राजधानी पणजीतील खोदकामे 15 मार्चपर्यंत बंद करा

0
9

>> जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची मनपाला सूचना

येत्या एप्रिल 2023 या महिन्यापासून गोव्यात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पणजी महानगरपालिका प्रशासनाला स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राजधानी पणजीत सुरू असलेली सर्व कामे येत्या 15 मार्चला थांबवण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे.
राज्यात जी-20 शिखर परिषदेच्या एकूण आठ बैठका होणार आहेत. येत्या 17 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत होणाऱ्या जी-20च्या हेल्थ वर्किंग ग्रुपच्या बैठकीने गोव्यातील बैठकांना सुरुवात होणार आहे.

पणजी राजधानीमध्ये भूमिगत मलनिस्सारण वाहिनी, गॅसवाहिनी घालण्याच्या कामामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर खोदकाम करून काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी योजनेखालील कामांमुळे रस्त्यावर खोदकाम केले जात आहे.
पणजी महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामे येत्या 15 मार्चपर्यंत थांबविण्यात येणार आहेत. त्यानंतर शहरातील खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे. शहरातील विकासकामे सहा ते आठ महिने स्थगित ठेवली जाणार आहेत, असे महापौर रोहित मोन्सेरात
यांनी सांगितले.