Home बातम्या संकल्प गुढीपाडव्याचा : संस्कार-संस्कृती, नवविचार रुजविण्याचा

संकल्प गुढीपाडव्याचा : संस्कार-संस्कृती, नवविचार रुजविण्याचा

0

सौ. पौर्णिमा केरकर

शिशिर असो की वसंत, ऋतुचक्राचे फिरते वैभव डोळ्यांना कृतार्थतेचा कौल मिळवून देणारे ठरते. जणू काही जीवनाच्या या वाटावळणांवर ऋतू फुलारून येत मानवी जगण्याच्या दुखर्‍या नसांवर फुंकर घालतात. शिशिरातला गारठा हवेत, वातावरणात थंडावा बहाल करणारा. फाल्गुनातल्या लोकोत्सवाचा उत्स्फूर्त आविष्कार निसर्गाला वेढून राहतो, न राहतो तोच नव्या उन्मेषाने, नवपल्लवाने तरारून चैत्र समोर ठाकतो. जगण्याच्या लगबगीत सगळेच ऋतू कसे पटकन निसटून जातात. असे असले तरी चैत्राची गुढी पुनर्निर्माणासाठी सज्ज होत राहते. वर्षानुवर्षे सौंदर्य, प्रेम, आशा, त्याग, संस्कृती, सेवाआणखीही अनेक घटक जगण्याला नवे अर्थ देणारेस्वतःत सामावून घेत गुढी उंचच उंच उभारली जाते. आपल्या संस्कृतीत चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच वर्षप्रतिपदा गुढीपाडवाम्हणूनच प्रसिद्ध आहे.

नववर्षारंभ याच दिवसापासून सुरू होतो. हीच आपली परंपरा मानली जाते. वातावरणात पावित्र्य, मांगल्य भरून राहिलेले असते. गावागावांतील मंदिरांच्या सभागृहात ब्रह्मपूजा, पंचांगवाचन, इतरही अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात. पहाटे उठून सडासंमार्जन करून लांब दांड्याला आंब्याची पाने, फुले, रेशमी लाल किंवा भगवे वस्त्र गुंडाळून त्यावर उलटा कलश ठेवून त्याची गुढी उभारली जाते. घरावर, मंदिरावर उंच ठिकाणी नाहीतर काहीजण तुळशीवृंदावनात गुढी उभारतात. त्या दिवशी घरात गोडधोडाचे जेवण ठरलेले असते. इतरही अनेक धार्मिक पवित्र कामे याचदिवशी करण्याचा प्रघात आहे. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला गेलेला एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. अभ्यंगस्नान, गुढी उभारणे, कडुनिंबाची पाने खाणे, पंचांगाचे वाचन करणे, त्यावर श्रवण, मनन, चिंतन करीत समाधान प्राप्त करणे, अशा अनेक वैविध्यपूर्ण रीतीरिवाजांनी, परंपरांनी वेढलेला हा महिना. नववर्षाची सुरुवात करणारामंगलमयीपावित्र्य, सेवा, शुचिता, नवता टिकवणारा म्हणूनच संस्कारसंपन्न असा. सर्वांंगसुंदर लोकाविष्काराने नटलेला….

