– श्रीवल्लभ कारे
म्हणता म्हणता विद्यार्थी वर्गाच्या परीक्षा एक तर संपल्या किंवा संपत आल्या. आता दिवस उन्हाळी सुट्टीचे… तेव्हा बहुतेकांना सुट्टीतील भ्रमंतीचे आणि मौजमजेचे वेध लागलेले असल्यास नवल ते काय? कारण आजच्या आपल्या जीवन पद्धतीचा तो एक भागच बनलेला आहे. तर विद्यार्थ्यांबरोबरच घरातील वडीलधार्या आणि नोकरदार व्यक्तींना ’रेस्ट अँड रेक्युपरेशन’साठी काही दिवसांची रजा घेऊन ’लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन’ किंवा ’लिव्ह फॉर कन्सेशन’ च्या नावाखाली सुट्टीतील भ्रमंतीसाठी आपल्या हुद्यानुसार ठराविक रक्कम मंजूर करून घेता येते. थोडक्यात या प्रकारची बहुतेक संपन्न विदेशी राष्ट्रांतील संकल्पना आपल्या देशातही आज रुढ झालेली आपण पाहतो. म्हणजे दरवर्षी पुरेशी विश्रांती आणि त्यासाठी योग्य अशा ठिकाणी थोडीफार भ्रमंती आपल्याला पुन्हा ताजेतवाने होऊन काम करण्यास मदतरुप ठरते, असाच एकंदर कल.
• पूर्वीची भ्रमंतीविषयक संकल्पना…
फार पूर्वी आपल्या इथे सुट्टीतील भ्रमंतीविषयक एक साधी संकल्पना होती. त्याकाळी विद्यार्थीवर्गांची सुट्टी सुरू झाली रे झाली की जो–तो आपापल्या आजोळी किंवा मामांकडे जाण्याच्या तयारीला लागायचा. म्हणजे अगदी त्या ’मामाच्या गावाला जाऊया….. ’ या विशिष्ट आणि सुप्रसिद्ध कवितेतील वर्णनाप्रमाणे.
सुट्टीत आजोळी किंवा मामांकडे मुलांचे फार लाड व्हायचे. भरपूर दंगा मस्ती आणि जोडीला उन्हाळी फळांची साथ. मग काय विचारता राव. आंबा, फणस, कोकम…. वगैरेची लयलूट चालायची. माझ्या लहानपणी माझ्या आजोळी म्हणजे रिवण या गावी अशा अनेक उन्हाळी सुट्ट्या घालविलेल्या मला अजूनही आठवतात. त्याकाळी तिथे आजच्यासारखा वीज, पाणी वगैरेंचा घरोनघरी पुरवठा होत नसे. रस्ते अरुंद, काहीसे खडबडीत, वाहतूक एकदम कमी. मडगावहून रिवणला निघायचे झाल्यास बसने साधारणतः दोनेक तासांचा अवधी हा लागायचाच. ’राव रे….. वच्च रे….’ असे ओरडत घेतले जाणारे ते न मोजता येणारे बसचे थांबे आणि त्यातच बसमध्ये बिघाड वगैरे झाल्यास मग विचारूच नका. त्यातच ’कार्रेर’ किंवा ’कामिजांव’मधून केलेला तो मजेशीर प्रवास आजही आठवतो. लोकांची साधी–सरळ वृत्ती… एकमेकांना वेळोवेळी आधार देण्याची, मदत करण्याची वृत्ती.. या विषयक किती किती सांगायचे. तर वेळ मिळेल तेव्हा रिवण येथील विविध प्रकारची कुळागरे, शेती, डोंगर, दर्या यांवरील भटकंती नदीवरील ’नुस्त्या’साठी गरवणी, नदीवर–तळीवर किंवा तेथील सुप्रसिद्ध ’तांक’ या थंडगार पाण्याच्या झर्यावर आंघोळीसाठी जाणे आणि तिथ बराचवेळ घालवून रमत गमत घरी परतणे…. सारे काही एखादा ’फ्लॅश–बॅक’ बघितल्याप्रमाणे आठवते.
