व्यंकय्या नायडू यांची उपस्थिती
खासदार श्रीपाद नाईक यांचा उद्या १८ रोजी नागरी सत्कार होत असून पक्षाच्या केंद्रीय नेत्या सुषमा स्वराज यांच्याऐवजी पक्षाचे नेते व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते होणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
काही अपरिहार्य कारणामुळे स्वराज या सत्कार सोहळ्याला हजर राहू शकणार नसल्याने कार्यक्रमात वरील बदल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संध्याकाळी ४.३० वा. होऊ घातलेला हा सत्कार सोहळा ७.३० वा. संपणार असून कार्यक्रमाला हजर राहणार्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
या सत्कार सोहळ्याला गोवाभरातून सुमारे १५ हजार लोक उपस्थित राहणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. सत्कार सोहळ्याला येणार्या लोकांनी येताना हार-तुरे आणू नयेत. त्याऐवजी तेथे ठेवण्यात येणार्या फंडपेटीत उत्तराखंड येथील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून आपणाला शक्य तेवढे पैसे टाकावेत असे आवाहन पर्रीकर यांनी केले आहे. ‘साग’ मैदानावर हा सत्कार सोहळा होणार असून अतिमहनीय व्यक्तींच्या गाड्या व्यासपीठाच्या मागे उभ्या करण्याची सोय करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे केंद्रीय नेते काही राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे व्यस्त असल्याने नायडू सोडल्यास अन्य नेते सत्कारास हजर राहू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या व्यासपीठाचा राजकीय प्रचारासाठी वापर केला जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.