ऋतूंचे बदलणे सर्जनशीलतेची साक्ष पटविणारे. फाल्गुनात तर नैसर्गिक रंगाविष्काराला उधाणच आलेले असते. पळस, पंगारा, शाल्मली फांद्यातून फुटलेली. रणरणत्या उन्हात दूर कोठेतरी आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर त्याच्याशी हितगुज करू पाहणारी लालभडक केशरी फुले अनुभवताना चैत्र आपली गुढी उभारत नवपल्लवांनी, फळाफुलांनी या धरित्रीला शृंगारण्यासाठी जणू सज्ज झालेला आहे हेच कळून चुकते. दैनंदिनच्या रहाटगाडग्यातून थोडीशी उसंत घेत भर दुपारीसुद्धा या लालभडक केशरी फुलांकडे पाहताना थकवा कोठल्या कोठे नाहीसा झाल्याखेरीज राहणार नाही. इथे तर माणसांना माणसांशी संवाद साधायला फुरसद नाही; तिथे निसर्ग तर दूरच! आधुनिक जाणिवांत जरी हा संवाद समरसतेने साधला जात नसला तरी लोकपरंपरा मात्र समर्पित भावनांनी संस्कारसंस्कृतीची गुढी उंचच उंच उभारताना दिसतात. म्हणूनच गुढीपाडवा म्हटले की आठवते गावडोंगरी काणकोणची दिंड्याजत्रा. दिंडी म्हणजेच अविवाहित युवक. ‘दिण्यादेवअसे त्यांच्या देवाला संबोधले जाते. दिंडो असलेल्या प्रत्येक घरात पाडव्याच्या पहिल्या दिवसाच्या दुपारी दिण्याची काठी आणून ती अंगणातच ठेवली जाते. दिण्याची पाने व फुलांनी आकर्षक छत्रीसदृश त्या काठीची सजावट केली जाते. ही दिण्याबडी देवाच्या तरंगाप्रमाणेच तर दिसते. चुडतापासून जत्रेतील छत्री बनवली जाते. त्या दिवशी न्हाऊन धुऊन दिंड्याने या सजवलेल्या काठीला अंगणात आणून नैवेद्य दाखवावा लागतो. संध्याकाळी मात्र वाड्यावाड्यांवरील दिंडे आपापल्या सजवलेल्या काठ्या, दिंडे, मानी घेऊनच घरातून बाहेर पडतात. नाचत नाचत जातात. पाण्याने भरलेली कळशी व त्यावर गूळ ठेवलेला असतो, ते प्राशन करून तेथेच सजविलेल्या काठ्या, मानी ठेवून ते झोपी जातात. त्या रात्री त्यांना उपासच घडतो. रात्रभर केळीच्या अथवा देवकेळीच्या पानावर ठेवलेला दिंडो पडता कामा नये, असा दंडक आहे. वादन हे जाणत्याकडे असते. जत्रेत सहभागी होऊन दिंड्याबडी मोडून लग्नासाठीची त्याची सक्षमता तो दाखवतो व त्यानंतर तो विवाहयोग्य होतो हा संकेत. गूळकातळीचा प्रसाद भक्षण करून, आशीर्वाद प्राप्त करून घेतो आणि एकदा त्याचे लग्न झाले की मग मात्र त्याने या जत्रेत भाग घ्यायचा नसतो. प्रसादही खायचा नसतो. लग्नानंतरच सृजनात्मकतेला प्रारंभ होतो. ही निर्मिती प्रक्रिया नैसर्गिक. माणूस, निसर्ग आणि माणसानंच निर्माण केलेल्या सणउत्सवांच्या या परंपरा त्यातील आदिम तत्त्वासकट आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वीकारल्या तर त्यातील मर्म उलगडते.

चैत्रातील पानाफुलांचे वैभव तर गुढीचे स्वागत करण्यासाठीच सज्ज झालेले दिसते. एका वेगळ्या सुगंधाने, वसंतवैभवाने रानेवने भरलेली असतात. प्रसन्न सकाळी कोकीळ कुहूकुहू साद घालतो तेव्हा वातावरणातील प्रसन्नता अधिकच प्रज्वलित होते. मार्गशीर्षातला आंबेमोहोर, काजूमोहोर चैत्रात फळाला आलेला असतो. पौषात धालोत्सवात म्हटल्या जाणार्‍या गीतांची चैत्रात प्रचिती आल्यावाचून राहत नाही.