आज आपण वरील प्रकारच्या सार्या जुन्या गोष्टी आपल्या मुलांना ऐकवितो, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटते. याशिवाय ’यात्रा’ या आजच्या सर्रास वापरल्या जाणार्या शब्दाचा संदर्भ त्याकाळी केवळ एखाद्याने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात केलेल्या किंवा करावयाच्या तीर्थयात्रेशी लावला जात असे. उदाहरणार्थ काशी यात्रा. लहानपणी अशा यात्रांना जाणार्या लोकांच्या गोष्टी वडीलधार्यांकडून ऐकावयास मिळायच्या. अशा यात्रा या एखाद्याच्या आयुष्यातील अखेरच्या इच्छा असल्यासारख्या असायच्या. तर त्या काळच्या तुटपुंज्या सवलती. वाहतूकीचे अत्यल्प पर्याय, आरोग्यविषयक अपुर्या सोयी–सेवा–सुविधा यांमुळे अशा यात्रांच्या दरम्यान काही फारच वयस्क व्यक्तींच्या आयुष्याचे शेवटही होत असत. ही वस्तुस्थिती होय, अतिशयोक्ती नव्हे.
याशिवाय होणारा प्रवास म्हणजे एखाद्या नोकरीवरील माणसालाच घडवायचा. नोकरीनिमित्त गोव्याबाहेरील स्थानी जाणे म्हणजे अगदी हल्ली सुद्धा आपल्याकडे फार मोठी गोष्ट समजली जात असे. बहुतेक गोमंतकीयांचा (माफ करा) कल हा ’मी बरा माझा गोवा बरा…’ असाच काहीसा असायचा. त्यासाठी नोकरीमध्ये मिळवायची बढतीसुद्धा काहीवेळा नाकारली जायची. तरीही त्याकाळी काही विशिष्ट लोक आखाती देशांत, युरोप–आफ्रिका–अमेरिका सारख्या देशांत किंवा आंतरराष्ट्रीय मालवाहू किंवा प्रवासी जहाजांवरील नोकर्या पत्करीत असत, हेही खरे. थोडक्यात त्यानिमित्त त्यांना कितीतरी देशांचा प्रवास घडायचा. पण आज आपण काय पाहतो? आज आपल्या येथील मुलीसुद्धा उच्च शिक्षण प्राप्त करून विविध ठिकाणी अगदी विदेशातसुद्धा लठ्ठ पगाराच्या नोकर्या मिळवू लागलेल्या आहेत आणि यानिमित्ताने त्यांच्या घरातील मंडळींनाही त्यांच्या नोकर्या असलेल्या ठिकाणी जाऊन येणे सोपे होऊन गेले आहे. असे प्रवास हे वर्षभरात कधीही होतच असतात. असो. आता आणखी विषयांतर नको.
• आपल्या पर्यटनाला नियोजनाची जोड हवीच..
आपण जेव्हा उन्हाळी सुट्टी सारखी सुट्टी घालविण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जायचे ठरवित असतो त्यासाठी योग्य वेळी योग्य नियोजनही हवेच. नियोजन का हवे याचे ज्ञान आपल्यापैकी बहुतेकांना आपण यापूर्वी केलेल्या प्रवासामधील अनुभवामुळेही येत असतेच. प्रत्येक गोष्ट नियोजनबद्धरित्या करावयाची झाल्यास ती चांगली होऊ असते असा एक सर्वसाधारण नियम किंवा समज आहे. आपल्या पर्यटनाचेही अगदी तसेच आहे. आपण कोठे जाणार आहोत, आपल्या आवडी–निवडी काय, कोणते प्रवासमाध्यम आपल्यासाठी योग्य ठरेल, आपण जाणार असलेल्या ठिकाणचे वातावरण, तापमान किंवा हवामान कसे असेल, आपला प्रवास किती दिवसांचा असेल, आपल्या निवासासाठी कोणत्या श्रेणीतील हॉटेल आपण निवडणार आहोत आदींसाठी योग्य आणि योजनापूर्वक विचार झाल्यास आपल्याला त्यासंबंधीच्या खर्चाबद्दलही नियोजन आणि व्यवस्था करण्यास ते मदतरुप ठरेल यात शंका नाही.
