शाळिग्राम शिळेत कोरले जाणार भगवान श्रीराम

0
7

>> नेपाळच्या पवित्र कालिगंडकी नदीतील शिळा 31 जानेवारीला अयोध्येत दाखल होणार

अयोध्येत बनत असलेल्या भव्य राम मंदिर निर्मितीत नेपाळ मोठे योगदान देणार आहे. श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळमधील कालिगंडकी नदीतील दोन मोठ्या शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जाणार आहेत. नेपाळमधील कालिगंडकी नदीतून 350 ते 400 टन वजनाचा मोठ्या शाळिग्राम शिळा 31 जानेवारी रोजी अयोध्येत पाठवल्या जाणार आहेत. जनकपूर येथे 30 जानेवारी रोजी या शिळांची चाचणी होणार आहे. त्यानंतर रस्त्याने या शिळा अयोध्येला रवाना होतील.

तसेच या भव्य राम मंदिर निर्मितीत नेपाळचे जनकपूरमधील जानकी मंदिर देखील योगदान देणार आहे. जानकी मंदिराशी संबंधित लोकांनी श्रीरामासाठी धनुष्य बनवून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात 30 जुलै रोजी नेपाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विमलेंद्र निधी आणि जानकी मंदिर जनकपूरचे महंत रामतापेश्वर दास यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ नेपाळी जनतेच्या वतीने अयोध्येत जाऊन चंपत राय, स्वामी गोविंददेव गिरी आणि बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांना भेटले होते.

नेपाळी जनतेच्या भावनांचा आदर करत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने कालिगंडकी नदीतून शिळा मागवण्यासाठी जानकी मंदिर प्रशासनाला पत्र लिहिले होते. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांच्या वतीने जानकी माता मंदिराला कालिगंडकी नदीतील शिळा आणि श्री रामाचा धनुष्य देण्याची विनंती मान्य करण्यात आली आहे.
आता नेपाळमधील कालिगंडकी नदीतून शिळा शोधून बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. कालिगंडकी नदीच्या काठावर मंत्रोच्चारासह शिळेची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी तिथले राज्यपाल, मुख्यमंत्री, जानकी मंदिराचे पुजारी आणि अयोध्येहून नेपाळला गेलेले विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्र पंकज सहभागी झाले होते.