्यक आहे, पण त्याला एवढे प्राधान्य नव्हते.

अवश्य अनेक समस्या वेळोवेळी येत होत्या. निसर्गाचा तो नियमच आहे. पण त्यांचा परिणाम क्षणिक होता. काही थोडेच त्यांच्यामुळे प्रभावित होत होते. म्हणूनच तर अनेक सत्‌‍पुरुषांचे आगमन होत असे. एवढेच नाही तर या पवित्र राष्ट्रात भगवंतालादेखील अवतार म्हणून यावे लागले.
दुर्भाग्याने आज सगळीकडे विचित्र वातावरण दिसत आहे. याला कारणे अनेक आहेत. ती अशी-
ह्न कलियुग चालू आहे. येथे रावणाचा- मायेचा प्रभाव जास्त असणार असे काहीजण मानतात.
ह्न भारत देशावर विविध शत्रूंकडून भयानक आक्रमणे झाली. अनेक चांगल्या-वाईट राजा-महाराजांनी या देशावर राज्य केले.
ह्न हल्लीच्या काही शतकांत पाश्चात्त्यांची राज्ये आली- पोर्तुगीज, इंग्लिश, फ्रेंच, डच…
एक आश्चर्य वाटते की एवढेसे छोटे हे देश आणि तेसुद्धा कितीतरी मैल दूर. आजच्यासारखी प्रवासाची वाहनेदेखील नव्हती. तरी ते येथे येऊन एवढ्या मोठ्या देशावर राज्य करतात…. आणि तोसुद्धा पवित्र, आध्यात्मिक, संत-महापुरुषांचा, राजे-महाराजांचा, शूरवीर-वीरांगनांचा… महान देश(!)
हल्ली एक प्रचलित मान्यता आहे, ती म्हणजे लॉर्ड मॅकोले. ते भारतात आले. त्यांनी भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला. संस्कृतीचा वारसा बघितला आणि त्यांना दृष्टांत झाला- भारतीय संस्कृती फार जुनी आहे. सर्वजण या सांस्कृतिक मूल्यांचे प्रेमाने, आदराने पालन करतात. इतिहासातील मोठमोठ्या लोकांचा इतिहास शिकतात. त्यांच्या अनेक धर्मग्रंथांचा नियमित अभ्यास करतात- वेद, उपनिषद, श्रीमद्‌‍ भगवद्गीता, पुराणे… वगैरे. त्याशिवाय रामायण, महाभारत, भागवत… यांसारखी महाकाव्ये. भाषा जरी अनेक व वेगळ्या असल्या तरी मूळ भाषासंस्कृत आहे. ती सर्वांची जननी आहे. सर्वांची व्रतवैकल्ये, सण- विवाहपद्धती… एकच आहे. थोडाफार फरक सोडून.
सारांश, यांची संस्कृती हा कणा आहे. तो सांस्कृतिक कणा मोडला, गैरसमज निर्माण केले तर त्यांची एकजूट तुटेल आणि आम्हाला राज्य करायला सोपे जाईल. तसेच इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा आहे. ती शिकल्यास त्यांचे सर्व व्यवहार व्यवस्थित होतील. देशाला जगाची मान्यता मिळेल. नागरिकांचा विकास होईल. इतिहासकार सांगतात की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांनी तसे भाषण केले. तशी नोंददेखील आहे.

त्यानंतर आपली शिक्षणाची भाषा बदलली. हळूहळू पाश्चात्त्य संस्कृती श्रेष्ठ वाटायला लागली आणि देशाची अधोगती सुरू झाली. आणि सध्याची स्थिती सर्वांनाच माहीत आहे.
ह्न एकत्र कुटुंबपद्धती ः भारताची शान होती, भूषण होती. हळूहळू ती कोलमडायला लागली. आता ‘हम दो, हमारे दो’ हेच चांगले वाटायला लागले.
ह्न कुटुंब ः प्रेम, आत्मीय संबंध, वडिलांचा आदर, समर्पण… असे अनेक संस्कार सहज होत असत. आता वडीलधाऱ्यांना ठेवण्यासाठी वृद्धाश्रमांची गरज वाढते आहे.
ह्न पती-पत्नी ः या दोघांचे संबंध पवित्र होते. आत्मीयतेचे, सहयोग करण्याचे होते. एकमेकांवर विश्वास होता. आता स्त्री-पुरुषांच्या संबंधावर संशय वाढत आहे. विवाह, सप्तपदी हे सर्व नावापुरतेच असलेले दिसतात. घटस्फोट वाढताहेत.
ह्न आत्मिक सुख हे अत्यंत उच्च सुख आहे. त्यात आध्यात्मिकता आहे. त्याऐवजी इंद्रियसुख हेच परमानंद देणारे आहे असा गैरसमज वाढला. त्यामुळे विविध समस्या वाढल्या.
ह्न धन, पद, प्रतिष्ठा यांनाच जास्त महत्त्व आहे. त्यामुळे स्वार्थ वाढला. व्यक्ती आत्मकेंद्री झाल्या.