या संदर्भात मला माझ्या एका मित्राची आठवण येते. गंमत असी की हा माझा मित्र दरवर्षी सहकुटुंब उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी निघायचा. पण ना कसला विचार, ना कसले नियोजन. कारण त्याची प्रवासाविषयक संकल्पनाच वेगळी आणि विचित्र होती. सर्वप्रथम घरून निघून अमुक एक प्रवासमाध्यमाद्वारे अमुक एक ठिकाणी पोचायचे आणि त्यानंतरचे प्रत्येक ठिकाण हे शेवटच्या क्षणी वाटेल तसे निवडायचे आणि सर्वांनी निघायचे. याप्रकारे विशिष्ट दिवसांची भटकंती आटपून परतायचे. हा प्रकार आम्हाला हास्यास्पद वाटायचा. पण हा आपला ठामपणे सांगायचा की आपल्याला आजपर्यत अशाप्रकारे केलेल्या भ्रमंतीमध्ये कसलाही त्रास झालेला नाही. आमच्या सारख्यांच्या नियोजनाला तो ’अति नियोजन’ असे म्हणायचा. आम्ही प्रवासाला निघण्यापूर्वी आवश्यक अशी औषधे जवळ असायची. पण हा माझा मित्र म्हणायचा,’अरे, तेथील फार्मसी काय ओस पडल्या आहेत का? ही सारी औषधे कशाला बरोबर न्यायचीत? पण त्याच्या या वृत्तीमुळे काही वेळा आमच्या ऑफिसने त्याला विशिष्ट रक्कम नामंजूरही केलेली आहे. हेही सांगावेसे वाटते. उदाहरणार्थ, काही ठिकाणी पूर्वपरवानगीशवाय केलेल्या टॅक्सी प्रवासाचे भाडे. योग्य वेळी बस किंवा रेल्वेचे आरक्षण करण्यात आले असते तर असे घडले नसते. तेव्हा आपली विशिष्ट भ्रमंती ही पूर्वनियोजनानुसार झाल्यास आपला वेळ, अतिरिक्त खर्च आणि आकस्मिकरित्या येणार्या अडचणीही आपण टाळू शकतो याविषयी वाद नसावा.
• भ्रमंतीमधील खर्चिकपणा..
प्रवासाला निघायचे म्हणजे आपल्या खिशावर ताण हा आलाच. यात्रा–भ्रमंती–पर्यटन आदी शब्द ऐकणार्याला एक वेगळाच आनंद देतात. पण हे सारे खर्चिक असते हेही तितकेच खरे. आज विविध बँका आपल्या पर्यटनविषयक आर्थिक गरजाही कर्जाद्वारे भागवू शकतात, अशी परिस्थिती आहे. पण अशी ’कर्जे घेऊन यात्रा….’ किती साजर्या करायच्यात. तेव्हा प्रवासाच्या संदर्भात आपले ’पुढचे पाऊल’ हे जरा जपून टाकणे हे उत्तम. माझ्या मते आपल्याला भ्रमंतीची आवड असेल तर योग्य नियोजन हाच चांगला पर्याय ठरावा. आपण बँक, विमा कंपनी, सरकारी किंवा इतर विशिष्ट नोकरीशी संबंधित असल्यास आपल्याला प्रवासासाठी मिळणारे आर्थिक लाभ, प्रवास माध्यमांद्वारे मिळणारे काही लाभ उदा. वरिष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती, रेल्वे प्रवासामधील ब्रेक–जर्नी सुविधा, रेल्वे स्थानकावरील वेटिंग रुम किंवा क्लोक रुमचा योग्य वापर, काही वेळा रात्रीचा रेल्व प्रवास करून हॉटेलच्या निवासाचा खर्च टाळणे….. आदी अनेक गोष्टींमध्ये अनुभवाने आपण पारंगत होत असतो आणि आपल्या विशिष्ट बजेटमध्ये आपल्यासाठी आनंदयात्रा घडवून आणू शकतो हे निश्चित. हॉटेल निवास हा दिवसेंदिवस महागडा होत चाललेला आहे. दरवर्षी ’लक्झरी टॅक्स….’