दारातला आंबा गे तवरानी डोले गे

धरतरी माता माणार येता परसादी बोले गे

नाहीतर मग

दारातले मिरयेली गे मिरया जालो भार गे

रवळनाथ देव माणार येता घोडे सत्रे कार गे

आंबे, काजू, जांभूळ, हुस्की, फणस, माड, मिरवेल…. सार्‍यासार्‍यांना बहर येतो तो याच महिन्यात. चैत्रात तर गुढी फिरवण्यासाठीच जणू काही तो सज्ज झालेला असतो. कच्च्या कैर्‍या खारवण्यासाठी सज्ज असतात. खरं तर निसर्गाच्या या ऋतुचक्रातच सर्जनशीलतेची गुढी सामावलेली असते. म्हणूनच ठिकठिकाणचे फाल्गुनातले लोकोत्सव हे चैत्रातल्या निर्मितीची पूर्वप्रक्रिया असते. सांग्यातील शिडियोत्सव असो, नाहीतर गुढीपाडव्याला ठिकठिकाणी होणारे रणमालेहा लोकनाट्यप्रकार असो; यातून सृजनक्रियेच्या स्वागताचीच तयारी दिसते. आपल्या भव्यदिव्य आणि सुंदरसमृद्ध प्राचीन संस्कृतीचा स्पर्श घडविणारे हे उत्सव त्याच्या मूळ जाणिवांसकट स्वीकारले तर आतील गाठ उकलत जाते. नाहीतर मग ते वरवरचे उसने वैभव ठरते. याच महिन्यात पिंपळवृक्षाला फुटलेली लालपोपटी पालवी, उन्हातली त्याची गुलाबी सळसळ ऋतूला सतेज करते. अशा सणउत्सवांच्या माध्यमातूनसुद्धा मरगळलेपणा नष्ट होऊन चैतन्याची प्राप्ती होते. त्यासाठी घराघरांत प्राथमिक स्तरावर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्व घर स्वच्छ केले जाते. शुचिर्भूत होऊन अंगणात रांगोळी घातली जाते. काही ठिकाणी तर शिवरात्रीला तुळशीवृंदावनात बांधलेली गळटीलहानसे तांब्याचे अथवा पितळीचे भांडे पूजा करून सोडविले जाते. तांब्याचा कलश आंब्याच्या पानांनी, फुलांनी सजवून गंधपूजा करून काठीवर लालभगवे कापड घालून त्यावर तांब्या तोंडाच्या बाजूने ठेवून घराघरांवर, दारात, उंचावर गुढी उभारली जाते. मांगल्याचे, पावित्र्याचे तर ते प्रतीक आहेच, त्याबरोबरीनेच समानतेचे, वैचारिक उन्नतीचेही ते प्रतीक असल्याने नवविचारांची, गुढी नवनिर्माणासाठी उभारली तर त्याचा एक वेगळा संदर्भ जगण्यात मिसळून जाईल.

ऋतूचे लावण्य मन भुलविणारे, हृदय खुलवणारे, या मातीचाच उत्सव साजरे करणारे. ढोल ताशांच्या गजरात वीरश्रीचा संचार घोडेमोडणीत दिसतो, तर तालगडी रोमटामेळांचा पदन्यास तनामनाला मोहून टाकतो. ही सारीच संस्कृती येणार्‍या पिढीसाठी टिकवून ठेवण्याची. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उभारली तर त्याच्यातील उन्नती ठळकपणे नजरेत येईल. गुढीपाडव्याचा हा उत्सव मनामनांचे बंध जोपासत वसंत ऋतूला खुणाविणारा. वसंताचे वैभव अनुभवायचे तर या ऋतूशिवाय पर्याय नाही. म्हणूनच की काय सार्‍या रंग, रूप, गंध, रसांची गुढी उभारणाराच ठरतो. चैत्रातला गुढीपाडवा वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देणारा आहे. हे फुलापानांच्या टवटवीतपणामुळेच जाणता येते. पिंपळपानांची गुलाबी सळसळ, फणसांच्या झाडांचे कुवले, कांदळा, वोवळां, सुरंगांचा बहर, पानाआडून खुणावणारे मोगरीचे टपोरे कळे, याच पार्श्‍वभूमीवर सरळसोटपणे आकाशाशी स्पर्धा करू पाहणारे माडसुद्धा आपली चांदण्यासदृश टणक छोटी छोटी फुले खाली ओघळवितात तेव्हा चैत्राच्या स्वागतासाठी ती जणू काही स्वतःचेही योगदान देत असावी असे वाटल्यावाचून राहत नाही. चैत्रसखा वसंत याविषयी ज्ञानाई म्हणते,