ह्न शिक्षण जीविकेचे साधन बनले. जीवनमूल्ये, जीवनविकास बाजूला राहिला.
ह्न व्रतवैकल्ये, सण, उत्सव हे फक्त मौजमस्तीसाठीच आहेत ही समज वाढली. त्यामागील सखोल तत्त्वज्ञान बाजूला राहिले.
ह्न इतरांचे गुण बघण्याऐवजी दोष बघायला सुरुवात झाली. त्यामुळे जीवनातील माधुर्य संपायला लागले.
ह्न माणसांची भाषा बदलली. समंजसपणा कमी होऊन त्याऐवजी कटूता वाढली. सर्प जसा फुत्कार करतो तसे अपशब्दच जास्त ऐकायला यायला लागले.
या सर्व नकारात्मक गोष्टी बघितल्या की मन खंती होते. नैराश्य येते. त्यामुळे मानसिक व मनोदैहिक रोग बळावतात. अनेकजण व्यसनाधीन होतात. काहीजण आत्महत्या करतात.
या सर्वांवर एक उत्तम उपाय म्हणजे आध्यात्मिकतेकडे वळणे. या अंतर्येागाच्या सदरात आपण हाच विचार करीत आहोत.
ह्न आत्म्याचे सात गुण ः पवित्रता, ज्ञान, सत्यता, प्रेम, शांती, सुख, आनंद… यांचा विचार आपण करतो आहोत. असे केल्याने आत्मशक्ती वाढते. आज आपण शरीराची शक्ती वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. शारीरिक शक्ती वाढवायलाच हवी, पण त्याबरोबर आत्मिक शक्तीवरही विचार हवा.
आत्मा किती शक्तिवान आहे त्याचे स्थूल उदाहरण म्हणजे- ज्यावेळी आत्मा शरीरात असतो त्यावेळी जास्त वजन असलेली व्यक्ती सहज चालते, पळते, पायऱ्या किंवा डोंगर चढते. पण ज्यावेळी आत्मा शरीरातून निघून जातो, म्हणजे मृत्यू येतो, त्यावेळी त्या मृत शरीराला सरळ मार्गावर उचलून नेताना चारसहा धडधाकट माणसे लागतात. तेदेखील थोडे चालले की थकतात. त्यांना थोडी विश्रांतीची गरज भासते.

आत्मशक्तीची वाढ करण्यासाठी काय करायला हवे हे आपण बघतो आहोत. प्रत्येक प्रसंगात आपल्या अष्टशक्तींचा उपयोग केला तर कुठल्याही समस्येला योग्य समाधान मिळते.
त्यातील सर्वात पहिली शक्ती म्हणजे संयम ठेवून माघार घेणे. अनेकवेळा अहंकारामुळे मनात सहज विचार येतो की प्रत्येकवेळी मीच माघार का घ्यावी, मीच संयम का ठेवावा? याचे कारण म्हणजे संयमानंतरच्या सर्व शक्ती- समेट, सहन, सामावणे, परख, निर्णय, सामना, सहयोग… आपोआप वापरू शकतो.
संयम न ठेवल्यामुळे एक अपशब्द जरी मुखातून निघाला तरी परिस्थिती चिघळते. त्यावेळी आपल्यातील शकुनी जागृत होतो. महाभारत घडू शकते. रामायणातदेखील मंथरा आहे- रामाला वनवासात पाठवायला. पण तिथे शांत, संयमी राम आहे. त्यामुळे चारही भावांमधील प्रेम आदर्श आहे. प्रत्येकाने ठरवायचे- माझ्या जीवनात रामायण हवे की महाभारत?
यासाठीच आध्यात्मिक साधनेत ध्यान कसे उत्कृष्ट आहे हे सांगितले जाते. आत्मशक्ती कमी झाली की लगेच भगवंताशी जोडून त्याच्या सर्व शक्ती आपल्यात आणायच्या- जसा मोबाईल चार्ज करतो तसा. योगसाधक हेच करत असतील.

एक मुद्दा मुद्दाम नोंद करावा असे वाटते. पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये अनेक चांगल्या गोष्टी, संस्कार आहेत. त्यांच्या नियमितता, वेळेचे व्यवस्थापन, साफसफाई, रस्त्यावरील शिस्त, संस्कृतीप्रेम, भाषेचा अभिमान… या गोष्टी आपण का घेत नाही. खरे म्हणजे कुठल्याही समस्येला दुसऱ्याला जबाबदार ठरवणे हा आपला संस्कारच झाला आहे का?
पाश्चात्त्यांनी योगशास्त्र, आयुर्वेद, वेद, उपनिषदे, गीता यांचा अभ्यास सुरू केलेला आहे. मग आपण मागे कसे राहू?
(संदर्भ ः प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांचे साहित्य)