सारखे कर वाढत जात आहेत. उच्च श्रेणीतील निवास दरांविषयी तर न लिहिलेलेच बरे. पण विविध हॉटेल्स ही आपल्या पाहुण्यांसाठी काही विशिष्ट योजना जाहीर करत असतात. तसेच ऑफ सिझन डिस्काऊंट, हॉटेल ते रेल्वे किंवा बस स्थानकाकडील अंतर चेक इन किंवा चेक आऊट वेळेचा योग्य पद्धतीने केलेला उपयोग आदी गोष्टी अभ्यासपूर्वक आत्मसात केल्यास त्याचा फायदा मिळतोच. कारण अशा प्रकारचे बारकावे आपण लक्षात न घेतल्यास हॉटेलमधील वास्तव्यासाठी आपण विनाकारण जास्त खर्च केला अशीच आपली शेवटी भावना होईल. हॉटेल वास्तव्यामध्ये अनेक वेळा आपण रुम सर्व्हिसचा लाभ घेतो. असा लाभ घेणे हा श्रीमंत किंवा अतिवयस्क लोकांसाठी ठिक आहे. अन्यथा आपले हातपाय ठिक असल्यास आपल्या चहा–नास्ता किंवा जेवणासाठी हॉटेलला संलग्न असलेल्या रेस्टॉरंटमध्ये किंवा तेथून जवळपास असलेल्या एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन येणे ही काय एवढी मोठी कठीण गोष्ट आहे का? कारण आपण घेतलेली रुम सर्व्हिस ही त्यासाठी पैसे मोजून घेतलेली गोष्ट असते. काहीवेळा अनेकांच्या मनात ही गोष्ट हॉटेलनिवास सोडताना तेथील बिलचे पैसे भरेपर्यंत येत नसते. पण म्हणून आपल्या मौजमजेच्या भ्रमंतीमध्ये प्रत्येक ठिकाणी कंजुषपणाच करावा असे मुळीच नाही. उपरोल्लेखित गोष्टी अनुभवाने आपल्या अंगवळणी पडल्या की सारे काही अगदी सहजच होत असते, हेही तितकेच खरे. याशिवाय आपल्या भ्रमंतीसाठी बँकेचे कर्ज काढण्यापेक्षा आपल्याजवळील क्रेडीट कार्डाचा योग्य वापर केल्यास काही कालापूरता दिलासा आपल्याला मिळू शकतो.
• विदेश वारी ही सोपी
विदेशवारी ही तर आज तितकीशी आश्चर्याची वगैरे अशी गोष्ट राहिलेली नाही. साधारण कुटुंबातील व्यक्तिसुद्धा आपल्या आयुष्यात एखादी जवळची (उदा. दुबईसारखी) विदेशवारी करून येत असते. पासपोर्ट, व्हिसा, एक्स्चेंज रेट वगैरे गोष्टी आज सर्वांच्याच परिचयाच्या बनलेल्या आहेत. आपले पासपोर्ट बनविताना काही लोक पोर्तुगीज पासपोर्ट बनविताना आढळतात. तेव्हा असे करताना त्यातील नागरिकत्व विषयक बाबींचाही अभ्यास करावा. याशिवाय एखाद्या विदेशवारीसाठी निघताना प्रवासविषयक किंवा आरोग्यविषयक विमा वगैरेंचा विचार व्हावा यासाठी आपल्याला जिथे जायचे आहे तिथे आधीच जाऊन आलेल्या व्यक्तिंकडून अधिकाधिक माहिती मिळविणे हे चांगले. आज अनेक नामांकित पर्यटन संस्था, सर्व्हिस कंपन्या आपल्या विविध माध्यमांद्वारे आपल्या दिमतीला तयार असतात. तेव्हा सर्व गोष्टींचा योग्य विचार करून अशा प्रकारच्या एखाद्या कंपनीचीही आपण निवड करू शकतो.