पै वसंताचे रिगवणे

झाडांचेनि साजेपणें

जाणजे तेवीं करणे|

सांगती ज्ञान॥

टवटवीतपणा, सर्वत्र हर्षोल्लास, आनंद हे जसे वसंताचे प्रतीक आहे तसेच ज्ञानवंत माणसाचे ज्ञान त्याच्या वर्तनातून कळते. समृद्ध निसर्गाचे ते चिन्ह आहे. जीवन जगत असताना अवतीभोवती वावरताना हे सारेच सण, उत्सव, परंपरा आपल्याला जगण्यासाठी आणि तेही सकारात्मक जगण्यासाठी वाट मोकळी करून देतात. माणूस हा जात्याच उत्सवप्रिय आहे. वर्षाचे बाराही महिने, सर्व ऋतूंत कसल्या ना कसल्यातरी सणउत्सवात तो स्वतःला गुंतवून ठेवतो. ‘गुढीपाडवाहा तर सर्व सणउत्सवांचा मुहूर्त. एकदा वर्षारंभी परंपरा, संस्कारांची गुढी उभारली की मग मागाहून फाल्गुनातली रंगवैभवाने होळीच्या आनंदात येणार्‍या नवपर्वाचे स्वागत करीतच पूर्णविराम घेते. फाल्गुनातील फुलांचे पानांशी तसे वैरच पत्करलेले. रणरणत्या उन्हात पुरती पानगळती होऊन शाल्मली फुलते ती परत पोपटी लवलव अंगाखांद्यावर मिरवीत चैत्रातच. गुढीपाडव्यासाठीच सज्ज होते.

गुढीपाडवाखरंतर वैश्‍विक सृजनत्व जोपासणारा उत्सव. हिंदू नववर्षाचा प्रारंभ. नवे वर्ष, नवे संकल्प, नवविचार घेऊन पुढे जातानाचे सत्य हे काळीजवेध घेणारे. खरेतर निसर्ग तोच आहे; परंतु माणसाचे जगणे आता शहरी झालेले आहे. जीवनाचा हेतूसुद्धा बदललेला आहे. ऋतू कोणताही असू दे, आपल्याला तो खुणावतोच आहे. स्वतःमध्ये एकरूप करून घेतो. संध्याकाळचे क्षितिजापल्याडचे रंग आजही आपल्याला आकर्षित करतात. अति उष्णतेत तर वार्‍याची झुळूक आपल्या अंगागाला स्पर्श करून जावी असे प्रकर्षाने वाटते. पावसाच्या सरींचे काव्य तर सर्वदूरपर्यंत सृजनगंध पसरविणारे ठरते. वाहणार्‍या नद्या, गर्जणारा सागर, खळाळणारे झरे, किलबिलणारे पक्षी, हे सारेच आपल्याला आजच्या परिस्थितीतही हवेहवेसे वाटणारे. सणउत्सव तरी याला अपवाद कसे असणार? त्यातही गुढीपाडवा तर नववर्षाची, नवसंकल्पांची सुरुवातच. या दिवसाला आपल्या संस्कृतीत आगळेवेगळे महत्त्व आहे. काही कथासुद्धा त्याला चिकटलेल्या आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करायला याचदिवशी सुरुवात केली. रावणाचा वध करून श्रीरामचंद्र सीता व लक्ष्मणासह अयोध्येत परतले तो दिवसही वर्ष प्रतिपदेचाच होता असे मानले जाते. त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी गुढ्यातोरणे उभारण्यात आली होेती. गुढी उभारण्याच्या परंपरेविषयी तर एक दंतकथाही सांगितली जाते. ‘वसूहा चेदी देशाचा राजा. त्याच्या तपश्‍चर्येने देव प्रसन्न झाला. त्याच्यासाठी देवाने आशीर्वाद म्हणून वैजयंती माला, विमान आणि राजदंड दिला. राजदंडाला जरतारीचे वस्त्र बांधून त्यावर सोन्याची लोटी ठेवली. पूजा केली. त्यावेळेपासून गुढीची सुरुवात झाली असे मानले जाते. सणासुदीला गोड पक्वान्ने खाल्ली की अपचन होते, म्हणून कडुनिंबाचा रस सेवन करण्याची प्रथा आहे. जगण्यात सर्वच काही गोडगोड असता कामा नये, त्यात थोडासा कडवटपणाही असायला हवा हा संदेशच जणू काही कडुनिंबाचा रस प्राशन करण्यामागे असावा. खरं तर माणसे आपल्या सवडीचा वेळ कसा घालवतात त्यावरून त्याची संस्कृती कळते. समाजातील सणउत्सवांवरून त्यातील चित्र स्पष्ट होते. माणसे नुसतीच अन्नावर जगत नसतात तर त्यांचे सकस आत्मभान जागे करण्यासाठी संस्कृतीसुद्धा गरजेची असते.

