‘भारत जोडो’चे फलित

0
23

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गेले पाच महिने चाललेल्या ‘भारत जोडो यात्रे’ची काल श्रीनगरमध्ये जोरदार हिमवृष्टीच्या साथीने नाट्यमय सांगता झाली. गेल्या सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर हा 3970 कि. मी. चा प्रदीर्घ पल्ला बारा राज्ये आणि दोन संघप्रदेशांतून पार करून राहुल यांनी ही यात्रा निर्धाराने पूर्ण केली, हीच मोठी गोष्ट आहे, कारण राहुल यांची आजवरची राजकारणातील ‘हिट अँड रन’ वृत्ती पाहता ते खरोखर ही एवढी मोठी यात्रा पूर्ण करतील का, याविषयीच शंका घेतली जात होती. यात्रा अर्ध्यावर सोडून ते इटलीला सुटीवर निघून जाण्याचीच अधिक शक्यता व्यक्त होत होती, परंतु त्यांनी निर्धाराने आपली ही यात्रा पूर्ण केली. राहुल यांच्या या यात्रेला बहुतेक राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी देणे टाळले. तसे केल्याने केंद्रातील मोदी सरकारची नाराजी ओढवेल अशी भीती बहुधा माध्यमांच्या मनात असावी, परंतु ज्या राज्यांतून ही यात्रा गेली, तेथील लोकांचा मोठा सहभाग या यात्रेत सतत राहिला. ही गर्दी जशी राहुल गांधींना बघण्यासाठी जमत होती, तशीच भाजप – संघविरोधी मंडळींचेही एकत्रीकरण यानिमित्ताने होत असल्याचे दिसत होते. बहुतेक विरोधी पक्षांनीही या यात्रेत अधूनमधून सहभाग घेतला. ‘देशाचा पाया कमकुवत करणाऱ्या विचारधारेच्या विरोधात’ ही यात्रा असल्याचे राहुल सतत सांगत राहिले आणि त्यामुळे ठिकठिकाणी तिला भाजप व संघविरोधकांचा मोठा पाठिंबाही मिळत राहिला. कालच्या समारोप सोहळ्याची निमंत्रणेही 21 विरोधी पक्षांना गेलेली होती आणि त्यापैकी 12 पक्षांनी ती स्वीकारहीही होती, परंतु कालच्या हिमवृष्टीने यात्रेच्या समारोपाचे सगळे नियोजन कोलमडले हा वेगळा भाग. या प्रदीर्घ पदयात्रेतून राहुल यांनी नेमके काय साधले हा आता लाखमोलाचा प्रश्न मागे उरतो.
ही यात्रा राजकीय नसून देश जोडण्यासाठी असल्याचे राहुल गांधी सुरवातीपासून सांगत आले, मात्र, एकूण मोदी-भाजप-संघविरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न असेच तिचे स्वरूप राहिले. ज्या 272 व्यक्तींशी पदयात्रेत चालता चालता आणि 100 जणांशी बैठकांतून राहुल यांनी संवाद साधला, त्यातून हाच संदेश दिला गेला. त्यामुळे यात्रेचे स्वरूप कितीही उदात्त दर्शवण्याचा प्रयत्न झाला तरी ते शेवटी राजकीयच होते. जी नऊ राज्ये या वर्षी निवडणुकीला सामोरी जाणार आहेत, त्यापैकी चार राज्यांतून ही यात्रा गेली. शिवाय पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूकही होणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष अजूनही अस्तित्वात आहे आणि आजही भाजपचा तोच प्रमुख प्रतिस्पर्धी आहे हे ठसवण्याचा जोरदार प्रयास राहुल यांनी या यात्रेद्वारे केला. त्यात त्यांना किती यश लाभले आहे हे आगामी निवडणुकांतून दिसेलच, परंतु सततच्या गळतीमुळे आणि भाजप श्रेष्ठी ठिकठिकाणी घडवून आणत असलेल्या आमदार खरेदी अभियानामुळे मनोबल खच्ची झालेल्या काँग्रेसजनांमध्ये थोडीफार ऊर्जा या यात्रेने निश्चितच दिली असेल. वास्तविक, राहुल यांच्याकडे सध्या पक्षाचे कोणतेही महत्त्वाचे पद नाही. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत अमेठीत ते पराभूत झाले होते व वायनाडने त्यांची लाज राखली होती. त्यामुळे पक्षाचे वायनाडचे खासदार हेेच त्यांचे पक्षातील सध्याचे अधिकृत स्थान आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपवण्यात आलेली असल्याने पक्षाचे भावी अध्यक्ष म्हणून त्यांचे जे नाव घेतले जात होते, तेही निकाली निघाले आहे. आता या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल यांचे नाव पुढे आणण्यासाठी या यात्रेचा उपयोग होणार आहे का, त्यासाठी राहुल समर्थक यापुढे आग्रह धरणार का, हे आता पहावे लागेल. राहुल यांच्या खात्यात या यात्रेच्या यशाची भर निश्चितपणे पडली आहे. राहुल यांनी सध्या सांताक्लॉजसारखी दाढी वाढवली आहे खरी, परंतु नरेंद्र मोदींसारख्या बलाढ्य नेत्याचा सामना करण्याएवढे परिपक्वता दर्शवणारे व्यक्तिमत्त्व त्यांनी या यात्रेच्या अनुभवानंतर तरी कमावले आहे का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. खरे पाहता, काँग्रेस पक्ष सध्याच्या अवनतीस पोहोचण्यास राहुल गांधीच अधिक जबाबदार आहेत. त्यांच्याच अनिश्चिततेच्या कार्यपद्धतीला कंटाळून बहुतेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि सततच्या निवडणुकांतून पक्षाची धूळधाण होत राहिली. त्यामुळे आता या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर ते पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतील का, समस्त विरोधकांचे नेतृत्व स्वतःकडे आणि स्वतःच्या पक्षाकडे घेऊ शकतील का या प्रश्नांचे उत्तर अजूनही नकारार्थीच मिळते. विरोधक अजूनही एकत्र येण्याच्या स्थितीत नाहीत आणि सद्यपरिस्थितीत काँग्रेसकडे नेतृत्व सोपवण्याचा तर विचारही कोणाच्या मनाला शिवणार नाही. राहुल यांचे त्यांच्याच पक्षातून ढळत चाललेले स्थान या यात्रेनंतर घट्ट होईल एवढेच.