• भ्रमंतीसाठी योग्य स्थळाचा शोध
यंदाची उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी एखादे स्थळ शोधताना विशेष काळजी घेणे आवश्यक. उन्हाळी सुट्टी म्हटली की आपल्यासमोर हिमालयाच्या कुशीतील अनेक स्थळे किंवा दक्षिण भारतातील उटी, कोडाईसारखी स्थळेच प्रामुख्याने आपल्या नजरेसमोर येतात. पण आपल्यासारखेच इतर असंख्य लोकही याच स्थळांचा विचार करीत असतात. त्यामुळे पर्यटन हंगामामध्ये अशा ठिकाणी प्रचंड गर्दी, पाणी टंचाई, निवासविषयक अडचणी, अव्वाच्या सव्वा निवासविषयक दर हे सारे आलेच. त्याचबरोबर अनेक प्रकारचे व्यवसायिक लोक पर्यटकांच्या अगतिकतेचा योग्य (?) लाभ उठवित आपले हात त्याच्यामध्येच धुवून घेत असतात. तेव्हा आपले उन्हाळी सुट्टीचे ठिकाण हे आपली सुट्टी थंड व शांतपणे घालविण्यासाठी योग्य असे असणे हे आवश्यक. अशावेळी ऊटी–कोडाई सारख्या ठिकाणी न जाता कनूर–येरकॉड सारख्या ठिकाणांचा विचार आपण करू शकतो. पण थांबा. आज याबाबतीत इतर पर्यटकही ’जाणते’ व अनुभवी बनलेले आहेत. तेव्हा ही ठिकाणेही पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेलेली असल्यास नवल वाटू नये. तेव्हा इंटरनेट किंवा इतर माध्यमांद्वारे असे स्थळ शोधून काढा की, यंदाची आपली उन्हाळी सुट्टी वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी योग्य ठिकाणी घालविल्याचा आनंद आपल्याला मिळू शकेल. मात्र असे करतान गरम तापमान आणि गर्दीने आणि गजबजाटाने, तसेच प्रदुषणाने भरलेल्या लहान–मोठ्या शहरांची भ्रमंती टाळा. कारण असे न केल्यास उन्हाळी सुट्टी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी घालवूनही अशा प्रकारच्या ’गरम’ वातावरणातील स्थळांच्या वास्तव्यामुळे आपल्याला उन्हाळी सुट्टीतील भ्रमंतीचा पूर्ण आनंद लुटता येणार नाही. आपली सुट्टी घालविण्यासाठी एखाद्या ठिकाणी आपण जातो. तेव्हा त्या विशिष्ट ठिकाणचा पूर्णपणे अभ्यास करावा. तेथील लोकजीवन, लोकांच्या विशिष्ट पद्धती, रीती–रिवाज, तेथील खासियत या सार्या गोष्टी समजून घ्याव्यात. स्थानिक लोकांकडून यासंबंधी अधिकाधिक माहिती मिळवावी. तेथील संस्कृती, परंपरा, विविध कला याविषयक प्रदर्शने किंवा सादरीकरण आदी पाहण्यास अवश्य चलावे. असे केल्यास एखाद्याच्या ज्ञानात भर पडेलच पण विविध ठिकाणच्या आपल्या देशबांधवांविषयी आपल्याला जवळीक आणि आपुलकी वाटू लागेल. तर खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्या त्या ठिकाणी असलेल्या खासियतीचा आवश्य आस्वाद घ्यावा. नाहीतर संपूर्ण राजस्थान दौरा केला पण मालपुवा किंवा दाल बाटीचुरमा म्हणजे काय माहित नाही असे व्हायला नको. उत्तर पूर्वेकडील दौर्यांत ’इडली–डोसा’ साठी पायपीट न करता वेज किंवा नॉन–वेज मोमोसारख्या स्थानिक पदार्थांचा समाचार घेणार्या गोव्याबाहेरील लोकांची स्थानिक ’फिश–करी’, ’फ्राइड फिश’, ’सी फूड स्पेशियालिटीज’ वगैरेंसाठी किती प्रचंड प्रमाणात मागणी असते हे येथील एखादा नॉन–वेज हॉटेल व्यवसायिकच आपल्याला चांगल्या रितीने सांगू शकेल.