गुढीपाडव्यासारखे सणउत्सव मानवी जीवन उन्नत, समृद्ध करतात. शरीराबरोबर आपल्याला असलेल्या मनाची ती गरज आहे. हे आपल्याला जितक्या लवकर समजेल तेवढे ते उपयोगी ठरेल. सत्तरीतील पर्ये गावची भूमिका ही साठा सत्तरीची देवी म्हणून उल्लेख केलेला आढळतो. सत्तरपेक्षा जास्त गाव जरी उपलब्ध असले तरीही एकेकाळचे गुढीपाडव्याचे वैभव काही वेगळेच होते. सत्तरी, सांगे, फोंडा, डिचोली या तालुक्यांतील काही गाव विखुरलेले आहेत. इथेच गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री पर्येतील बारा वाड्यांवरील लोक एकत्रित जमून ढोलताशांच्या गजरात जुन्या वर्षाला निरोप देऊन नावीन्याची गुढी उभारली जायची व साखळीला सप्तशतीला शरण जाणे व्हायचे. अशा तर्‍हेने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाला पावित्र्याने सामोरे जाणे होई. तो उल्हास, आनंद, निरलसता लोप पावलेली दिसते. जुन्यातले चांगले ते कण वेचून त्यांना गाठीशी बांधून नावीन्याचा ध्यास घेत पुढे जाणे ही आपली प्रत्येकाचीच वृत्ती हवी. हे असे झाले तरच नवसंकल्पाची, नवविचारांची गुढी येणार्‍या प्रत्येक पिढीला मार्गदर्शक ठरेल. बाराही महिने कसले ना कसले सणउत्सव चालू असलेल्या आपल्या संस्कृतीत विचारांचा, नीतिमूल्यांचा फार मोठा खजिना भरलेला आहे. त्यात निव्वळ मनोरंजन नाही तर जगण्याची, आचरणाची नैतिकता आहे. समूहाने जगण्याची, वागण्याची शिस्त आहे. ऋतूऋतूंत पालटणारे निसर्गवैभव आणि त्याच पार्श्‍वभूमीवर येणारे सणउत्सव हे या मातीतीलच सृजनोत्सवाचे प्रतीक आहेत. त्यासाठीची सर्जकता, आधुनिकता, विचारांची प्रगल्भता आणि आचरणातली शुचिता यांचा ध्यास बाळगून गुढीचे पावित्र्य टिकवण्याचा संकल्प मनामनांत रुजवूया!