• भ्रमंतीसाठी कोणते साधन निवडाल़?
काहीजणांना आपल्या स्वतःच्या वाहनाने भ्रमंतीला जाणे जास्त सोयीचे वाटते. कारण अशा भ्रमंतीमध्ये आपण आपल्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितका वेळ थांबा घेऊ शकतो. पण माझ्या मते अशा भ्रमंतीमध्ये बरोबर आपला ड्रायव्हर असेल तर ठिक आहे. नाहीतर एकसारखी गाडी चालविल्यानंतर आपल्यासाठी ते ’रेस्ट अँड रेक्युपरेशन’ न होता आपल्याला थकवाच जास्त प्रमाणात जाणवू शकतो. बराच लांबचा प्रवास असेल तर गाडी चालविणारे दोघे तिघेजण असणे चांगले. याशिवाय काही वेळा गाडी चालविताना ’डुलकी’ येण्याचा धोका संभवतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हर घेऊन जायचे झाल्यास आपण निवास करीत असलेल्या हॉटेलच्या एखाद्या सिंगल रुममध्ये त्याची सोय करावी किंवा हॉटेलची ड्रायव्हरसाठी वेगळी व्यवस्था असल्यास अशा सोयीचा अवश्य लाभ घ्यावा. कारण अनोळखी ठिकाणी आपल्या ड्रायव्हरला गाडीमध्येच झोपू देणे म्हणजे काहीवेळा धोकादायकही ठरू शकते.
देश–विदेशातील भ्रमंतीसाठी आपण एखाद्या पर्यटन संस्था किंवा कंपनीच्या पर्यटन कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो. आज अशा सेवा पुरविणार्या अनेक पर्यटन कंपन्या आपल्याला आपल्या आवडीच्या ठिकाणी भ्रमंती करून आणण्यास सज्ज असतात. पण अशा प्रकारच्या पर्यटनामध्ये आपण त्या त्या कंपनीचे नियम पाळण्यास बांधिल असतो. एखादे स्थळ विशेष आवडले तर तेथील मुक्काम वाढवता येत नाही आणि एकसारखा प्रवास करायचा झाल्यास आपल्याला पुरेशी विश्रांती कशी मिळणार? खासकरून वयस्क लोकांना आणि हनिमूनर्सनांही असा प्रवास गैरसोयीचा किंवा अडचणीचा वाटू शकतो. तेव्हा हे सारे आधीच योग्य विचारांती ठरविणे हे चांगले. दुसरे म्हणजे आपण एखाद्या पर्यटन कंपनीच्या देशी किंवा विदेशातील भ्रमंतीसाठी सहभागी होणे म्हणजे केवळ त्याची किंमत चुकती करणे आणि त्यांची आज्ञा किंवा नियम पाळणे एवढेच नव्हे. त्यापेक्षा आपल्या भ्रमंतीचा नेमका कार्यक्रम समजल्यावर आपण इंटरनेटसारख्या माध्यमाद्वारे किंवा पूर्वी तिथे जाऊन आलेल्या ओळखीच्या लोकांद्वारे तेथील संपूर्ण माहिती मिळवावी. आपल्या प्रवासात याचा निश्चितपणे उपयोग होईल.
भ्रमंतीसाठी निघण्यापूर्वी खालील काही गोष्टी उपयोगी ठराव्यात…
१) आपण भेट देणार असलेल्या ठिकाणांची योग्य माहिती मिळवावी. काही ठिकाणी बंद, संप, दंगल अशा गोष्टींमुळे आपण अडचणीत येऊ शकतो.
२) आपल्या बजेटचा किंवा आर्थिक परिस्थितीचा विचार करून योग्य नियोजन करावे.
३) आपली गाडी न्यायची झाल्यास ती उत्तम स्थितीत असणे आवश्यक. गाडी चालवणारी एकापेक्षा जास्त माणसे तरी ग्रुपमध्ये असावीत. गाडीची कागदपत्रे, आपला चालक परवाना आदी जवळ बाळगावेत. रात्रीचा प्रवास टाळावा.
४) आपल्या आवश्यकतेनुसार बरोबर न्यावयाच्या वस्तूंची काळजीपूर्वक यादी बनवावी.
५) महत्त्वाचे असे मित्रांचे, नातेवाईकांचे, शेजार्यांचे तसेच आपल्या हॉटेल्सचे फोन नंबर जवळ असावेत. आपण भेट देणार असलेल्या ठिकाणांचे मॅप किंवा नकाशे बरोबर असल्यास उत्तम.
६) आपण नेणार असलेली रोख रक्कम वगैरे एखाद्याकडेच न ठेवता ती विभागण्यात यावी.
७) आपल्या क्रेडिट–डेबिट, एटीएम कार्डासंबंधी पूर्ण माहिती वेगळ्या ठिकाणीही ठेवावी. कारण आपले एखादे कार्ड हरवल्यास तक्रार नोंदविताना त्याचा उपयोग होतो.
८) आपले फोटो ओळखपत्र आणि त्याच्या काही प्रति जवळ ठेवाव्यात.
९) विदेशी दौर्यात पासपोर्ट, त्याच्या काही ’नोटराईज्ड कॉपिज’ इमिग्रेशन सर्टिफिकेट, विम्याशी संबंधित कागदपत्रे वगैरे जपून बाळगावीत.
१०) केवळ भ्रमंतीसाठी निघायचे झाल्यास आपल्या सामानाच्या बॅगा हलक्या असाव्यात. तसेच त्यांचे वजन आपल्या ग्रुपमधील प्रत्येकासाठी जड वाटणार नाही, असे असावे. पाठीवर घेणार्या बॅगा ’बॅक बॅग्स्’चाही वापर करावा.
११) बस, रेल्वे, विमान प्रवास तसेच हॉटेल निवास वगैरे आधीच नियोजनबद्धरित्या आरक्षित असावा.
१२) त्या त्या विशिष्ट स्थळांचे तापमान समजून घेऊन योग्य अशा कपड्यांची निवड करावी.
१३) अनोळखी माणसांशी विनाकारण बोलणे, विशेष सलगी, देणे–घेणे वगैरे टाळावे.
१४) भ्रमंतीवर असताना प्रत्येकाजवळ आपण निवास करतो त्या हॉटेलचा संपूर्ण पत्ता, फोन नंबर वगैरे असावा.
१५) लहान मुले असल्यास त्यांची विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या खिशात आणिबाणीच्यावेळी किंवा चुकामूक झाल्यास उपयोगी पडू शकणार्या गोष्टी असाव्यात. उदा. पालकांचा पत्ता, फोन नंबर, गरजेस पुरेल एवढे पैसे आदी. गरज पडल्यास पोलिसांची मदत घेण्यासंबंधी त्यांना योग्य त्या पद्धतीने शिकवावे.
१६) आपल्या अनुपस्थितीत आपल्या घराची, वाहनांची, सुरक्षितता लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी.
१७) आपल्या भ्रमंतीसंबंधी संपूर्ण माहिती जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला द्यावी. अधूनमधून त्याच्याशी संपर्क साधावा.
१८) आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. बरोबर महत्त्वाची वाटणारी औषधे–गोळ्या असाव्यात. विदेशवारीसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन्सही आवश्यक तसेच विशिष्ट देशात विशिष्ट औषधांवर बंदी असू शकते. त्याचाही विचार व्हावा.
आपल्या अनुभवानुसार या वरील सर्व गोष्टींमध्ये आणखीही भर पडू शकेल आणि आपला प्रवास सर्व दृष्टीने उत्तम असा होऊ शकेल. तर मग आजच ठरवा आपला यंदाचा उन्हाळी सुट्टीतील भ्रमंतीचा कार्यक्रम. मनसोक्त भ्रमंती करा… मस्त आनंद लुटा… आणि स्वस्थ रहा…